सध्या अनेक विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात चिडचिडेपणा व मानसिक अस्थिरता आलेली दिसते. यातच विद्यार्थी आपले अनमोल जीवन संपवत आहेत. यामुळे पालकांनी सावधान रहावे मुलांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे. जामखेड तालुक्यातील नायगाव येथील गजानन उगले या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने मोबाईल मिळाला नाही म्हणून आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महागडा मोबाईल फोन घेण्यासाठी वडिलांनी पैसे न दिल्याच्या रागातून शिक्षकाच्या मुलाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. गजानन रामदास उगले (वय 23 रा. नायगाव) असे मयत मुलाचे नाव आहे. उपचारादरम्यान गजानन याचा तब्बल 23 दिवसांनी जामखेड येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत माहिती अशी की, मयत गजानन रामदास उगले याचे वडील खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल या ठिकाणी शिक्षक आहेत. गजानन याने वडीलांकडे महागडा मोबाईल घेण्यासाठी पैसे मागितले मात्र ते पैसे न दिल्याच्या रागातून गजानन उगले याने मागिल महिन्यात 28 एप्रिल 2024 म्हणजे 23 दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केले होते. या नंतर त्याच्यावर 23 दिवसांपासून जामखेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने काल दुपारी मृत्यू झाला.
गजानन याच्या तब्यतीमध्ये हळु हळु सुधारणा होत होती. तसेच त्याला दोन दिवसांपूर्वी घरी सोडण्यात देखील येणार होते. मात्र 18 मे रोजी सायंकाळी 6 वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या खबरी वरुन जामखेड पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटना खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आसल्याने सदरची नोंद खर्डा पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गजानन उगले वर रात्री उशिरा नायगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.