बॉम्बच्या अफवेने विमानातून मारल्या उडय़ा

दिल्लीहून वाराणसीकडे जाणाऱया इंडिगो एअरलाइन्सच्या एका विमानामध्ये मंगळवारी सकाळी बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. जीव वाचण्यासाठी काही प्रवाशांनी विमानातून उडय़ा मारल्या. विमानातील प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. टेकऑफ करण्यापूर्वी दिल्ली-वाराणसी इंडिगो विमानाच्या टीमला विमानाच्या टॉयलेटमध्ये ‘बॉम्ब’ लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. इंडिगोच्या टीमने अलर्ट जारी केला आणि प्रवाशांना विमानातून उतरण्याची विनंती केली. काही प्रवाशांनी आपत्कालीन गेटवरून तर काहींनी विमानाच्या मुख्य गेटवरून खाली उडय़ा मारायला सुरुवात केली. एव्हिएशन सिक्युरिटी, डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी विमानाची बारकाईने पाहणी केली. विमानाला चाचणीसाठी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले होते, परंतु ही अफवा निघाली, असे विमानतळ अधिकाऱयाने सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि देशातील विमानतळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळत आहेत. अज्ञांत नंबरवरून आणि ईमेलवरून या धमक्या दिल्या जात आहेत. याआधी जयपूर, दिल्लीमधील शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर ही अफवा असल्याचे सिद्ध झाले होते. परंतु, या धमकीनंतर एकच गोंधळ उडाला होता. गृह मंत्रालयालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती.

खळबळ उडविण्यासाठी अफवा

दिल्लीहून वाराणसीकडे जाणाऱया इंडिगो विमान 6ई 2211 च्या दिल्ली विमानतळावरील टॉयलेटमध्ये ‘बॉम्ब’ लिहिलेला टिश्यू पेपर सापडला. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याची तपासणी केली. मात्र ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले असून खळबळ उडविण्याच्या उद्देशाने कोणीतरी हे कृत्य केले आहे, असे इंडिगोने म्हटले आहे.

सर्व प्रवासी सुरक्षित

सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी आम्हाला दिल्लीहून वाराणसीला जाणाऱया इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. आमची क्विक रिस्पॉन्स टीम घटनास्थळी पोहोचली. विमानाच्या आपत्कालीन गेटमधून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, असे दिल्ली अग्निशमन दलाच्या जवानाने सांगितले.

विमानाच्या इंजिनला आग

अमेरिकेत युनायटेड फ्लाइट 2091, एअरबस ए 320 या विमानाच्या इंजिनला उड्डाण घेताच आग लागली. सोमवारी हिंदुस्थानी वेळेनुसार रात्री साडेअकरा वाजता शिकागोहून वॉशिंग्टनसाठी उड्डाण करताच विमानात ही घटना घडली. फ्लाइटमध्ये 148 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर्स होते.