मुंबईतील सहाच्या सहा उमेदवार निवडून येणार; आदित्य ठाकरे यांचा ठाम विश्वास  

महाविकास आघाडीचे मुंबईतील सहाच्या सहा उमेदवार निवडून येणार आणि 4 जून रोजी आम्ही मुंबईत विजयाची मिरवणूक काढणार, असा विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केला. उत्तर मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये ते बोलत होते.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, भूषण पाटील हे उत्तर मुंबईचे स्थानिक उमेदवार आहेत. या विभागाची आणि या विभागातील समस्यांची त्यांना माहिती आहे. खासदार म्हणून निवडून आल्यावर ते या विभागातील प्रश्न योग्य रीतीने संसदेत मांडू शकतात. या उलट इथले आधीचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यावर अन्याय करून पियूष गोयल यांना भाजपने येथे आयात केले आहे. पियूष गोयल यांना इथल्या समस्यांची  माहिती आहे का? हेच पियूष गोयल दहा वर्षे केंद्रीय मंत्री होते, पण त्यांनी एकदा तरी मुंबईकरांच्या समस्या संसदेत मांडल्या आहेत का? एवढे मोठे रेल्वे खाते त्यांच्याजवळ होते. आज मुंबईकरांना रेल्वे प्रवासादरम्यान इतक्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी त्यांनी मागील दहा वर्षांत रेल्वेमंत्री म्हणून काय केले? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

   या बाईक रॅलीमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार मुपुल वासनिक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार अस्लम शेख, शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर, काँग्रेस व शिवसेनेसह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषेमध्ये महिला, तसेच दिव्यांग बाईकस्वारांनीसुद्धा या बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला होता.