पब्ज, बालमालकांकडून अबकारी अधिकाऱ्यांना लाखोंचा हप्ता; सुषमा अंधारे, रवींद्र धंगेकर यांनी केला भंडाफोड; यादीच वाचून दाखवली

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने पुण्यातील उत्पादन शुल्क विभागात धडक दिली. त्यानंतर ट्विट करून आमदार धंगेकर यांनी पुणे शहरात अवैधरीत्या चालणाऱ्या पब्ज आणि बारच्या मालकांकडून उत्पादन शुल्कचे अधिकारी प्रत्येक महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते गोळा करतात, त्याची यादीच जाहीर करीत भंडाफोड केला.

पुण्यातील ‘नाइटलाइफ’ला पाठीशी घालणारे उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक चरणसिंह राजपूत यांना धारेवर धरले. याच वेळी त्यांच्यासमोर हप्ता वसूल करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे आणि बार-पब्जमालकांकडून वसूल हप्त्याची रक्कम सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी वाचून दाखविली. पाठोपाठ ही यादी ट्विट केली.

विमाननगर, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, भूगाव, भुकूम, बाणेर, हिंजवडी, पिंपरी-चिंचवड, लोणावळा आदी भागांतील ‘कलेक्शन’ करणारे कॉन्स्टेबल सागर धुर्वे, तात्या शिंदे, समीर पडवळ, स्वप्नील दरेकर, गोरे मेजर, गोपाल कानडे, तसेच खासगी व्यक्ती युवराज पाटील, मुन्ना शेख, रवि पुजारी, तानाजी पाटील, माऊली शिंदे, राजू व काही लायसन्सधारक राहुल रामनाथ, सुन्नीसिंह होरा, बाळासाहेब राऊत हे वसुली करीत असल्याचे धंगेकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

स्वतः एजंट म्हणून कॉण्ट्रक्ट घेतो आणि सर्व काम कॉन्स्टेबल सागर धुर्वे व तात्या शिंदे या दोन व्यक्ती फूड लायसन्ससह सर्व परवाने काढतात. ही माहिती एक्साइजच्या स्टाफने दिलेली आहे. 78 लाख रुपये महिना कलेक्शन असून, दोन वर्षांत नवीन लायसन्स केली त्याचे 2.5 कोटी रुपये गोळा करीत असल्याचे धंगेकर यांनी सांगितले.

अशी होते हप्तावसुली

‘द माफिया’ – एक लाख रुपये,  एजंट, जॅक्स – प्रत्येकी 50 हजार, बॉलेर – दोन लाख महिना, 2 बीएचके (राजाबहादूर मिल्स), दिमोरा (राजाबहादूर मिल्स) – एक लाख, मिलर (राजाबहादूर मिल्स) – एक लाख, 50 हजार रुपये (बाणेर), बँक स्टेज-90 हजार, ठिखणा – 1.5 लाख 3 हजार रुपये, स्काय स्टोरी – 50 हजार रुपये, जिमी दा ढाबा (पाषाण) – 50 हजार रुपये, टोनी दा ढाबा – 50 हजार रुपये, आयरिश – 40 हजार रुपये, टल्ली टुन्स – 50 हजार रुपये, अॅटमोसफियर – 60 हजार, रुड लॉज – 60 हजार रुपये, द टिप्सी हॉर्स – 60 हजार, रेन फॉरेस्ट रेस्टो बार – 50 हजार, 24 के (बालेवाडी, विमाननगर, सेनापती बापट रोड) – 1.5 लाख, पॅफे सीओ 2 हॉटेल (भुकूम) – एक लाख महिना, कोको रिको हॉटेल (भूगाव) – 75 हजार रुपये महिना, स्मोकी बीच हॉटेल (भुकूम) – 75 हजार रुपये महिना, सरोवर हॉटेल (भूगाव) – एक लाख महिना, जिप्सी हॉटेल (भुकूम) – 50 हजार महिना, सात साईबा हॉटेल्स – 30 हजार. यांसह वाइन शॉप माल ठेवणारे सनी होरा यांची 18 हॉटेल्स व बार, दोन वाइन शॉप, तीन बीअर शॉपी व इतर ढाबे (होलसेल लिकर) 3.5 लाख रुपये. बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे 66 बार, 30 वाइन शॉप, 35 बीअर शॉपी 5.5 लाख (होलसेल लिकर), पैलास जगताप व इतर यांचे 11 बार, आठ वाइन शॉप्स, नऊ बीअर शॉपी – 2.5 लाख (होलसेल लिकर), कोरेगाव पार्क व कल्याणीनगर, बालेवाडी हायस्ट्रीट, काsंढवा, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर या भागांतील सर्वच लेट नाइट चालणारे पब्ज, रूफटॉप रेस्टॉरंट्सना प्रत्येकी कमीत कमी 50 हजार रुपये महिना, वाइन शॉप्सचा माल ठेवणाऱ्या परमिट रूमला प्रत्येकी कमीत कमी 20 हजार रुपये महिना, रेस्टॉरंट्स व ढाब्यांच्या ठिकाणी अवैध दारूविक्रीसाठी प्रत्येकी 25 ते 50 हजार रुपये महिना,  श्याम जगवानी व इतर यांच्या 11 वाइन शॉप्समधून होलसेल दारूविक्री व ऑनलाइन होम डिलिव्हरीकरिता 2.5 लाख रुपये महिना, एक्साइज विभाग 12 – प्रत्येक 50 हजार ते 6 लाख रुपये. दारूचे होलसेलर 32 – प्रत्येकी 50 हजार रुपये महिना. 18 ते 20 साखर कारखाने – 50 हजार रुपये महिना असा हप्ता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तुम्ही पुणे उद्ध्वस्त केलं तुम्हाला लाज वाटत नाही का? सुषमा अंधारे, धंगेकरांनी काढले अधिकाऱ्याचे वाभाडे

कल्याणीनगर येखील अपघात प्रकरणानंतर शहरात अवैधरीत्या चालणाऱ्या पब आणि ड्रग्जच्या मुद्दय़ावरून रान पेटवणाऱ्या शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

चला तुम्हाला बेकायदा पब-बार दाखवतो. तुम्ही दर महिन्याला 70 ते 80 लाख हप्ता घेता, याची यादी माझ्याकडे आहे. तुम्ही पुणे उद्ध्वस्त केलंय, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? अशा प्रश्नांचा भडीमार करून विभागाचे जिल्हा अधीक्षक चरणसिंग राजपूत यांना धारेवर धरले.

उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावरील या आंदोलनात माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, येत्या 48 तासात या आस्थापनांवर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अंधारे आणि धंगेकर यांनी दिला.

महायुतीचे मंत्री आले रडारवर

पुण्यात दर 15 दिवसांनी गांजा आणि ड्रग्ज सापडत असेल तर उत्पादन शुल्क विभाग काय करतोय? अधिकारी मंत्र्यांचे आदेश ऐकत नाहीत का? असे सवाल विचारत सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना लक्ष्य केले. आम्ही काही बोललो तर एक्साईज खात्याचे मंत्री आणि आरोग्य प्रशासन विभागाचे मंत्री आमच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याची भाषा करतात. आमच्यावर केस करण्यापेक्षा तुमच्या अधीन असणाऱ्या अधिकाऱ्यांना बोला, असे सुषमा अंधारे यांनी संबंधित मंत्र्यांना सुनावले.