शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्या वतीने मुंबईतील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी मोठय़ा संख्येने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आयोजित कार्यक्रमात माजी खासदार हुसेन दलवाई, शिक्षकेतर कर्मचारी नेते आर. बी. सिंह, आमदार कपिल पाटील, ‘बुक्टू’च्या डॉ. तापती मुखोपाध्याय, डॉ. मधू परांजपे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आर.बी.सिंग म्हणाले की, अंधेरी येथील चिनॉई महाविद्यालय बंद होत असताना कोणत्याही राजकीय पक्षाने सहकार्य केले नाही, मात्र शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आमच्यासोबत ठामपणे उभे राहिले. यावेळी उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मार्गदर्शन करून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर आणि नीलिमा भुर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.