लेख – विदर्भाच्या जंगलात दोन वन्यजिवांची भर!

>> ऍड. प्रतीक राजूरकर, [email protected]

विदर्भातील वनक्षेत्रात वाघाटी आढळणे आणि हत्तींना कायमस्वरूपी हक्काची जागा मिळणे या दोन्ही बाबी आनंद द्विगुणित करणाऱया आहेत. परंतु प्रस्तावित राखीव वनक्षेत्र कमी केल्याने तो जरा कमी झाला आहे. जुन्या काळी दारात हत्ती असणे हे समृद्धीचे प्रतीक समजले जायचे. आज हत्ती विदर्भाच्या अंगणात येऊन स्वतःहून दार ठोठावत असताना राज्यकर्त्यांची अनास्था गंभीर आहे. विशाल ईशस्वरूप असलेल्या हत्तींना त्यांच्या हक्काची जागा देण्यास होणारी अक्षम्य दिरंगाई निश्चितच दुर्दैवी आहे.

विदर्भाच्या जंगलातील जैवविविधतेत दोन वन्यजिवांची भर पडली आहे. एक महाकाय हत्तींचे होणारे पुनर्वसन आणि दुसरे नव्यानेच आढळलेली वाघाटी, ज्याला इंग्रजीत ‘लेपर्ड कॅट’ असे संबोधली जाते. बिबटय़ासारखे अंगावर असलेले ठिपके ही वाघाटीची मुख्य ओळख. आकाराने लहान असलेली वाघाटी विदर्भात आढळल्याने मध्य हिंदुस्थानाच्या वनक्षेत्रातील पहिल्या वाघाटीची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात कोकणात वाघाटीची संख्या लक्षणीय आहेच. योगायोग असा की कोकणात आढळणारी वाघाटी आणि हत्तींचे आता विदर्भात आणि मध्य हिंदुस्थानात अस्तित्व असणार आहे. तर दुसरीकडे विदर्भातील काही वाघांना सह्याद्री अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. 3 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र वन विभाग अधिकाऱयांच्या आढावा बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी नैसर्गिक अधिवास आणि वाघांची वाढती संख्या बघता त्यांना समावून घेण्याची योजना कार्यान्वित करण्याच्या सूचना केल्या होत्या. नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री प्रकल्पात चंद्रपूर येथील काही वाघांचे पुनर्वसन करण्याची वनविभागाने योजना तयार केली होती. विदर्भाच्या वनक्षेत्रातील नवीन पाहुणे आणि स्थलांतरामुळे महाराष्ट्राच्या वनवैभवात अधिकच भर पडणार आहे.

वाघाटी आढळली त्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा काही भाग महाराष्ट्रात तर काही भाग मध्य प्रदेशात येतो. पेंच नदीच्या प्रवाहात दोन राज्यांतील वनक्षेत्र विभागले गेले आहे. रुडयार्ड किपलिंग यांचे प्रसिध्द पात्र ‘मोगली’ याच पेंचच्या जंगलातील. महाराष्ट्र पेंच व्याघ्र प्रकल्पातील वनकक्ष क्रमांक 663 नागलवाडी वनपरिक्षेत्र मानसिंगदेव वन्यजीव अभयारण्य नरहर गावात लावलेल्या एका कॅमेऱयात वाघाटीचे अस्तित्व दिसून आले. वाघाटीचे गुणधर्म बघता यांचे अस्तित्व ईशान्य हिंदुस्थान, उत्तर हिमालयीन क्षेत्र, ओरिसा, पश्चिम बंगाल आणि पश्चिम घाटापुरते मर्यादित होते. याच कारणास्तव मध्य हिंदुस्थानात आणि विशेषतः महाराष्ट्रात वाघाटी आढळणे ही अनन्यसाधारण अशीच घटना आहे. वाघाटीच्या हिंदुस्थानात एकूण 15 प्रजातींची नोंद आढळते. वाघाटीचा आकार हा पाळीव मांजरीइतका असून डोकं लहान आणि लांबसडक पाय हे त्याचे वैशिष्टय़. जे वनक्षेत्रात अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अनुकूल ठरते. डोळ्यांपासून कानापर्यंतचे दोन गडद पट्टे आणि डोळ्यांपासून नाकापर्यंत आलेल्या दोन लहान पांढऱया रेषा त्यांच्या रानटी सौंदर्यात भर घालतात. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या दक्षिण पूर्वेला नवेगाव नागझिरा आणि उत्तर पूर्वेला कान्हा व्याघ्र प्रकल्पाला जोडलेला असल्याने वाघाटीचे आढळणे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.

