पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्श अपघातानंतर अवघ्या राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अल्पवयीन असलेल्या वेदांत अगरवाल याने महागड्या पोर्श गाडीने केलेला अपघात, त्यानंतर पुणे पोलिसांची संशयास्पद वागणूक, अवघ्या काही तासांत मिळालेला जामीन, जामिनावरील निबंधाची अट यांमुळे या संतापात भर पडली. आता या प्रकरणातील अनेक धक्कादायक पैलूंचे खुलासे होत आहेत. वेदांत याच्या रक्ताच्या चाचणी अहवालात फेरफार करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्या प्रकाराची गंभीर दखल घेत त्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने बिर्याणीवर ताव मारल्याचं उघड झालं आहे.
ससून रुग्णालयात झालेल्या गैरप्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने तीन सदस्यीय समिती नेमली आहे. जे. जे. हॉस्पिटलच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली. या समितीने मंगळवारी बिर्याणीवर ताव मारत ही चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. चौकशी समितीने पुण्यातील प्रसिद्ध ब्ल्यू नाईल बिर्याणीचा आस्वाद घेत ही चौकशी केल्याची माहिती मिळत आहे. बिर्याणीच्या पिशव्या ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या केबिनमध्ये घेऊन जातानाची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात संतापाची लाट उसळली आहे.
वास्तविक ही समिती आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. असं असूनही सरकारने सापळे यांची चौकशी समितीच्या प्रमुखपदी नेमणूक केली. त्यात आता या बिर्याणीच्या मेजवानीचा घाट घालण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.