रेमल चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये दोघांचा मृत्यू, 15 हजार घरांचे नुकसान

रेमल चक्रीवादळाचा पश्चिम बंगालमधील काही जिह्यांना फटका बसला. किनारी भागातील उत्तर आणि दक्षिण 24 परगना, पूर्व मेदिनीपूर, दिघा, काकद्वीप, जयनगर, कोलकाता, हुगळी आणि हावडा येथे तब्बल 15 हजार घरांचे प्रचंड नुकसान झाले, तर कोलकाता आणि सुंदरबन येथे दोघांचा मृत्यू झाला. रेमल चक्रीवादळ रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास पश्चिम बंगालच्या पैनिंग आणि बांगलादेशातील मोंगला येथे धडकले. प. बंगालमध्ये 60 तर बांगलादेशात तब्बल ताशी 135 किमी वेगाने वारे वाहिले.

कोलकात्यात 100 हून अधिक झाजे विजेचे खांब उखडले गेले तर अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याचे चित्र होते. कोलकातातील सुभाष चंद्र बोस विमानतळावर 21 तासांनंतर उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली. रेमल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बांगलादेशात बसला. वादळामुळे 7 जणांचा मृत्यू झाला. सरकारने दीड कोटी लोकांच्या घरातील वीजपुरवठा बंद केला होता.