जालना जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनना विरोधात महसूल विभागाने शनिवारी 18 मे रोजी धडक कारवाई करून अनेक वाहने व वाळूसाठे जप्त केले. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार व निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्या नेतृत्वाखाली जालना, बदनापूर, घनसावंगी,जाफ्राबाद या तालुक्यात ही कारवाई करण्यात आली. बदनापूर तालुक्यात सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून सुमारे एक कोटी 62 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर घनसावंगी तालुक्यात 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व जाफ्राबाद तालुक्यात अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन कुणीही करू नये व कायदा हातात घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश देत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, अवैध वाळू उत्खनन विरुद्ध नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज असून अवैध वाळू उत्खनन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिता विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तर जिल्ह्यातील सर्व रेती डेपोमध्ये घरकुलासाठी 10%, शासकीय कामांना 20% व बांधकाम व्यावसायिक यांचेसाठी 20% रेती साठा राखीव ठेवला आहे. ऑनलाइन नोंदणी करून रेती उपलब्ध होईल, असे अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी सांगितले.
18 मे रोजी रात्री अंदाजे 12 वाजे दरम्यान अंतरवाली राठी येथील दुधना नदीपात्रातून वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक करणारा हायवा व जेसीबी तहसील कार्यालय घनसावंगीच्या पथकाने पकडून कार्यवाही केली. सदर कार्यवाही करताना महसूलच्या पथकाने अतिशय गुप्तता पाळून अंतर्गत रस्त्याने प्रवास करून वाळू माफियांना सुगावा न लागू देता मोठ्या शिताफीने ही कारवाई केली. अंतरवाली राठी येथील दुधना नदीपात्रामध्ये वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक जेसीबी व हायवाद्वारे केले जात असल्याची गुप्त माहिती तहसीलदार, घनसावंगी यांना मिळाल्यावरून त्यांनी तहसील कार्यालयातील काही तलाठी महसूल सहाय्यक व कोतवाल यांना सोबत घेऊन कारवाई केली. यावेळी जालना तालुक्यातील माळी पिंपळगावच्या बाजूने नदीपात्रात जेसीबी व हायवाचा रस्ता बंद केला व दोन्ही वाहने ताब्यात घेतली. सदर कारवाई तहसीलदार योगिता खटावकर, तलाठी संदीप नरुटे, तलाठी संजय कुलकर्णी, सुरज बिक्कड, महसूल सहाय्यक संदीप सपकाळ, कोतवाल अनिल बर्डे, शेख पाशा व पोलीस कर्मचारी तिकांडे यांच्या पथकाने केली.
बदनापूर तालुक्यातील सायगाव येथील सुखना नदी व दुधना नदी संगम स्थान, मौजे सायगाव गट क्र 70 व 71 ला लागूनचे नदी पात्र येथे बदनापुर महसुल विभाग व पोलीस स्टेशन बदनापूर यांच्या संयुक्त पथकामार्फत अवैध वाळु उत्खनन कारवाई करण्यात आली. त्यात 1 जेसीबी, 1 पोकलेन व 3 हायवा जप्त करण्यात आले. तहसीलदार अश्विनी डमरे, पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, पोलीस उपनिरीक्षक बि. एस. खार्डे व नायब तहसीलदार दळवी, मंडल अधिकारी गोत्रानी व तलाठी निसर्गंध सुदंरर्डे व पठान यांच्या पथकाने ही कार्रवाई केली. 18 मे रोजी दुपारी 4.15 वाजता तलाठी संजय लोहगावकर यांच्या पथकाने पूर्णा पाटी येथे लक्ष्मण दत्ता ह्जारे रा. लोणार यांची सहा ब्रास अवैध रित्या वाळू उपसा करणारे वाहन हायवा हे जप्त करुन ते पोलीस ठाण्यात कार्यालयात लावण्यात आले.
जाफ्राबादच्या तहसिलदार डॉ. सारीका भगत यांच्या उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी नेमलेल्या पथकाने वाळु घाटावर गस्त घातली असता मौजे गारखेडा येथील पूर्णा नदी पात्रात अंदाजे 18 ब्रास, मौजे जाफ्राबाद येथीचे गट्टू फॅक्टरी परिसरामध्ये अंदाजे 18 ब्रास तसेच मौजे सावंगी येथील दर्गा परीसरामध्ये अंदाजे 8 बॉस अवैध वाळु साठा अज्ञात व्यक्तींनी केलेला आढळून आला. सदरील सर्व ठिकाणी धाड टाकून अवैध वाळ साठा जप्त करण्यात आला.
तहसीलदार, जाफ्राबाद यांच्या महसुल पथकाने व पोलिसांनी संयुक्तपणे 19 मे रोजी जाफ्राबाद तालुक्यातील वाळूघाटाला भेटी देऊन तपासणी केली. तालुक्यातील ज्या ठिकाणी वाळूचे अवैधरित्या उत्खनन होत आहे अशा ठिकाणी रस्ते जेसीबीच्या साहाय्याने बंद करण्यात आले. यामध्ये टाकळी येथील केळना नदी पात्रात जाणारा रस्ता बंद करण्यात आला. तसेच टाकळी केळना नदीपात्राजवळ अंदाजे 18 ब्रॉस व सावरखेडा येथे मंदिराजवळ अंदाजे 7 ब्रॉस अवैध वाळुसाठा जप्त करण्यात आला.
बुलढाणा जिल्ह्याकडे विनापरवानगी 6 ब्रास वाळू वाहतूक करताना हायवा वाहन मंठा पोलीस ठाण्यात येथे जमा करण्यात आले.
दरम्यान, जालना जिल्ह्यामध्ये एकूण 8 रेती डेपोच्या माध्यमातून एकूण 1.20 लक्ष ब्रास रेती उत्खननास डेपो धारकांना परवानगी देण्यात आलेली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या रेती साठ्यानुसार एकूण 13,033 ब्रास रेती बुकिंगसाठी उपलब्ध असून त्यापैकी घरकुलासाठी 2,143 ब्रास , शासकीय प्रकल्पासाठी 5093 , खाजगी प्रकल्पासाठी 2634 ब्रास व इतर सर्व सामान्य नागरिकांना 3163 ब्रास रेती बुकींगसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. घरकुलसाठी 579 लाभार्थींची नोंदणी झाली आहे.
जालना जिल्ह्यात वाळूच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस व महसूल विभागाची भरारी पथके स्थापन करण्यात आलेली असून जालना जिल्ह्यात मागील सहा महिन्यांमध्ये एकूण 119 अवैध उत्खनन वाहतूक प्रकरणात कारवाई करण्यात येऊन 116 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत सदर प्रकरणी 31 गुन्हे दाखल करण्यात येऊन एकूण रुपये 132 लक्ष दंडात्मक वसुलीची कार्यवाही करण्यात आलेली आहे.