वन, पर्यावरण, संवर्धन, जैवविविधतेच्या दृष्टीने हत्तींचे विदर्भातील आगमन शुभ संकेत आहेत. अनेक दशकांनंतर जंगली हत्तींचे पाय विदर्भाच्या भूमीला लागले. 2019 सालच्या सप्टेंबर महिन्यात छत्तीसगड राज्यातून दोन हत्तींचा सालेकासा गोंदिया जिह्यात चंचुप्रवेश झाला. अगदी अल्पकाळासाठी हे हत्ती आले तसे परतलेसुध्दा. पुढच्या वर्षी लवकर या घोषणेनुसार 2021 च्या ऑक्टोबर महिन्यात साधारण 23 जंगली हत्तींचा एक कळप छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्राच्या गडचिरोली जिह्यात अवतरला. सहा-सात महिन्यांत अनेक भागांत भ्रमण करून हा कळपसुध्दा परतला. ऑगस्ट 2022 साली पुन्हा कळप विदर्भात शिरला तेव्हापासून त्यांचे गडचिरोली, गोंदिया जिह्यात भ्रमण सुरू असून आता त्यांची संख्या 26 आहे. हत्तींनी तेव्हापासून भ्रमण करत आपले मार्ग शोधले त्यादरम्यान तुरळक मानव वन्यजीव संघर्षसुध्दा उद्भवला. गेली दोन वर्षे हा कळप या भागात आपले वास्तव्य ठेवून आहे. त्यातील सर्वाधिक काळ हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिह्यात घालवला. कधी नवेगाव नागझिरा, कधी गडचिरोली असे त्यांचे भ्रमण सुरू आहे. गेल्या दशकभरात अनेक अभ्यासकांनी हत्तींचे या भागात स्थलांतर होईल अशा सूचना दिलेल्या होत्या. परंतु हत्तींच्या आगमनानंतर त्यावर उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली.

हत्तींचे वास्तव्य बघता नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक जयरामे गौडा आर. यांनी हत्ती संवर्धनासाठी प्राथमिक प्रस्ताव राज्य शासनाला जुलै/ऑगस्ट 2023 साली सादर केला. प्रस्तावात प्रामुख्याने हत्तींसाठी राखीव क्षेत्र, त्याचे सर्वांगीण विश्लेषण केले गेले. प्रस्तावात हत्तीसाठी एकूण 4 हजार 133 चौ. कि.मी. राखीव क्षेत्र ठेवण्याची शिफारस करण्यात आली होती. आता मात्र त्या प्रस्तावाचा फेरआढावा घेऊन प्रस्तावित क्षेत्राच्या 65 टक्के वनक्षेत्र सुधारित प्रस्तावात देण्यात आले आहे. जवळपास एक वर्ष तो प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. विदर्भात हत्तींसाठी राखीव क्षेत्र आल्यास इथल्या पर्यटनास वाघांसमवेत हत्तींचा पण हातभार लागेल. देशातील हत्तींसाठीचे ते 34 वे राखीव वनक्षेत्र ठरेल. उल्लेखनीय म्हणजे 3 जून 2020 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जवळपास 4 हजार हेक्टर वनक्षेत्र टिल्लारी वन्यजीव संवर्धनासाठी राखीव केल्याचे जाहीर केले होते. कर्नाटक राज्यातून स्थलांतरित होणाऱया हत्ती व इतर वन्यजिवांचे संवर्धन हा त्यामागील उद्देश होता. विदर्भातील वनक्षेत्रात वाघाटी आढळणे आणि हत्तींना कायमस्वरूपी हक्काची जागा मिळणे या दोन्ही बाबी आनंद द्विगुणित करणाऱया आहेत. परंतु प्रस्तावित राखीव वनक्षेत्र कमी केल्याने तो जरा कमी झाला आहे. जुन्या काळी दारात हत्ती असणे हे समृद्धीचे प्रतीक समजले जायचे. आज हत्ती विदर्भाच्या अंगणात येऊन स्वतःहून दार ठोठावत असताना राज्यकर्त्यांची अनास्था गंभीर आहे. विशाल ईशस्वरूप असलेल्या हत्तींना त्यांच्या हक्काची जागा देण्यास होणारी अक्षम्य दिरंगाई निश्चितच दुर्दैवी आहे.