लोकसभा निवडणुकीत सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान येत्या 1 जूनला होणार आहे. त्यानंतर 4 जूनला मतमोजणी आणि निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) परभणीचे उमेदवार संजय जाधव यांनी मोठं विधान केलं आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान झालं. निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी झंझावाती प्रचार केला. उद्धव ठाकरे यांनी जिथे-जिथे प्राचरसभा घेतल्या त्या सर्व सभा त्यांच्या खणखणीत भाषणांनी आणि जनतेच्या तुफान प्रतिसादामुळे गाजल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांमुळे भाजपसह महायुतीमधील घटक पक्षांना धडकी भरली. आता निकाल काही दिवसांत लागणार असल्याने शिवसेनेचे परभणीचे उमेदवार संजय जाधव यांनी मोठं भाकित केलं आहे.
राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील माहिती मी घेतली आहे. काही ठिकाणी मला जाण्याचाही योग आला. सगळं बघितल्यानंतर मला असं वाटतं की ह्या वेळेस ही लढाई उद्धव ठाकरे विरुद्ध महायुती अशी होती. आणि उद्धव ठाकरेसाहेबांनी स्वतःच्या कर्तृत्वातून लढाई लढली. तसेच उद्धव ठाकरेसाहेब, शरदचंद्रजी पवारसाहेब असतील, काँग्रेसचे नेते असतील, महाविकास आघाडी म्हणून ज्या पद्धतीने प्रचार केला, ते पाहता 4 तारखेला निकाल लागेल त्या दिवशी या मॅचचा मॅन ऑफ द सिरीज कोण असेल तर उद्धव ठाकरेसाहेब, असं संजय जाधव म्हणाले.
महायुती किती जागा जिंकेल हे माहिती नाही. मात्र, महाविकास आघाडीच्या किमान 35 जागा असतील. 30 ते 35 च्या दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा निवडणून येतील, हे आत्मविश्वासाने सांगतो, असं संजय जाधव यांनी सांगितलं.