मुलुंड, भांडुपमध्ये पोलिसांची दडपशाही

मतदारांच्या मदतीसाठी शिवसैनिकांनी डमी ईव्हीएमचे प्रात्यक्षिक दाखवले. मात्र पोलिसांनी पोलिंग बूथवर गर्दी केल्याचे कारण देत मुलुंड आणि भांडुपमधील शिवसैनिकांना ताब्यात घेतले. मुलुंड येथील वॉर्ड क्रमांक 105 येथील पत्राचाळीतून सात ते आठ शिवसैनिकांना अटक करण्यात आली. काही काळानंतर दोन्ही ठिकाणच्या शिवसैनिकांना सोडून देण्यात आले. याप्रकरणी भांडुपमधील पोलिसांना आमदार सुनील राऊत यांनी फैलावर घेतले.

निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाची शाखा संजय राऊत

निवडणूक आयोग, निवडणूक यंत्रणा ही संपूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या पकडीत आहे. तरीही आमच्यासारखे पक्ष जिद्दीने निवडणूक मैदानात उतरले आहेत. पैशांचे वाटप करणाऱयांना वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाव घेतात. प्रचंड पैशांचे वाटप केले जाते; पण तिकडे निवडणूक आयोगाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. मतदारांना मार्गदर्शन करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाची अशी कोणतीही नियमावली नाही. तरीही शिवसैनिकांना अटक करण्यात आली. 4 जूनला त्यांना समजेल की तुमचा दबाव, पैशांचे वाटप झुगारून लोकांनी मतदान केले, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

कोणत्याही दबावाला शिवसेना बळी पडणार नाही ः सुनील राऊत

डमी ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक दाखवताना भांडुप येथील मतदार पेंद्रावरून दोन शिवसैनिकांना अटक केल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील राऊत यांना कळले. त्यामुळे सुनील राऊत प्रचंड संतापले आणि त्यांनी पोलिसांना झापले. तसेच याप्रकरणी त्यांना जाब विचारला. आमचे कार्यकर्ते 100 मीटरच्या बाहेर होते. आमच्या टेबलवर मतदारांना मार्गदर्शन करत होते. ही दडपशाही सुरू असून शिवसेना कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. ईशान्य मुंबईतील जनतेने ठरवले आहे, संजय दीना पाटील यांना दिल्लीला पाठवायचे. भाजपला पराभव दिसतोय त्यामुळेच पोलिसांवर दबाव आहे. तसेच कालपासून आम्हाला प्रचंड त्रास दिला जातोय, अशी प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

वरळीतही वेळकाढूपणा   

वरळी येथील गणपतराव कदम मार्ग महापालिका शाळेतील बूथ क्रमांक 161 आणि 162 या बुथवर जाणूनबुजून वेळकाढूपणा करण्यात आला. दोन दोन तास रांगेत उभे राहूनही मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येत नव्हता. त्यामुळे पंटाळून अनेक मतदार पुन्हा घरी गेले तर रांगेत उभ्या असलेल्या काही मतदारांना भोवळ आणि वांत्याही झाल्या. याबाबत आमदार सुनील शिंदे यांनी संबंधित बूथवर जाऊन कर्मचा-यांना जाब विचारला तसेच पोलीस प्रशासन व निवडणूक अधिकारी यांना बोलावून निवडणूक प्रक्रियेतला भोंगळ कारभार लक्षात आणून दिला. यावेळी वरळी विधानसभा संघटक निरंजन नलावडे, शाखाप्रमुख दीपक बागवे, प्रसाद सावंत उपस्थित होते.