सुपे येथील अतिक्रमणांवर महसूल प्रशासनाचा हातोडा; महसूलमंत्र्यांनी सूडाच्या भावनेतून कारवाई केल्याचा व्यावसायिकांचा आरोप

महसूल प्रशासनाने दुकानातील वस्तू हलवण्याची संधी न देता अतिक्रमणे हटवण्यासाठी दुकानांवर जेसीबी चालवल्याने हातावर पोट असणारे सुपे येथील छोटे व्यावसायिक उध्वस्त झाले आहेत.त्यांच्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत विरोधी उमेदवाराला मतदान केल्याच्या संशयावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांनी महसूल व महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून अत्यंत निर्दयपणे कारवाई केल्याचा आरोप छोट्या व्यावसायिकांकडून केला जात आहे.तर पराभवाची चाहूल लागल्याने मंत्री राधाकृष्ण विखे,खासदार डॉ.सुजय विखे यांनी महसूलसह, सार्वजनिक बांधकाम विभाग,पोलीस प्रशासनाला महाविकास आघाडीचे उमेदवार, माजी आमदार नीलेश लंके यांच्या बालेकिल्ल्यात कारवाई करण्यास भाग पाडल्याचा आरोप माजी आमदार लंके यांचे समर्थक, वकील राहुल झावरे, कारभारी पोटघन, अतिफ शेख यांच्यासह नीलेश लंके प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.त्यामुळे सुपे येथील अतिक्रमणविरोधी कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

पारनेर तालुक्यातील सुपे गावातून जाणाऱ्या नगर -पुणे महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांवर,सुपे बसस्थानक चौक ते औद्योगिक वसाहत चौक तसेच सुपे औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणांवर महसूल प्रशासनाने शनिवारी (25 मे) आणि रविवारी सलग दोन दिवस हातोडा चालवत तब्बल 315 अतिक्रमणे जमीनदोस्त केली.आजवरची सर्वात मोठी कारवाई ठरली.मात्र ही कारवाई आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

अतिक्रमणांमुळे नगर -पुणे रस्त्यावर, सुपे बसस्थानक चौक ते शासकीय विश्रामगृहादरम्यान तसेच पारनेर सुपे रस्त्यावर विशेषतः संध्याकाळी,रात्रीच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होत असे.या दोन्ही ठिकाणे वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याच्या घटनाही घडल्या आहेत.मोठे शक्तिप्रदर्शन करीत करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान कोणताही व्यावसायिक विरोध करण्यास धजावला नाही. पारनेर रस्त्यावरील 74,औद्योगिक वसाहतीतील 68 तर नगर -पुणे महामार्गाच्या दुतर्फा असणारी 173 अतिक्रमणे हटवण्यात आली.यामध्ये हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत विरोधी उमेदवाराला मतदान केल्याच्या रागातून‌ व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या दबावाखाली, व्यावसायिकांना अतिक्रमणे स्वतःहून काढण्याची संधी न देता दुकानांवर जेसीबी चालवण्यात आला असा आरोप व्यावसायिकांनी केला.
पोलिसांनी दडपशाही करीत व्यावसायिकांना त्यांच्या दुकानाजवळ जाण्यास आडकाठी करीत दुकाने आतील मालासह जमीनदोस्त केल्या.त्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

रविवारी सकाळी सात वाजता प्रांताधिकारी गणेश राठोड मोठा पोलीस बंदोबस्त,जेसीबीसह सुपे बसस्थानक चौकात पोहोचले.महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग, औद्योगिक महामंडळाचे अधिकारी,पोलीस अधिकारी त्यांच्या समवेत होते.अतिक्रमणे हटवण्यात येणार असल्याच्या सूचना ध्वनीक्षेपकावर‌ देण्यात आल्या व लगेचच कारवाईला सुरुवात करण्यात आली.यावेळी बहुतेक सर्व दुकाने बंद होती.अवघ्या काही वेळातच बसस्थानक चौकातील फळे, चहा,भेळ, सलून,डेअरी, चिकन,मटण सेंटर,वडापावची दुकाने आतील मालासह जमीनदोस्त करण्यात आली.यामध्ये पक्क्या बांधकामांसह लोखंडी टपऱ्यांचा समावेश होता.अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली असल्याचे समजल्यावर पारनेर रस्त्यावरील व्यावसायिकांनी दुकानातील माल हलवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना फारसे यश आले नाही.

शहांजापूर चौकातील देवीचे छोटेखानी मंदिर आणि पारनेर रस्त्यावरील दर्गाही अतिक्रमण हटाव मोहिमेतून सुटले नाही. सुप्याचे सरदार शाबुसींग यांच्या पादुका असणारा चौथरा व त्यावरील छत्री हटवण्यासाठी प्रशासनाने 30 मे पर्यंतची मुदत दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या राजकारणातून कारवाई करण्यात आली.केवळ छोट्या व्यावसायिकांची अतिक्रमणे काढण्यात आली. धनदांडग्यांच्या पक्क्या बांधकामांना धक्का लावला नाही.यापूर्वीही अतिक्रमणे हटवण्यासाठी नोटिसा आल्या होत्या.मात्र कारवाई होत नव्हती.आजच अचानक काय झाल असा सवाल करतानाच आमची आता दुसरीकडे सोय होणे आवश्यक आहे.नाहीतर आमची चूल कशी पेटणार असा संतप्त सवाल शितल बांगर यांनी केला.

अतिक्रमण हटविण्याची नोटीस पाच, सहा दिवसांपूर्वी मिळाली होती.
त्याविरोधात काही व्यावसायिक न्यायालयात गेले होते.न्यायालयाने 30 मे पर्यंत अतिक्रमणे स्वतःहून हटवण्याचे आदेश व्यावसायिकांना दिले होते.त्यामुळे 30 मे पर्यंत कारवाई होणार नाही अशी अपेक्षा होती.सुटीच्या दिवशी, रविवारी कारवाई होईल असे कोणालाही वाटले नाही.त्यामुळे व्यावसायिक गाफिल राहिले आणि अवघ्या काही तासांत होत्याचे नव्हते झाले असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

ज्या पध्दतीने, व्यावसायिकांना कोणतीही संधी न देता कारवाई केली ती पहाता, लोकसभा निवडणुकीच्या रागातून,आकसापोटी कारवाई केली आहे.विरोधी उमेदवाराला मते दिल्याच्या संशयातून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून कारवाई करण्यास भाग पाडले.माझे वयक्तीक तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.सर्व व्यावसायिकांचे मिळून दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे.

– अल्ताफ शब्बीर शेख,व्यावसायिक, सुपे.