देशभरातून महत्त्वाचे…

राजस्थानात पारा 50 वर; पवनचक्की पेटली

राजस्थानात अनेक भागात पारा तब्बल 50 वर गेला असून येथे उष्णतेमुळे पवनचक्की पेटली. पवनचक्कीने पेट घेताच स्थानिकांचे मोबाईल कॅमेरे व्हिडीओ काढण्यासाठी सरसावले. पवनचक्कीचे पंखे एकएक करून जळून खाक झाले आणि खाली कोसळले. पवनचक्कीची अजस्र पाती कडक उन्हामुळे जळून खाक होण्याची ही पहिलीच घटना असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

गोव्यात बसने कामगारांना चिरडले, 4 जण ठार

गोव्यात शनिवारी रात्री वेर्णे परिसरात खासगी बसने रस्त्याकडेला उभारण्यात आलेल्या झोपडय़ांना धडक दिली. या झोपडय़ात झोपलेल्या चार कामगारांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले. मृत झालेले कामगार मूळचे बिहारचे रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. रस्ते बांधणीचे काम करणारे मजूर त्याच रस्त्याच्या कडेला झोपडी बांधून राहत असतांना बसने झोपडय़ांना भुईसपाट करून कामगारांना चिरडले. पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी सांगितले की, या बसचा चालक भरत गोवेकर हा असून, त्याला ताब्यात घेतले. चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तो रात्री मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचे समोर आले.

कतार एअरवेजच्या विमानाचे हेलकावे

रविवारी दोहाहून डब्लिनला जाणारे कतार एअरवेजच्या बोईंग 747 विमानाने तुकाaजवळ खराब हवामानामुळे गटांगळ्या खाल्या. यात 12 जण जखमी झाले. हे विमान सुरक्षितपणे डब्लिनला उतरवण्यात आले. या वेळी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. जखमींमध्ये सहा कर्मचारी आणि सहा प्रवाशांचा समावेश आहे. पाच दिवसांपूर्वीच सिंगापूर एअरलाइन्सच्या एका विमानाला खराब हवामानाचे तडाखे बसल्यामुळे एका ब्रिटिश व्यक्तीचा मृत्यू आणि 12 ते 15 जणांना गंभीर इजा झाली होती.

देशात वाहन अपघातांचे 10.46 लाख दावे प्रलंबित 4

देशभरात 80,455 कोटी रुपयांचे 10,46,163 मोटार अपघात दावे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षात त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे, असे माहिती अधिकारात समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील के सी जैन यांनी एप्रिलमध्ये विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने वरील तपशील दिला आहे.

स्पाइसजेटच्या विमानाला पक्ष्यांची धडक

लेहला जाणारे स्पाईसजेटचे बोईंग 737 विमान रविवारी सकाळी एका इंजिनाला पक्ष्यांची धडक बसल्यामुळे अर्धा तासातच माघारी आणून अकरा वाजता दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. या विमानात सुमारे 135 लोक होते. सर्व जण सुखरूप असल्याचे स्पाईसजेटने म्हटले आहे. विमान सर्वसामान्य प्रकारे उतरवण्यात आले असले तरी विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली होती आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

प्रज्वल पासपोर्ट प्रकरणी केंद्राचा प्रतिसाद नसल्याचा दावा

महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर देशातून पळून गेलेले हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याच्या विनंतीबाबत राज्याला पेंद्राकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाह, असे कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी रविवारी सांगितले. प्रज्वलचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची राज्य सरकारची विनंती 21 मे रोजीच प्राप्त झाल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर म्हणाले होते. त्यावर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1 मे रोजी पाठवलेल्या पत्राचे काय झाले, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.