भाजपचे लोक ठेकेदारांचे दलाल; शिवसेना नेते विनायक राऊत यांचा हल्ला

भाजपचे लोक हे ठेकेदारांचे दलाल असून पदाधिकाऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंत अनेकजण घोटाळ्यांमध्ये अडकले आहेत. ठाण्यात तर कुष्ठरुग्णांच्या नावावरच घोटाळा झाला. 100 रुग्ण असताना 710 रुग्ण दाखवण्यात आले. त्यांचे अनुदान लाटण्याचे काम राजरोसपणे झाले. ठेकेदारांची दलाली करणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत कायमचा धडा शिकवा, असे आवाहन शिवसेना नेते विनायक राऊत यांनी आज केले.

शिवसेना इंडिया आघाडीच्या पालघर लोकसभा मतदारसंघातील भारती कामडी यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या दणदणीत जाहीर सभेत राऊत बोलत होते. भाजप व मिंध्यांवर टिकास्त्र सोडताना ते म्हणाले की, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आरोप म्हणजे अनुभवातून आलेले बोल आहेत. चव्हाण यांनी राजकीय तिजोरी लुटण्याचे काम केले असून त्यातून रग्गड पैसा कमावला असल्याचा आरोपही विनायक राऊत यांनी केला.

राज्यातील शेकडो रस्त्यांच्या कामातील टक्केवारी कोण घेतो हे महाराष्ट्रातील जनतेला ठावूक असून या टक्केवारी बहाद्दरांना निवडणुकीत पराभूत करा, असे आवाहनही सभेत करण्यात आले. दरम्यान पालघरमध्ये शिवसेना इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या शिवसेनेच्या भारती कामडी यांना भरघोस मतांनी विजयी करा, असेही विनायक राऊत यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पालघर संपर्कप्रमुख मिलिंद वैद्य, जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील, भूषण संखे, परेश पाटील, अतुल पाठक, सुनील महेंद्रकर, प्रमोद भानुशाली, मनोज घरत, परिक्षित पाटील, राकेश पाटील, नचिकेत पाटील, अनुजा तरे, मोनिका गवळी आदी उपस्थित होते.