आंध्रच्या माजी मुख्यमंत्र्यांमुळे कोल्हापुरात वाहतुकीचा बोजवारा, भर उन्हात कोंडी झाल्याने नागरिकांचा संताप

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी सरकारी लवाजमा घेऊन दाखल झालेल्या आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यामुळे आज शहरात वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला. भर उन्हात रस्त्यावर थांबवून ठेवल्याने, ठिकठिकाणी कोल्हापूरकरांनी वाहनांचे हॉर्न वाजवून आपला संताप व्यक्त केला.

दरम्यान सरकारी लवाजमा घेऊन देवदर्शनाला येणाऱ्या अशा नेत्यांच्या सुविधा काढुन घ्याव्यात. महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री विना सुरक्षा सर्वत्र फिरत असताना,महाराष्ट्राबाहेरील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांचे कोल्हापूरातील नागरीकांना वेठीस धरणारे दौरे त्रासदायक ठरत असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

चंद्राबाबू नायडू हे गुरुवारी दौऱ्यावर येण्यापुर्वी बुधवारी सायंकाळी पोलिसांकडून रंगीत तालीम घेण्यात आली. तर गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास प्रत्यक्ष चंद्राबाबू नायडू दाखल झाल्यानंतर विमानतळ ते श्रीअंबाबाई मंदिर मार्गावरील वाहतूक पुर्णत: थांबविण्यात आली. मंदिरातील दर्शन भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. देवीचे दर्शन घेऊन जातानाही पुन्हा भर उन्हात नागरिकांना पंधरा ते वीस मिनिटे थांबविण्यात आल्याने, वाहनधारकांनीही वाहनांचे हॉर्न वाजवून ठिकठिकाणी आपला संताप व्यक्त केला.यावेळी पोलिसही हतबल झाल्याचे दिसून आले.