पुण्यात भरधाव वेगाने पोर्श गाडी चालवून एका अल्पवयीन मुलाने दोन इंजिनियर तरुण-तरुणीला धडक दिली. त्यात त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही गाडी अतिशय महागडी आणि आलिशान गाडी म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, ती गाडी चालवणारा चालक हा अवघा 17 वर्षांचा होता. या अपघातानंतर जमावाने या मुलाला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं. हा मुलगा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याचा मुलगा आहे.
आपल्या अल्पवयीन मुलाच्या हातात इतक्या महागड्या गाडीची चावी देणाऱ्या विशाल अग्रवाल यालाही संभाजीनगरहून अटक करण्यात आली आहे. यानंतर विशाल अग्रवाल नेमका कोण, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. विशाल अग्रवाल हा ब्रह्मा कॉर्प या बांधकाम उद्योग समुहाचा प्रमुख आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून हा समूह पुण्यात बांधकामाचा व्यवसाय करतोय. ब्रह्मदत्त अग्रवाल हे या समूहाचे संस्थापक होते. या समूहात अनेक कंपन्या आहेत. पुण्यातल्या वडगाव शेरी, खराडी, विमान नगर या भागातील अनेक मोठे गृहप्रकल्प या समूहातील कंपन्यांनी उभारले आहेत. तसंच, पुण्यातील प्रसिद्ध ली मेरिडियन हॉटेल, रेसिडेन्सी क्लब यांसारखी बांधकामंही केली आहेत.
विशाल अग्रवाल यांच्याकडे वंशपरंपरेने या समूहाची मालकी आली असून सध्या या समूहाची मालमत्ता सुमारे 6 कोटी 1 लाख 20 हजार इतकी आहे. विशाल याच्या मोठ्या मुलानेही काही दिवसांपूर्वी वडगाव शेरी भागात वेगाने गाडी चालवून इतर वाहनांचं आणि विजेच्या खांबाचं नुकसान केलं होतं. मात्र, ते प्रकरण दाबण्यात आलं होतं.