>> महेश उपदेव
विको कंपनीचे अध्यक्ष यशवंतराव केशवराव पेंढरकर यांचे नुकतेच निधन झाले. यशवंतराव यांच्या जाण्याने सर्वांना सोबत घेऊन चालणारे सुसंस्कृत आणि समंजस व्यक्तिमत्त्व, तसेच मराठी उद्योजक गमावल्याची भावना महाराष्ट्रातील औद्योगिक जगताने व्यक्त केली आहे. एक सौम्य, शालीन व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची औद्योगिक विश्वात ओळख होती. त्यांचा संस्कृत भाषेवर पगडा होता. त्यांना भगवद्गीता, रामायण आदी धार्मिक ग्रंथांच्या वाचनाची प्रचंड आवड होती. यशवंतराव पेंढरकर यांनी कायद्याची पदवी (एलएलबी) प्राप्त केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते विको समूहात रूजू झालेत. त्यांच्या कायदेविषयक अभ्यासाचा विको समूहाला वेळोवेळी फायदा झाला. सेंट्रल एक्साइजविरुद्ध सुमारे 30 वर्षे चाललेला खटला त्यांच्यामुळे जिंकण्यात कंपनीला यश प्राप्त झाले होते. त्या खटल्यातील युक्तिवाद तसेच संपूर्ण कायदेविषयक निर्णय त्यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले होते. त्यांनी काही काळ कंपनीत संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली. ते 2016 मध्ये विको कंपनीचे चेअरमन झालेत. त्यांच्या नेतृत्वात कंपनीने काळसुसंगत बदल स्वीकारत प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठलेत. त्यांच्याच चेअरमनशिपअंतर्गत कंपनीला इकॉनॉमिक टाईम्सचा ‘ब्रॅण्ड ऑफ द इअर 2023’ हा प्रतिष्ठsचा पुरस्कार प्राप्त झाला. त्याशिवाय निर्यातीसंबंधित बरेच पुरस्कार त्यांच्या कार्यकाळात कंपनीला मिळालेत. विको कंपनी 1952 मध्ये केशव पेंढरकर यांनी स्थापन केली. कंपनीने तयार केलेली विको वज्रदंती ही जगातील पहिली आयुर्वेदिक टुथ पेस्ट होती. येत्या काळात होणाऱया पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन यशवंत पेंढरकर यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे सुरू केले होते. पाण्याचे रिसायकलिंग (पाण्याचा पुनर्वापर) करून पाण्याचा बगिच्यामध्ये वापर सुरू केला होता.