मतदानाला मुद्दाम उशीर केला? ढिसाळ नियोजनावरून रोहित पवारांचा सवाल

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी पार पडलं. मुंबईत मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला असला तरी निवडणूक आयोगाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका मतदारांना बसला. अनेक ठिकाणी मतदारांची गैरसोय झालेली पाहायला मिळाली. काही ठिकाणी मतदार याद्याच गायब झाल्याचे प्रकार घडले तर अनेक ठिकाणी मतदानाची प्रक्रिया कूर्मगतीने सुरू असल्याने केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागलेल्या आढळल्या. दरम्यान, याच सावळ्यागोंधळावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी एक व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे.

रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून दहिसर येथील अशोकवन भागातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. येथील मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत असून साध्या सावलीची व्यवस्थाही करण्यात आलेली दिसून येत नाही. त्यावरून रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले की, मुंबईत मतदारांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या असून मतदानाला मुद्दाम उशीर केला जात असल्याचं लोक सांगतात. डोळ्यासमोर पराभव दिसत असल्याने लोकांना मतदानच करता येऊ नये याचा सापळा तर निवडणूक आयोगाला हाताशी धरून रचला नाही ना, अशी दाट शंका येते, असं रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘पण ही निवडणूक #लोकशाही आणि #संविधानाच्या अस्तित्वाची आहे. त्यामुळे आज एक दिवस कितीही त्रास झाला तरी तो सहन करून मतदारांनी कितीही उशीर झाला तरी मतदान करावं, ही विनंती!’ असं आवाहनही रोहित पवार यांनी मतदारांना केलेलं यावेळी पाहायला मिळालं.