>> दिलीप ठाकूर
आपल्या चौफेर पसरलेल्या मनोरंजन उद्योगात अनेक प्रकारच्या कलाकारांना कमी अधिक प्रमाणामध्ये त्यांच्या कलेची सेवा करण्याची संधी मिळत असते, ते कारकीर्द करू शकतात. त्यासाठी आपण नक्की काय करुन वाटचाल करू शकतो याचे भान हवे. इतके की अनेक स्टार सुपरस्टारचे डुप्लिकेट अथवा डबलदेखील येथे आपली कारकीर्द घडवू शकतात असे अनेक वर्षे दिसून आले आहे. असंच एक नाव ‘फिरोज खान अमिताभ बच्चन डुप्लिकेट.’ आता तुम्ही म्हणाल की हे असं मोठे नि सविस्तर नाव का तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हा फिरोज खान अमिताभ बच्चनचा डुप्लिकेट म्हणूनच प्रामुख्याने ओळखला जायचा. एकाद्या कलाकाराची अशीही एक ओळख असू शकते. हे फिरोज खान 23 मे 2024 रोजी उत्तर प्रदेशातील बदायू या आपल्या जन्मगावी असताना त्याचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांनी काही दिवसांपूर्वीच मतदाता संमेलनामध्ये भाग घेऊन विविध कलाकारांच्या आवाजामध्ये स्थानिक मतदारांना मतदानासाठीचे आवाहन केले होते. ते दिलीपकुमार, धर्मेंद्र, सनी देओल, शाहरुख खान यांचीही मिमिक्री उत्तम करीत. त्यांची मिमिक्री आणि मतदानासाठीचे आवाहन म्हणजे अथवा प्रबोधन अशा प्रकारची त्यांनी सांगड घातली.
या एकाच कलाकाराला अमिताभ बच्चनच्या डुप्लिकेट अथवा डबलचा लाभ झाला असं नाही. फार पूर्वी म्हणजे नव्वदच्या दशकामध्येदेखील विजय सक्सेना नावाचा एक कलाकार अशा पद्धतीनेच अमिताभ बच्चनचा डुप्लिकेट म्हणून कार्यरत होता आणि त्याला ‘रामगढ के शोले’, ‘बसंती टांगेवाली’ अशा काही चित्रपटांमध्येदेखील भूमिका मिळाल्या. अमिताभ बच्चनच्या आवाजाची, अभिनय शैलीची, अॅन्थनी गोन्सालवीस वगैरे अनेक लोकप्रिय व्यक्तिरेखांची नक्कल करणारे अगदी शहरांपासून ग्रामीण भागामध्ये बरेच आहेत. आपल्या छोटय़ा विश्वात ते सुखी, समाधानी आहेत. फिरोज खान अमिताभ बच्चनचा डुप्लिकेट याने तर एकीकडे अनेक स्टेज शोमध्ये अमिताभ बच्चनची मिमिक्री सादर करून प्रचंड लोकप्रियता संपादन केली. देशातील विविध भागांमध्ये त्यांनी दौरे करून आपल्या या कलेला रसिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळवला. इतपंच नव्हे तर त्यानी या शैलीबाहेर जात काही दूरदर्शन मालिकांमध्येदेखील भूमिका साकारल्या. काही नाव सांगायची तर ‘भाभीजी घर पर है’, ‘जिजाजी छत पर है’, ‘साहेब बीबी और बॉस’, ‘हप्पू की उल्टन पल्टन’, ‘शक्तिमान’ अशा काही मालिकांचा खास उल्लेख करायला पाहिजे. त्याबरोबर अदनान सामी या गायकाच्या ‘थोडीशी तू लिफ्ट करा दे’ या मालिकेमध्येदेखील त्याने भूमिका साकारली आहे. हिंदी दूरदर्शन उपग्रह वाहिन्यांवरील कॉमेडीच्या कार्यक्रमांमध्ये या फिरोज खानना मोठय़ा प्रमाणावर संधी मिळाली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वाससुद्धा वाढला. त्यामुळे असं म्हणता येईल की, एखाद्या मोठय़ा कलाकाराचा डुप्लिकेट म्हणूनही कार्यरत असताना अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये कारकीर्द करता येऊ शकते. त्यासाठी हवे मूळ कलाकाराच्या संवादफेक शैलीचा अभ्यास आणि ती शैली रसिकांना योग्य वाटेल अशा पद्धतीने त्याचे सादरीकरण करणे. मिमिक्री कलाकारांचे याबाबत अतिशय चांगल्या पद्धतीने निरीक्षण हवे. मनोरंजन क्षेत्रामध्ये मूळ नायकाला जेवढा वाव आहे त्या प्रमाणात नसला तरी त्यांचे डबल अथवा डुप्लिकेटनासुद्धा चांगल्या पद्धतीने स्कोप आहे असं म्हणता येईल. ‘फिरोज खान अमिताभ बच्चनचा डुप्लिकेट’ यांच्या निधनाच्या निमित्ताने ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.