मराठा समाजाने कधीही जातीयवाद केला नाही. पण मतदान होईपर्यंत मराठे चांगले होते आणि मतदान झाले की मराठे वाईट ठरले! हे कसे झाले? असा टोला मुंडेवाडी व्हायरल व्हिडीओवरून मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे. कुणी कितीही उचकावण्याचा प्रयत्न केला तरी मराठा समाजाने शांत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
बीड जिल्ह्यातील मुंडेवाडी येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी बीड जिल्हा संतांची भूमी आहे. बीड जिल्ह्यात असे कधीही झाले नाही. मराठा समाजाने कधीही जातीय राजकारण केले नाही. उलट सर्व समाजाला सोबत घेऊनच मराठा समाजाने राजकारण केले आहे, असे जरांगे म्हणाले. पण मतदान होईपर्यंत मराठे चांगले होते आणि मतदान संपले की मराठे वाईट झाले! हे कसे झाले? असा सवाल जरांगे यांनी केला. मराठा समाजाने अशा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, शांत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अन्याय दूर करायचा असेल तर सत्तेत जावे लागेल
मराठा आरक्षणाचे आंदोलन अजूनही धगधगत आहे. हे आंदोलन संपवण्याची ताकद कुणातही नाही. आंदोलन करण्याचा हक्क घटनेने आपल्याला दिला आहे. आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत असे बजावतानाच मनोज जरांगे यांनी आपल्यावर होणारा अन्याय दूर करायचा असेल तर सत्तेत जावे लागेल, असे मोठे विधान केले. चार जून रोजी आमरण उपोषण सुरू करण्यावर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.