आचारसंहितेची ऐशी की तैशी; मतदानाच्या आदल्या दिवशीही भाजपकडून प्रचार, आदित्य ठाकरे यांची कारवाईची मागणी

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराची मुदत शनिवारी सायंकाळी 5 वाजता संपली. मात्र त्यानंतरही भारतीय जनता पक्षाकडून प्रचार सुरू आहे. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्याची पोलखोल केली असून निवडणूक आयोगाने त्यासंदर्भात कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला ट्विट करून माहिती दिली आहे. ‘राज्यातील बेकायदेशीर राजवटीचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून दक्षिण मुंबईच्या पेडर रोडवरील धीरज अपार्टमेंट्समध्ये प्रचार केल्याचे दिसून आले आहे. लोढा फाऊंडेशनच्या नावाने त्यांनी ‘प्रेम कोर्ट’, ‘माहेश्वरी निकेतन’, आणि ‘आनंद दर्शन’ यांना निमंत्रण पाठवले आहे. तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही आपल्याला भेटू इच्छितो, मित्रमंडळींसह या. असे आवाहन त्यात करण्यात आले आहे,’ असे आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले आहे. तत्पूर्वी त्यांनी, तुमच्याकडून जास्त पृतीची अपेक्षा नाही, पण तरीही तुमचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत आहे, असेही नमूद केले आहे.

निवडणुकीच्या एक दिवस आधी केलेला हा प्रचार आहे. यावर तातडीने पाऊल उचलून निवडणूक आयोगाने या प्रकाराला लगाम घालावा किंवा मग इतर उमेदवारांनाही त्याच ठिकाणी लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्याच वेळी जाण्याची मुभा द्यावी, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. हा प्रकार म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन असून संबंधित सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवांवर गुन्हा का दाखल करू नये? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. हा प्रकार थांबला नाही तर शिवसेनाही त्या ठिकाणी जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेईल, असा इशाराही त्यांनी ट्विटमध्ये दिला आहे.

भाजप अल्पसंख्याक विभागाचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजप अल्पसंख्याक विभागाच्या मुंबई स्तरावरील 100 पदाधिकारी आणि 500 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे उद्धव ठाकरे यांनी पक्षात स्वागत केले. भाजप अल्पसंख्याक मोर्चा मुंबई सेक्रेटरी मोहम्मद हसन अकबर नदाफ, मुंबई सदस्य फातिमा अन्सारी, भाजप शिवडी विधानसभा अल्पसंख्याक महामंत्री मरगुब अन्सारी, अल्पसंख्याक मोर्चा मुंबई सदस्य नदीम खान, मोर्चा सचिव फरदिन खान, रियान शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले. यावेळी शिवसेना नेते व दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई, विभागप्रमुख महेश सावंत, कल्याण लोकसभा निरीक्षक बाबाजी शिंदे उपस्थित होते.