कल्याणीनगर येथील भयंकर अपघाताचे प्रकरण हाताळताना पुणे पोलिसांनी निष्काळजीपणा केला. त्यामुळे केवळ पुण्यातच नाही, तर देशभरात तीव्र पडसाद उमटले. अखेर जनतेच्या रेटय़ामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दोषी अधिकाऱयांवर कारवाई केली आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना निलंबित करण्यात आले असून, तपासात दिरंगाई व अपघाताची वरिष्ठांना वेळेत माहिती न देणे, असा ठपका या दोन अधिकाऱयांवर ठेवण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी येरवडा पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱयांनी निष्काळजीपणा, दिरंगाई केल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे, अशी कबुली त्यांनी दिली. त्यानंतर सायंकाळी पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. गंभीर अपघात झाल्यानंतरही पोलीस उपायुक्तांना अपघाताची माहिती देण्यात आली नव्हती. पोलीस आयुक्तांनी त्यांची चौकशी केली होती. गांभीर्यपूर्ण तपास न करणे, दिरंगाई, वरिष्ठांना वेळेत माहिती न देणे यामुळे दोघांना आज निलंबित केले आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आतापर्यंत पोलिसांनी केलेली कारवाई आणि तपासाची माहिती दिली. अपघात केल्यानंतर अल्पवयीन मुलाला आरोपीप्रमाणे वागणूक दिली नाही. आरोपीच्या नातेवाईकांनी त्याला येरवडा पोलीस ठाण्यातच पिझ्झा-बर्गर खायला दिले, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता अमितेश कुमार म्हणाले, आरोपीला खाण्यासाठी बाहेरील पदार्थ दिले नाहीत.
आमदार पोलीस ठाण्यात आले होते
अपघातानंतर अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे येरवडा पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप होत आहे. यावर पोलीस आयुक्तांनी आमदार पोलीस ठाण्यात आले होते हे सत्य आहे अशी कबुली दिली.
रिपोर्टवर अवलंबून नाही
‘अपघातानंतर अल्पवयीन आरोपी मुलाची रविवारी (दि. 19) सकाळी ससूनमध्ये रक्ताची चाचणी करण्यात आली. खबरदारी म्हणून रात्री साडेआठच्या सुमारास त्याची दुसऱयांदा रक्तचाचणी खासगी रुग्णालयात करण्यात आली. या रक्तचाचणीचे अहवाल अद्यापि मिळाले नाहीत. मात्र, आमचा तपास ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाही,’ असे पोलीस आयुक्त म्हणाले.
चालक बदलण्याचा प्रयत्न
काही काळाने कारचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला हे सत्य आहे. ड्रायव्हरने सुरुवातीला म्हटले होते की, त्यानेच कार चालवली होती. कोणाच्या दबावामुळे हे म्हटले, याचा तपास सुरू आहे,’ असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, येरवडा पोलिसांकडून सहा दिवसांनी तपास काढून घेतला आणि गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
कलम 304 लावण्यास उशीर का झाला?
दोन एफआयआर का नोंदविले? कलम 304 लावण्यास उशीर का झाला? असे प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले. त्यावर पोलीस आयुक्त म्हणाले, ‘रविवारी पहाटे साडेतीनला अपघात झाल्यानंतर येरवडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. सकाळी साडेआठच्या सुमारास कलम 304 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला. परंतु, या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सकाळी 11 ते 12 दरम्यान आरोपीवर भादंवि कलम 304 लावण्यात आले. एकाच दिवशी ते दाखल झाले. त्यामुळे दोन एफआयआर नोंदवले, असे म्हणता येणार नाही.’
अपघातावेळी कारमध्ये चौघेजण
त्या रात्रीचे सर्व चित्रीकरण आमच्याकडे आहे. पबमधील पार्टीमध्ये 10 ते 12 जण होते. अपघातावेळी कारमध्ये चौघे जण होते, असे त्यांनी सांगितले.