साहित्य जगत – घराची ओढ

>> रविप्रकाश कुलकर्णी

चार भिंतींमध्ये आयुष्य सुरक्षित आहे हे ज्या क्षणाला माणसाला कळले तेव्हापासून त्याची दिशाहीन भटकंती, वणवण संपली आणि त्याची घराची ओढ जी सुरू झाली ती या क्षणापर्यंत. नव्हे ही आस कधीही न संपणारी आहे. कवी मंडळींनी ही भावना वेळोवेळी व्यक्त केलेली आहे.

सर्वसामान्य माणूस माझे घर म्हटले की, तो आठवणीने भावविभोर होऊन जातो. पण कधीकधी हा आठवणींचा बांध फुटला की, मात्र त्याला आवर घालणे मुश्कील होऊन जाते.

अपर्णा देविदास राईरीकर यांनी गुरुवर्य विष्णू गोविंद ऊर्फ अण्णासाहेब विजापूरकर यांचे शैक्षणिक कार्य व शैक्षणिक विचार यांचा चिकित्सक अभ्यास करून पीएचडी मिळवली. अध्यापन क्षेत्रात त्या सुखनैव रमल्या, पण कुठल्या गोष्टीला काय निमित्त होईल हे सांगता येत नाही. अपर्णा राईरीकर सांगतात, ‘माझे घर तसे छोटेसेच होते. अध्यापक निवासातील दोन खोल्या, दोन्ही बाजूला व्हरांडा आणि पुढे मोठे अंगण, मागे परसबाग अशी साधारण रचना. तळेगाव दाभाडे येथील नवीन समर्थ विद्यालय या शाळेच्या आवारात असलेली ही चाळ आणि त्यातील एक माझे घर होते. पाच-सहा वर्षांपूर्वी ही वास्तू जुनी झाल्यामुळे संस्थेने पाडून टाकली. अचानक विद्यालयात गेले असताना आपले घर दिसेना, तेव्हा खूप वाईट वाटले. पण याच चाळीने जवळ जवळ 100 वर्षे साथ दिली होती. घर म्हणजे केवळ चार भिंती व छप्पर नव्हे, तर त्यातील माणसांची वैचारिक, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक देवाणघेवाण होय. माझ्या घरातील आठवणी दाटून आल्या. मन भूतकाळात घिरटय़ा घालू लागले. माझ्या जन्मापासून ते 30 वर्षांपर्यंत माझे वास्तव्य याच घरात होते. आठवणींचा गहिवर दाटून आला आणि त्यातून ‘ते माझे घर’ या स्मृतिग्रंथाची निर्मिती झाली. आई, वडील, बहीण, नातेवाईक, शेजारी, मित्र-मैत्रिणी, गावातील आपलीच असणारी घरे, परिसर या सर्वांच्या आठवणी पाहता पाहता माझ्या घराचा विस्तार वाढला आणि एक सर्वसमावेशक असे माझे घर अस्तित्वात आले.

या घरात लेखिकेचा एवढा गोतावळा आहे, ज्याला हा घरातला आणि हा बाहेरचा असा धरबंद नाही. लेखिका अंबिके अक्कांबद्दल त्या सांगतात, ‘आक्कांचे नऊवारी साडी नेसणे एक सुंदर ठेवा होता. पूर्वी नवीन साडी, कपडे घेतले की, ते प्रथम देवासमोर ठेवले जाई. साडीच्या निऱया करून वर ब्लाऊज पीस ठेवून हळद-कुंकू वाहून देवाला नमस्कार केला जाई.’

अंबिके गुरुजी यांच्याबद्दल त्या सांगतात, ‘मराठी वाङ्मयाची खूप आवड असल्यामुळे ते आम्हाला त्या-त्या लेखकांची, कवींची माहिती देत. शाळेत त्या वेळी मराठी लेखक व कवी यांच्या फोटोची एक पेटी होती. त्या वेळी अंबिके गुरुजी आम्हाला कवी व लेखक यांचे फोटो दाखवीत. त्यामुळे ज्ञानाची क्षितिजे वाढत गेली.’

गुरुवर्य विजापूरकर यांची एक बोलकी आठवण लेखिकेने सांगितली आहे, ‘एकदा श्री गणेशोत्सवात ते चाफेकरांकडे जेवायला गेले. गुरुवर्यांनी परकीय म्हणून साखर सोडली होती. रंगूताईंनी केलेले साखरेचे मोदक गुरुवर्य यांना खाणे जमणार नव्हते. मग त्या माऊलीने मध घालून मोदक करून गुरुवर्य यांना वाढले. त्यांनी मोठय़ा आवडीने ते मोदक खाल्ले. जेव्हा रंगूताईंनी ते मोदक खाऊन पाहिले तर ते खूप कडू लागले. त्यांनी त्याबद्दल गुरुवर्य यांना विचारले. गुरुवर्यांनी त्यांना उत्तर दिले, ‘मला मोदक आवडले, कारण त्यात प्रेम भरलेले होते.’

लेखिका आपल्या आईच्या रांगोळीबद्दल लिहिते, ‘ती एक पुष्पक विमान काढी. त्यात ‘श्रीराम’अक्षरे असत. ती नेहमी असे म्हणे की, याच विमानातून मी स्वर्गात जाणार अशी तिची कल्पना असे.’ या रांगोळीचे साधे-सोपे चित्र या पुस्तकात दिलेले आहे. या पुस्तकात राईरीकर यांनी अनेक कृष्णधवल फोटो दिलेले आहेत. त्यामध्ये एक फोटो आहे पंडित भीमसेन जोशी आणि त्यांच्या पत्नी सुनंदा जोशी. आणि आनंद भीमसेन जोशी यांचे पत्रही बोलके आहे.

हे सर्व वाचून तळेगावमधल्या लोकांना त्यांच्या गावाची अधिक ओळख पटेल आणि इतरांना हे तळेगाव हवेहवेसे वाटायला लागेल. ‘ते माझे घर’ हे पुस्तक हा अनुभव देते.