येरे येरे पावसा! मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात ‘या’ दिवशी येणार…

सध्या देशात उष्णतेने कहर केला आहे. वैशाख वणव्यात अवघा देश लाही लाही होत असताना त्यावर थंडगार शिडकावा करणारी बातमी आली आहे. भारतीय हवामान विभागाने 29 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचं म्हटलं आहे. 24 तासांत कधीही केरळात पाऊस दाखल होईल. त्यासाठी योग्य वातावरण केरळात निर्माण झालं आहे.

केरळात मान्सून यावेळी वेळेआधीच दाखळ झाला आहे. हवामान विभागाने बुधवारी कोट्टायम आणि एर्नाकुलम या जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला असून अन्य तीन जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असला तरीही तो पाऊस मान्सून पूर्व असल्याचं हवामान विभागाने म्हटलं होतं.

देशात अल नीनोच्या प्रभाव कमी होत असून ला नीनाचा प्रभाव वाढत आहे. ला नीनाच्या वाढत्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमान उत्तम असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सून यंदा 10 जून रोजी महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तिथून पुढे तो गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा आणि झारखंड असा प्रवास करत उत्तर दिशेला सरकेल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.