महाराष्ट्रात या मतदारसंघात झालं सर्वाधिक मतदान, वाचा बातमी

लोकसभा निवडणुकांसाठी राज्यातील पाचही टप्प्यातील मतदान सोमवारी संपलं. 20 मे रोजी मुंबईसह 13 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं. मुंबईकरांनी मतदानाचा उत्साह दाखवला असला तरी आयोगाच्या ढिसाळ नियोजनामुळे मुंबईकरांच्या मतदानाची टक्केवारी पिछाडीवर असल्याचं दिसून आलं. राज्यात झालेल्या पाच टप्प्यांपैकी पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्यात सर्वाधिक मतदान झाल्याचं दिसून आलं आहे.

तसंच, महानगरांपेक्षा ग्रामीण भागात मतदार अधिक जागरुक असल्याचंही दिसून आलं आहे. महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत यंदा मतदान किती झालं, तसंच सर्वाधिक मतदान झालेले 10 मतदारसंघ कोणते आहेत, याची आता उत्सुकता अनेकांना लागली आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक 63.71 टक्के मतदान झालं असून दुसऱ्या टप्प्यात 62.71 टक्के मतदान झालं आहे. तिसऱ्या टप्प्यात पुन्हा मतदानाची टक्केवारी वाढली असून 63.55 टक्के मतदान झालं. चौथ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरुन 59.64 टक्क्यांवर गेली. शेवटच्या टप्प्यात या आकडेवारीत आणखी घसरण झाली आणि पाचव्या टप्प्यात अवघं 54.33 टक्के इतकं मतदान झालं.

महाराष्ट्रात यंदा लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान करणाऱ्या मतदारसंघात गडचिरोली चिमूर मतदारसंघाचा पहिला क्रमांक लागला आहे. सर्वाधिक मतदान झालेल्या जिल्ह्यात गडचिरोली-चिमूर – 71.88, कोल्हापूर – 71.59, हातकणंगले – 71.11, नंदूरबार – 70.68, बीड – 70.92, जालना – 69.14, चंद्रपूर – 67.55, भंडारा गोंदिया – 67.04, नगर – 66.16, वर्धा – 64.85 यांचा समावेश आहे.