जागावाटपावरून महायुतीत पुन्हा नाराजीनाट्य? वाचा बातमी

लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून महायुतीत नाराजी झालेली दिसून येत आहे. कारण, या जागावाटपात भाजपने 28 जागांवर निवडणूक लढवली तर मिंधे गटाला 15 जागा मिळाल्या. अजित पवार गटाची तर 4 जागांवर बोळवण करण्यात आली. त्यानंतर आता महायुतीत नाराजीचे वारे वाहू लागले आहेत. अजित पवार गटाने आपल्या जागांपैकी एक जागा रासपच्या महादेव जानकर यांना देऊ केल्याने अजित पवार गटाच्या नेत्यांत नाराजी पसरली आहे.

अजित पवार गटाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत ही नाराजी उघड झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या जागांच्या संख्येविषयी जाहीर सूतोवाच केलं असून त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाला 80-90 जागा देण्याचा शब्द भाजपने दिला आहे. त्यामुळे लोकसभेसारखी गत विधानसभेला होता कामा नये, अशी भूमिका अजित पवार गटाच्या बैठकीत छगन भुजबळ यांनी घेतली आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी 80 ते 90 जागांवर दावा केल्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, भाष्य करताना महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे, निश्चितच सर्वात जास्त जागा भाजपला मिळतील, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे आता महायुतीत वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.