जगभरातून काही बातम्या…

ब्रिटनमध्ये राष्ट्रीय सेवा अनिवार्य

ब्रिटनमध्ये राष्ट्रीय सेवा अनिवार्य होऊ शकते. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी याबाबतची घोषणा केली. ‘जर कंझर्व्हेटिव्ह पक्षाने भविष्यात सरकार स्थापन केले तर आम्ही राष्ट्रीय सेवा नियम परत आणू. यामुळे राष्ट्रीय भावना निर्माण होईल.’ असे ऋषी सुनक म्हणाले. नॅशनल सर्व्हिस रुल अंतर्गत 18 वर्षांच्या तरुणांना एका वर्षासाठी सैन्यात सामील व्हावे लागेल किंवा 25 दिवसांसाठी पोलिस किंवा राष्ट्रीय आरोग्य सेवा यासारख्या सामुदायिक संस्थांमध्ये स्वयंसेवक व्हावे लागेल. यासाठी सरकार दरवर्षी 26.49 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. 25 मे रोजी झालेल्या निवडणूक प्रचारादरम्यान सुनक यांनी ही माहिती दिली.

क्लास टीचरच्या आवाजात बोलून जाळ्यात ओढले

क्लास टीचरचा आवाज काढून एससी आणि एसटी प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱया मुलींना तो फसवायचा. अर्जात काहीतरी गडबड असल्याचे सांगून निर्जनस्थळी बोलवायचा आणि त्यांच्यावर बलात्कार करायचा. ब्रिजेश कुशवाह (30) असे या सैतानाचे नाव असून त्याला पकडण्यात आले आहे. त्याच्याकडून 16 पह्न जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी याप्रकरणी नऊ सदस्यीय एसआयटीचे पथक तयार केले असून या पथकाला सात दिवसांच्या आत या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पीडितांनी दिलेल्या जबानीमुळे पोलीस आर्श्चयचकित झाले.

युक्रेनच्या खार्किव्ह मार्केटवर रशियाचा हल्ला

तब्बल दोन वर्षांनंतर रशियाने युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला केला असून येथील सर्वात मोठे शहर खार्किव्ह जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आज रशियन सैन्याच्या दोन क्षेपणास्त्रांनी खार्किवमधील हार्डवेअर सुपरस्टोअरवर बॉम्बहल्ला केला. यात किमान 11 जणांचा मृत्यू झाला, तर डझनभर लोक जखमी झाल्याची माहिती आहे. युव्रेनच्या अधिकाऱयांनी या हल्ल्याबाबत दुजोरा दिला आहे. रशियन हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. याशिवाय 16 लोक बेपत्ता असल्याचेही खार्किव्ह प्रादेशिक लष्करी प्रशासन प्रमुख ओलेह सिनिहुबोव यांनी सोशल मीडियावरून प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

भांग पिऊन प्रवाशाचा विमानात दंगा

इंदूर ते हैदराबाददरम्यान विमान प्रवासात एका प्रवाशाने भांग पिऊन चांगलाच दंगा केला. त्याने विमानाचे आपत्कालीन दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या प्रवाशावर करण्यात आला. कर्मचाऱयांच्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली. प्रवासात तो सर्वांशी गैरव्यवहार करत होता. थोड्या वेळाने त्याने तीर्थयात्रेसाठी आलेल्या त्याच्या मित्रांजवळ बसण्याचा हट्ट सुरू केला. मात्र, इतरांनी समजूत काढल्यानंतर तो थांबला. काही वेळानंतर त्याने पुन्हा दंगा सुरू केल्याचे विमान कर्मचाऱयांनी सांगितले. या प्रवाशांने विमान कर्मचारी आणि इतर प्रवाशांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले होते.

इस्रायली सैनिकांना बोगद्यात सापळा रचून पकडले

इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षाला नवे वळण लागले आहे. अनेक इस्रायली सैनिकांना बोगद्यात सापळा रचून पकडल्याचा दावा हमासने केला असून मोठय़ा संख्येने सैनिकांना ओलीस ठेवल्याचे म्हटले आहे. हमासच्या अल-कासिम ब्रिगेडचे प्रवक्ते अबू उबैदा यांनी रेकॉर्ड केलेल्या संदेशाद्वारे ही माहिती दिली, मात्र किती जवानांचे अपहरण करण्यात आले याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. इस्रायलचे सैनिक बोगद्यात शिरताच त्यांच्यावर हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात काही सैनिकांचा मृत्यू झाला. अनेक जखमीही झाले. त्यानंतर बाकीच्या ज्यू सैन्याने तेथून माघार घेतली.