पोर्शच उघड करणार आता पुणे अपघाताचा कारनामा, डॅशकॅमसह अन्य व्हिडीओ ताब्यात

पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्श अपघातानंतर अवघ्या राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अल्पवयीन असलेल्या वेदांत अगरवाल याने महागड्या पोर्श गाडीने केलेला अपघात, त्यानंतर पुणे पोलिसांची संशयास्पद वागणूक, अवघ्या काही तासांत मिळालेला जामीन, जामिनावरील निबंधाची अट यांमुळे या संतापात भर पडली. आता या प्रकरणातील अनेक धक्कादायक पैलूंचे खुलासे होत आहेत. वेदांतचे वडील विशाल अगरवाल याने त्याला पोर्श गाडीची किल्ली दिली होती. याच गाडीची तपासणी पूर्ण करण्यात आली असून अपघातावेळची परिस्थिती त्याने उघड होण्याची शक्यता आहे.

वेदांत अगरवाल हा सध्या बालसुधारगृहात आहे. ज्या गाडीने अपघात झाला, ती गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या गाडीची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. पोर्श ही स्पोर्ट्स कार प्रकारातील गाडी आहे. या गाडीच्या डॅश कॅममध्ये काही क्लिप्स रेकॉर्ड झाल्या असून त्या क्लिप्सच्या साहाय्याने अपघाताचे तपशील मिळू शकणार आहेत. मुंबईहून आलेल्या पोर्श कंपनीच्या एका पथकाने आरटीओ अधिकाऱ्यांसह सोमवारी गाडीची संपूर्ण पाहणी केली. त्यानंतर गाडीतील इलेक्ट्रॉनिक डेटासह डॅशकॅम आणि गाडीच्या मागच्या बाजूला असलेल्या कॅमेऱ्यातील क्लिप्स ताब्यात घेतल्या आहेत.

या अपघातावेळी वेदांतसोबत असलेल्या चालकाला ज्या गाडीतून जबरदस्ती बसवून नेलं ती गाडी देखील जप्त करण्यात आली आहे. या चालकाला धमकावल्या प्रकरणी विशाल अगरवाल याचे वडील सुरेंद्र अगरवाल यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.