तेव्हा मोदी मला गुजरातला घेऊन जायचे, पण आता…; शरद पवारांचा मोदींवर निशाणा

नाशिकमधील दिंडोरी येथील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. कृषीमंत्री असताना काय केले? असा सवाल मोदींनी केला होता. याला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.

मोदी मी काय केले हे विचारतात. पण त्यांचा 10 वर्षांचा अनुभव बघा. ते ज्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा शेतीचा कोणताही विषय असला की ते माझ्याकडे यायचे. मला घेऊन गुजरातला जायचे, असेही शरद पवार म्हणाले. नाशिक येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी एक जुना किस्साही सांगितला.

एकदा मी इस्रायलला चाललो होतो तेव्हा मोदींनी मला फोन केला. तेव्हा अमेरिकेने त्यांचा व्हिसा नाकारलेला होता. त्यांनी मला इस्रायलला घेऊन जाण्याची विनंती केली. त्यावेळी मी त्यांना घेऊन इस्त्रायलला गेलो. इस्रायलमधील अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या गोष्टी त्यांना दाखवल्या. चार दिवस ते माझ्यासोबत फिरले. हे सगळे माहिती असतानाही मोदी बोलतात ते म्हणजे फक्त राजकारण आहे. मुख्यमंत्री असताना त्यांना राज्याच्या विकासात रस होता. पण आता ते राजकारण करतात दुसरे काही नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

लोकसभा निवडणुकीमध्ये हिंदू-मुस्लिम या मुद्द्यावर बोलणाऱ्या पंतप्रधान मोदींचा शरद पवार यांनी समाचार घेतला. नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे. लोकांचे लक्ष वळविण्यासाठी ते धर्म, जात यावर बोलत आहेत, असे शरद पवार म्हणाले. तसेच जनमत त्यांच्यासोबत नाही. दिंडोरीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हिच अवस्था असून लोकं बदलाला अनुकूल आहेत. भाजप आणि तत्सम शक्तींना सत्तेतून पायउतार करावे असे शेतकऱ्यांचे जनमत असल्याचे पवार म्हणाले.

धुळे, नाशिक, पुणे, सातारा या सर्व जिल्ह्यात कांदाप्रश्न आहे. या भागातील शेतकरी कांद्यामुळे अस्वस्थ आहेत आणि पंतप्रधान यावर बोलणार नसतील तर आवाज उठणारच. नाशिकमध्ये हे पहिल्यांदाच घडलेले नाही. याआधीही येथील राजकीय नेत्यांच्या सभेत लोकांनी कांदे फेकले होते. लोकं जागरूक आहेत, असेही ते म्हणाले.