पाच कामगारांचा बळी, ठेकेदार मोकाट; फडणवीसांची भेट घेऊन पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न

सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बांधकाम साईटवर घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये पाच कामगारांचा बळी घेणारा ठेकेदार महेंद्र कोठारी हा सध्या मोकाट फिरत आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी अपना घर फेज 3 या बांधकाम प्रकल्पात काम करीत असलेल्या एका मजुराचा डोक्यात दगड पडल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये कोठारी याला कारवाईतून वगळून सुपरवायझरवर गुन्हा दाखल केला आहे. सेव्हन इलेव्हन ही कंपनी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीची आहे.

अपना घर फेज 3 या प्रकल्पाच्या साईटवर डबलू यादव हा नेहमीप्रमाणे काम करीत होता. त्याचवेळी त्याच्या डोक्यात दगड पडला आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने भीमसेन जोशी रुग्णालयात नेले असता दाखल करण्यापूर्वी डॉक्टरांनी मृत घोषित केले. या मजुराच्या मृत्यूप्रकरणी काशिगाव पोलिसांनी सुपरवाझरवर गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही सप्टेंबर २०२३ मध्ये अपना घर फेज ३ येथील बांधकाम ठिकाणी लोखंडी अँगल डोक्यावर पडून सुभो दास आणि जयंतो दास या दोन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये याच बांधकाम साईटवर पुन्हा दुर्घटना घडली होती. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मुकेश सिंह मार्को (२६) या तेथे आलेल्या तरुणाचा मृत्यू झाला होता. या बांधकाम साईटवर आतापर्यंत पाच कामगारांचा बळी गेला आहे. मात्र त्यानंतरही पोलिसांनी ठेकेदार महेंद्र कोठारी याच्यावर गुन्हा दाखल केला नाही. पोलिसांकडून होत असलेल्या या पक्षपाती कारवाईवर सत्यकाम फाऊंडेशनचे कृष्णा गुप्ता, जिद्दी मराठाचे प्रदीप जंगम यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सेव्हन इलेव्हनच्या बांधकामावर पाच जणांचा बळी घेणारा ठेकेदार महेंद्र कोठारी याने काल रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. फडणवीस हे काल उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आले होते. त्यावेळी कोठारी आणि नरेंद्र मेहता यांनी फडणवीसांचे स्वागत केले आणि स्वागताचे हे छायाचित्र सोशल मीडियावर टाकले. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.