>> डॉ. सच्चिदानंद सुरेश शेवडे
‘पण मी काय म्हणतो’ने वाक्याची सुरुवात आणि ‘हा ना राव’ने वाक्याची अखेर करणारे बडोद्याचे प्रख्यात स्तंभलेखक, राष्ट्रविचारक, वक्ते डॉ. दामोदर विष्णू नेने (दादूमिया) यांचे नुकतेच निधन झाले. स्वमताचे आग्रही, पण तरीही परमत जाणून घेणारे असे ते व्यासंगी व्यक्तिमत्त्व होते! राष्ट्रविचारकांच्या पंक्तीतील एका पर्वाची 95 व्या वर्षी अखेर झाली. त्यांनी आपल्याकडील जवळपास पाच सहस्र दुर्मिळ व उत्तमरीत्या बाइंड केलेल्या पुस्तकांचा खजिना स्वामी गोविंददेव गिरी यांच्या आळंदी येथील वेदश्री प्रकल्पाच्या ग्रंथालयाकडे सुपूर्द केला होता. बडोद्यातील त्यांच्या व आमच्या घरातील अंतर केवळ चार मिनिटांचे होते. कोविडनंतर ते रावपुरा सोडून अन्यत्र अधिक मोठय़ा घरात राहायला गेले. बडोद्याला गेलो की, दादूमियांकडे जाऊन गप्पा मारणे हा आनंदानुभव असायचा. गुजराती टोनच्या खास बडोदा मराठीत ते संवाद साधायचे. गप्पांच्या नादात काही तास वाहून जायचे. अनेक विषयांसोबत आमचे सद्गुरू स्वामी वरदानंद भारती हा कॉमन विषय असायचा. स्वामीजींची पुस्तके म्हणजे ‘हिंदुत्वाचा ज्ञानकोश’ आहे, असे ते म्हणत. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या सुविद्य पत्नी वैजयंतीकापूंचे पाहुणचारावर विशेष लक्ष असे. 1931 मध्ये सधन घराण्यात जन्मलेल्या आणि डॉक्टरकीचे शिक्षण घेतलेल्या या अवलिया लेखकाने आपल्या एका मुस्लिम रुग्णाच्या नावावरून ‘दादूमिया’ हे टोपण नाव घेतले. ‘माणूस’, ‘केसरी’, ‘सोबत’, ‘धर्मभास्कर’, ‘सामना’, ‘पॅरावान’, ‘विकली’ अशा अनेक नियतकालिकांतून त्यांनी स्तंभलेखन केले. त्यांचे आजोबा व वडील हे महाराजा सयाजीराव (तिसरे) गायकवाडांचे स्वीय सहाय्यक होते. 1956 पासून सुरू केलेल्या रुग्णसेवेसोबतच त्यांनी लेखन, वाचन आणि व्याख्यानाची आवडही जोपासली. मराठीसोबतच ते इंग्रजी व गुजरातीतही लेखन करीत असत.
उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात्परं बलम।
सोत्साहस्य च लोकेषु न किंचिदपि दुर्लभम।।
(ज्याच्या ठायी अमर्याद उत्साहाचा झरा आहे तो बलवान मनुष्य असतो. उत्साहाइतके बलवान काहीच नसते. जो उत्साहाने ओतप्रोत भरलेला असतो त्याच्यासाठी काहीच दुर्लभ नसते.)
जुन्या पिढीतील व शिकागोस्थित असलेल्या श्रीधर दामले, मुंबईतील अरविंद विठ्ठल कुलकर्णी आदींशी त्यांचे उत्तम जमे, तर नंतरच्या पिढीतील आमच्यासारखे कित्येक जण व नव्या पिढीतील विक्रम मानेकर व चिरायू पंडित आदींशी त्यांचे जमत असे. 1966 साली ‘पॅन इंदिरा अॅक्सेप्ट धिस चॅलेंज’ हे त्यांचे पहिले पुस्तक ‘विजयानंद भारती’ या टोपणनावाने प्रसिद्ध झाले. या पुस्तकाची दखल खुद्द इंदिरा गांधींनी घेतली. कालांतराने दादूमियांशी त्यांची भेटही घडली. याखेरीज ‘दलितांचे राजकारण’, ‘श्रीमंत सयाजीराव गायकवाड’, ‘मोदी एक झंझावात’, ‘गुजरातला जेव्हा जाग येते’, ‘मुस्लिम अपिझमेंट’ आणि ‘धास्तावलेले मुसलमान’ ही त्यांची पुस्तकेही गाजली. सयाजीरावांवरील पुस्तकात त्यांनी जर्मनीत हिटलरशी ‘शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र’ या न्यायाने सयाजीरावांनी गुप्त करार केला होता, असे नमूद करून खळबळ माजवली होती. ‘एनसाक्लोपीडिया हिंदुस्थानिका’ या अनेक खंडी प्रकल्पाचे कामही ते करीत होते.
संघकार्याला मानणारे असल्यामुळे मोदी, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब देवरस यांच्याशी त्यांची जवळीक होतीच, पण विरोधी विचारांच्या यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, ना. ग. गोरे व एस. एम. जोशी यांच्याशीही त्यांचा स्नेह होता. वाचकप्रिय असलेल्या दादूमियांचा लोकसंग्रहही मोठा होता. बोलताना ते ज्या आविर्भावात बोलत ते पाहून व ऐकून समोरचा माणूस त्यांचा फॅन होत असे. जुन्या पिढीतील एकेक तारे अस्तंगत होताहेत. तथापि, त्यांनी साहित्य रूपाने त्यांचा ठेवा पुढय़ा पिढय़ांच्या हाती सुपूर्द केला आहे. त्यातून विचारकण वेचणे हे आपल्या हाती आहे.