जगभरातून थोडक्य़ात आणि सुटसुटीत बातम्या…

नवरदेवाची स्कूटरवरून वरात

लग्नात नवऱया मुलाच्या वरातीकडे सर्वांचे लक्ष असते. अशीच एक वरात सध्या सोशल मीडियावर नेटकऱयांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओत घोडा किंवा गाडीऐवजी नवरदेवाने चक्क इलेक्ट्रिक स्कूटरवरून वरात लग्नमंडपात आणली. पीक बंगळुरूच्या एक्स (ट्विटर) व्हिडीओद्वारे ही वरात सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. नवऱया मुलाचे नाव दर्शन पटेल असे आहे. त्याने स्वतःच्या वरातीसाठी एथर रिझता इलेक्ट्रिक स्कूटरला हार, फुलं, तोरणं लावून खूप छान सजवले. तसेच कुटुंबातील मंडळीदेखील फेटा घालून स्कूटरभोवती नाचत आहेत. तसेच काही फोटोग्राफर हे खास क्षण टिपताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

गुगल वन व्हीपीएन सर्व्हिस बंद

गुगलने चार वर्षांपूर्वी सुरू केलेली गुगल वन व्हीपीएन सर्व्हिस बंद केली आहे. येत्या 20 जून रोजी गुगलची ही सेवा बंद होणार आहे. 20 ऑक्टोबर 2020 ला गुगलने ही सेवा सुरू केली होती. गुगलने युजर्सना ही सेवा आपल्या डिव्हाईसमधून कशा पद्धतीने हटविता येईल याविषयीही मार्गदर्शन केले आहे.

34 व्या वर्षी बनली आज्जीबाई!

सिंगापूरमधील एक 34 वर्षीय महिला चक्क आज्जीबाई बनली आहे. कमी वयात आई झाल्याने महिलेच्या शरीरावर होणाऱया परिणामाची चर्चासुद्धा या निमित्ताने सुरू झाली आहे. साऊथ चायना मार्ंनग पोस्टच्या रिपोर्टनुसार, सिंगापूरमधील 34 वर्षीय शर्ली लिंगचा मुलगा अवघ्या 17 व्या वर्षी बाबा (वडील) बनला आहे. त्यामुळे शर्ली आजी बनली आहे. शर्लीने आपल्या नातवाचे कुटुंबात जोरदार स्वागत केले. तिने आतापर्यंत तीन लग्न केली असून तिला पाच मुले आहेत. शर्लीला 17 व्या वर्षी मुलगा झाला. त्यानंतर एक मुलगा आणि तीन मुली झाल्या. सर्वात मोठा मुलगा आता 18 वर्षांचा आहे. दुसरा 17 वर्षे, तिसरा 13 वर्षे तर अन्य दोन 10 वर्षे आणि 8 वर्षांची आहेत.

फेसबुक-इन्स्टाग्राम पुन्हा डाऊन

सोशल मीडिया ऍप्स फेसबुक आणि इन्स्टाग्राम बुधवारी डाऊन झाले. 18 हजार इन्स्टाग्राम यूजर्संनी यासंबंधी तक्रारी नोंदवल्या. 59 टक्के इन्स्टाग्राम यूजर्संना ऍक्सेस मिळण्यात अडचणी आल्याचे सांगितले. 34 टक्के यूजर्सला कनेक्शनमध्ये अडचणी आल्या. फीड रीफ्रेश करण्यात समस्या येत असल्याचेही यूजर्संनी आपल्या तक्रारीत म्हटले. ऍप ओपन केल्यानंतर ‘एरर लोडिंग मेडिया’ असे मेसेज यूजर्सला मिळत होते. फेसबुक आणि इंस्टाग्रामने अद्याप आऊटेजशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. या आऊटेजचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. मार्च महिन्यात मेटा कंपनीच्या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील यूजर्संना लॉगिन आणि फीड रीफ्रेश करण्यात अडचणी येत होत्या.

‘कॅशबॅक’चा झोल; फक्त 1 रुपया मिळाला

87 हजार रुपयांचे क्रेडिट बिल भरल्यानंतर एका तरुणाला 1 रुपयाचा कॅशबॅक मिळाला. फिनटेक कंपनी क्रेडच्या ऍपवरून या तरुणाने हे बिल भरले होते. यानंतर कंपनीने तरुणाच्या खात्यात एक रुपयाचा कॅशबॅक पाठवला. या तरुणाने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली. ही पोस्ट वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून अनेकांनी कंपनीची पॉलिसी आणि सर्व्हिसवरून जोरदार टीका केली आहे. काही यूजर्संनी आपले अनुभव शेअर केले आहेत. काही लोकांनी क्रेडवर यूजर्सला फायनान्शियली डेटा जमा करण्याचा आरोपही केला आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या कॅशबॅकमध्ये शेंगदाणेसुद्धा येत नाही. ही कंपनी कॅशबॅक देत नाही. उलट यूजर्सचा डेटा अन्य फिनटेक कंपन्यांना विकत आहे, असा गंभीर आरोपही केला.

चुकीची शस्त्र्ाक्रिया डॉक्टरला दंड

महिलेच्या पोटदुखीवर चुकीची शस्त्रक्रिया करून तिचा जीव धोक्यात टाकणाऱया डॉक्टराला चांगलाच इंगा मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील राज्य ग्राहक आयोगाने डॉक्टरला 25 लाख 25 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. हे प्रकरण 2018 सालातील आहे. त्यामुळे तेव्हाच्या तारखेपासून 12 टक्के व्याज दराने नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. त्यामुळे 40 लाख रुपये द्यावे लागतील. अयोध्या येथील अमानीगंज येथील हनुमान प्रसाद यांच्या पत्नी मालती देवी या पोटदुखीने त्रस्त होत्या. डॉ. सुनीता सिंह यांनी मालती यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. हनुमान प्रसाद यांनी कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर डॉ. सुनीताने मालती देवी यांना खोटय़ा गुह्यात अडकवण्याची धमकी दिली होती.