लडाख झाले महाग… चला दुबईला जाऊ

 

उन्हाळी सुट्टी असल्याने विमान प्रवासाचे भाडे अवाच्या सवा करण्यात आले आहे. विमानांची संख्या कमी आणि प्रवासी जास्त झाल्याने कंपन्यांनी हवे ते भाडे आकारायला सुरुवात केली आहे. या वर्षी उन्हाळय़ात विमान प्रवास 60 टक्क्यांनी महाग झाला आहे. याचा सर्वात जास्त फटका देशांतर्गत प्रवास करणाऱया विमान प्रवाशांना बसत आहे. नागपूरहून दुबईला जाणे स्वस्त आहे. परंतु नागपूरहून श्रीनगर, लडाख, गुवाहाटी, सिक्कीमला जाणे महाग पडत आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत प्रवाशांना या दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. परदेशात जाण्याऐवजी देशातील लोकांची श्रीनगर, लेह, लडाख, सिक्कीम, गुवाहाटीला जायला जास्त पसंती आहे. परंतु या ठिकाणी जायला विमानाची संख्या पुरेशी नाही. देशातील विमानाचे मार्गदेखील कमी झाले आहेत. अन्य पर्यटन स्थळी जाणाऱया प्रवाशांची संख्यासुद्धा जास्त आहे. हे सर्व पाहून विमान सेवा देणाऱया पंपन्यांनी तिकीट दरात मोठी वाढ केली आहे.

 

 देशांतर्गत दर

नागपूर ते श्रीनगर  – 35 हजार

नागपूर ते लडाख- 40 हजार

नागपूर ते गुवाहाटी  – 30 हजार

नागपूर ते सिक्कीम –  35 हजार

नागपूर ते बंगळुरू  – 5 हजार 500

नागपूर ते मुंबई  – 6 ते 8 हजार

नागपूर ते अहमदाबाद – 6 हजार

 

देशाबाहेरील दर

नागपूर ते दुबई ः 25 हजार 500

नागपूर ते सिंगापूर           ः 25 हजार

उन्हाळी सुट्टीमुळे गर्दी

सध्या शाळांना उन्हाळी सुट्टय़ा लागल्या आहेत. त्यामुळे अनेक जणांचा फिरायला जाण्याचा प्लॉन आहे. रेल्वेने प्रवास करणे परवडणारे आहे. परंतु, रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवणे मुश्कील आहे. त्यामुळे अनेक जण रेल्वेने प्रवास करण्याऐवजी विमानाने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. याचा फायदा विमान कंपन्यांनी उचलला असून पर्यटनस्थळी जाण्यासाठी विमानाचे भाडे वाढवले आहे.