पराभवाची खात्री झाल्यानेच भाजप, मिध्यांनी मतदान यंत्रणा बिघडवली; संजय राऊत निवडणूक यंत्रणेच्या कासवगतीवर संतापले

Pc - Abhilash Pawar

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासादर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक यंत्रणेच्या मतदाना प्रक्रियेतील कासवगतीबाबत संताप व्यक्त केला आहे. या 13 मतदारसंघात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना पराभवाची खात्री झाल्यानेच त्यांनी मतदारयंत्रणा बिघडवली, असेही संजय राऊत यांनी सांगितले. तरीही जनतेने चिकाटी दाखवत मतदान केले, त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

मतदानाच्या प्रक्रियेचा वेग संथ होता. जनतेला मतदानासाठी मोठ्या रांगेत उभे राहावे लागत होते. त्यामुळे मोठ्या रांगांना कंटाळून लोक निघून जातील, त्यांना मतदानच करता येणार नाही, अशा प्रकारची यंत्रणा सोमवारी राबवण्यात आली का, अशी शंका उपस्थित होत आहे. आपल्याला जातीय किंवा प्रांतीय वाद करायचा नाही. मात्र, ज्या ठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) किंवा महाविकास आघाडीला भरघोस मतदान होण्याची शक्यता आहे, त्याठिकाणीच अशी कासवगतीने यंत्रणा राबवण्यात आली, असेही संजय राऊत म्हणाले.

भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांना मते मिळतील, अशा ठिकाणी व्यवस्थित, योग्य रीतीने यंत्रणा सुरू होती,असेही राऊत यांनी सांगितले. आम्ही जागरूक असल्याने त्यांना ईव्हीएम हॅक करता आले नाहीत. त्यांनी पैसे वाटले, ते आम्ही पकडले, तरीही त्यांनी पैसे वाटले. त्यामुळे त्यांनी यंत्रणा कासवगतीने चालवली. मतदानासाठी आलेल्या जनतेचा छळ करायचा, अनेकांना चार-चार तास रांगेत उभे राहावे लागले. डिजीटल इंडिया असताना मतदानासाठी चार तास कसे लागतात, असा संतप्त सवालही राऊत यांनी केला. बॅलेट पेपरवर मतदानाला वेळ लागला तर समजू शकतो. मात्र, ईव्हीएम आणि डिजीटल इंडिया असताना एवढा वेळ लागतो याचा अर्थ मोदी यांचे डिजीटल इंडियाही अपयशी ठरले आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत अशाप्रकारे केविलवाणा प्रयत्न केला आहे. मात्र, मतदारांवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. जनतेने रांग सोडू नये, रांगेतच उभे राहवे मतदानाला कितीही वेळ लागला, पहाट उजाडली तरी चालेल, असे आवाहन आम्ही जनतेला केले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी रात्री 11 वाजेपर्यंत मतदान सुरू होते. तरीही अनेक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही, हे दुर्देवाने आपल्या लोकशाहीत घडले आहे.

अशा प्रकारे कासवगतीने यंत्रणा राबवत लोकशाहीचा आणि निडणुकीचा अपमान करण्यात आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत आपण अनेक ठिकाणी जात मतदानप्रक्रियेची पाहणी केली. राज्यातील 13 मतदारसंघात जाणूमबुजून यंत्रणा बिघडवण्यात आली, असेही संजय राऊत म्हणाले. या तेराही मतदारसंघात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव होत असल्याची खात्री झाल्याने त्यांच्याकडून हा शेवटचा डाव टाकण्यात आला. तरीही मतदारांनी चिकाटी दाखवत मतदान केले. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीच जिंकणार असा दावा त्यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाला हाताशी धरत त्यांनी ही यंत्रणा बिघडवली. यंत्रणा बिघडवण्यात भाजप, मिंधे आणि अजित पवार तरबेज आहेत. जे मतदानासाठी पैसे वाटू शकतात, ते यंत्रणाही भ्रष्ट करू शकतात. निवडणूक प्रक्रियेतील संथपणा आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. भाजप आणि मिंधे गटाचे कार्यकर्ते मतदानाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याचे दिसून आले आहे.

पुण्यातील अपघातप्रकरणी पोलीस आयुक्तांना तातडीने बडतर्फ करण्यात यावे. माजुरडा, दारुड्या मुलगा जो एका बड्या बिल्डरचा मुलगा आहे, त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. अजित पवार गटाचे आमदार आणि पोलीस आयुक्त यांच्या दबावामुळे हे प्रकरण दाबण्यात येत आहे. दोन निष्पाप जीवांचे बळी घेणाऱ्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात यावी, यात त्या बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहे. त्यामुळे पुण्याच्या पोलीस आयुक्तांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.