निवृत्तीच्या सुखाआधीच अधिकाऱयावर काळाचा घाला

घाटकोपर छेडानगर येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटनेच्या बचावकार्याच्या अंतिम टप्प्यात एका कारमध्ये दोन मृतदेह सापडले. या दोन मृतांमध्ये निवृत्त एअर ट्रफिक कंट्रोल (एटीसी) महाव्यवस्थापक मनोज चंसोरिया (60) आणि त्यांची पत्नी अनिता (59) यांचा समावेश आहे.

मनोज चंसोरिया हे पत्नीसह आपल्या वैयक्तिक कामासाठी काही दिवसांपूर्वी जबलपूरवरून मुंबईत आले होते. आपले काम संपवून सोमवारीच पुन्हा जबलपूरला जाणार होते. दरम्यानच्या काळात घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर वाहनात इंधन भरण्यासाठी ते थांबले होते. मात्र कोसळलेल्या होर्डिंगखाली त्यांची कार दबली गेली. त्यात या दोघांचाही मृत्यू झाला. मनोज चंसोरिया हे मुंबई विमानतळावर एअर ट्रफिक कंट्रोल महाव्यवस्थापक म्हणून काम करत होते. या वर्षी मार्च महिन्यात ते निवृत्त झाले होते. त्यांचा मुलगा अमेरिकेत राहतो. तो अमेरिकेतून वडिलांना फोन करत होता. मात्र चंसोरिया फोन उचलत नव्हते. मुलाने तक्रार केल्यावर त्यांचे मोबाईल लोकेशन पोलिसांनी तपासले असता घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर दाखवले गेले होते. चंसोरिया यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी मंगळवारी रात्रीपासून हार्ंडग कोसळल्याच्या ठिकाणी तळ ठोकून होते. बचावकार्यादरम्यान चंसोरिया दांपत्य सुखरूप सापडावे, यासाठी आम्ही देवाची प्रार्थना करत होतो, असे या नातेवाईकांनी सांगितले. मात्र केवळ पेट्रोल भरण्यासाठी त्या ठिकाणी थांबल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.