Coastal Road वरून आदित्य ठाकरेंचा थेट सवाल; दिला इशारा, ‘आम्ही सरकार स्थापन करू तेव्हा… ‘

मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडच्या भुयारी मार्गातून गळती सुरू झाली. भुयाराच्या एका भिंतीच्या एक्सपॅनशन जॉईंटमधून (सांध्यांमधून) गळती झाली. यानंतर मीडियामध्ये हे वृत्त झळकले आणि मिंधे सरकारच्या सुमार दर्जाच्या कामाचा भांडाफोड झाला आहे. आता कोस्टल रोडवरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर निशाणा साधला आहे. X वर पोस्ट करत आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोड कधीपर्यंत पूर्ण खु्ला होणार असा सवाल देखील केला आहे.

आपल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी, ‘मविआचे सरकार कायम राहिले असते तर, मुंबई कोस्टल रोड डिसेंबर 2023 पर्यंत पूर्णपणे तयार झालेला असता आणि नागरिकांसाठी खुला झाला असता. पण, भ्रष्ट राजवटीने आमचं सरकार पाडल्यानंतर त्या कामाचा वेग मुद्दाम कमी केला आणि खर्च वाढवण्याचं काम केलं’, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

‘फेब्रुवारीमध्ये अनेक वेळा उद्धाटनाच्या तारखा बदलत राहिल्या, त्यावेळेस मी ते निदर्शनासही आणले होते, आणि तेही फक्त एका लेनसाठी सुरू होते. शेवटी आम्ही केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी निवडणुकीपूर्वी घाईघाईत 1 लेन उघडण्यात आली. 1 लेन, जी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंतच खुली असते! मग आम्हाला नवीन टाईमलाइन देण्यात आली… आधी मार्च, नंतर एप्रिल, नंतर मे पर्यंत संपूर्ण रस्ता खुला केला जाईल. आता जवळपास जून आलाय… @mybmc नागरिकांना कोस्टल रोड उघडण्याच्या अंतिम तारखेबद्दल अधिकृत अपडेट देईल का?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

तसेच ‘जेव्हा आम्ही सरकार स्थापन करू तेव्हा हा विलंब का झाला ह्याची तपशीलवार चौकशी करूच!’, असा इशारा देखील आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.