रात्रीत 85; अडीच वर्षांत 1078 केसेस; ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह केवळ थर्टी फर्स्ट पुरतीच

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर जागे झालेल्या वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्राइव्ह म्हणजेच दारू पिऊन वाहन चालविणाऱयांच्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली असून, मंगळवारी रात्री शहरातील विविध भागांत नाकाबंदी करून 85 मद्यपि चालकांवर कारवाई केली. या मोहिमेत एका रात्रीत 85 जण दारू पिऊन वाहन चालविताना सापडले, तर दुसरीकडे मागील अडीच वर्षांत म्हणजेच 2022 ते 2024 (मे) केवळ 1 हजार 078 जणांवर ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची कारवाई झाली आहे. त्यामुळे दारू पिऊन वाहन चालविणाऱयांचे प्रमाण मोठे आहे. परंतु त्यांच्यावर कारवाईची यंत्रणा कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंगळवारी रात्री वाहतूक पोलीस तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱयांनी मध्यरात्री बारानंतर पहाटेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांत नाकाबंदी केली. विशेषतः चतुःशृंगी, येरवडा, विमानतळ, मुंढवा आणि कोरेगाव पार्क या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी दोन ठिकाणी व उर्वरित पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एका ठिकाणी अशी एकूण 37 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.

घोळक्याने दंडवसुली

शहर परिसरात चौकाचौकांत वाहतूक पोलीस नियमासाठी उभे असतात. मात्र, वाहतूक पोलिसांकडून केवळ वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचे काम सुरू आहे. अनेक भागात चौकाऐवजी रस्त्याच्या एका कोपऱयाला उभे राहून पोलीस दंडवसुली करत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते. मात्र, थर्टी फर्स्ट वगळता त्यांच्याकडे ब्रेथ अॅनालायझर मशीन दिसून येत नाही.