लोकसभा निवडणुकीचे आणखी तीन टप्पे बाकी असतानाच मोदी सरकारने सीएए प्रमाणपत्र वाटपाची घाईगडबड सुरू केल्याचे समोर आले आहे. आज पहिल्या टप्प्यात 14 लोकांना सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याची प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
पेंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांनी नवी दिल्लीत या प्रमाणपत्रांचे वाटप केले. दोन महिन्यांपूर्वी गृहमंत्रालयाने सीएए कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना काढली होती. प्रमाणपत्रे वाटप झाल्यानंतर गृहसचिवांनी लाभार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच या कायद्यातील महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. 2019 मध्ये हा कायदा संसदेत मंजूर झाला. त्यानंतर राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केले.
काय आहे कायदा?
पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान या शेजारील मुस्लिम राष्ट्रांमधून जे हिंदू, शीख, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन अल्पसंख्याक हिंदुस्थानात दाखल झाले आहेत. त्यांना या कायद्याद्वारे भारतीय नागरिकत्व प्रदान केले जाणार आहे. हे लोक 31 डिसेंबर 2014 पूर्वी हिंदुस्थानात वास्तव्यास आलेले असणे आवश्यक आहे. जर कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले तर ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडियाच्या कार्डधारकांची नोंदणी रद्द करण्यात येईल अशी तरतूदही या कायद्यात आहे.