हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्यासह सर्व नऊ जणांची एकत्र अंत्ययात्रा काढण्यात आली. तबरीझ शहरात काढण्यात आलेल्या या अंत्ययात्रेत लाखो लोक इराणी ध्वज घेऊन सहभागी झाले. 23 मे रोजी मशहद या जन्मगावी रईसी यांचा अंत्यविधी होणार आहे.
1९ मे रोजी अझरबैजान येथून इराणकडे परत येत असताना इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर घनदाट जंगलात कोसळले. या अपघातात इब्राहिम रईसी, परराष्ट्र मंत्री हुसैन अमीराब्दुल्लाहियान यांच्यासह नऊ जण ठार झाले होते. या सर्वांचे मृतदेह सोमवारी तबरीझ शहरात आणण्यात आले. मंगळवारी तबरीझ येथे नऊ जणांची एकत्रित अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते. 23 मे रोजी मशहद या जन्मगावी रईसी यांचा अंत्यविधी होणार आहे.
इस्रायलच्या ‘मोसाद’चा बालेकिल्ला
राष्ट्रपती रईसी यांच्यासह नऊ जणांच्या झालेल्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या भागात हेलिकॉप्टर कोसळले तो इस्रायली गुप्तचर विभाग मोसादचा बालेकिल्ला समजला जातो. अझरबैझान हा मध्य आशियातील एकमेव मुस्लिम देश असून त्याचे इस्रायलशी मैत्रीचे संबंध आहेत तर इराणशी तणावपूर्ण संबंध आहेत. रईसी हे 45 वर्षे जुन्या हेलिकॉप्टरने प्रवास करत होते. खराब हवामान असतानाही वैमानिकाने उड्डाण करण्याची जोखिम का पत्करली, असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे.
28 जून रोजी राष्ट्रपती निवडणूक
इराणमध्ये सध्या राजकीय अस्थिरता आहे. याच अस्थिर वातावरणात 28 जून रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी 20 जूनपासून नोंदणी सुरू होणार आहे. इराणच्या राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींचा आकस्मिक मृत्यू झाल्यास उपराष्ट्रपतींकडे ही जबाबदारी देण्यात येते आणि 50 दिवसांत निवडणुका घेण्यात येतात. रईसी यांच्या अपघातील निधनानंतर उपराष्ट्रपती मोहंमद मुखबर यांना हंगामी राष्ट्रपती बनवण्यात आले आहे. मुखबर हे इराणचे हिंदुस्थानातील विशेष दूत होते.