कोपरगावमध्ये सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65 टक्के मतदान; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळी धिम्या गतीने मतदान सुरू दिलेल्या दहा वाजल्यानंतर चांगला वेग घेतला. कडक ऊन असतानाही मतदानाचा वेग वाढतच होता. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी 65 टक्के, मतदान नोंदवले गेले अशी माहिती कोपरगाव विधानसभा संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी दिली.

शिर्डीमध्ये तिरंगी लढत होत आहे. महाआघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे व महायुतीचे सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी शहरातील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केले. वंचितच्या ऊत्कर्षा रुपवते यांनी त्यांच्या अकोले शहरातील केंद्रावर हक्क बजावला.माहेगाव देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या निवडणूक केंद्रात आ.आशुतोष काळे माजी आमदार अशोक काळे, पुष्पाताई काळे, चैताली काळे, अभिषेक काळे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

कोल्हेवस्ती शाळा मतदान केंद्र 47 येथे माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बिपिनदादा कोल्हे, विवेक कोल्हे, रेणुका कोल्हे, ईशान कोल्हे, श्रद्धा कोल्हे, नितीनदादा कोल्हे, कलावतीताई कोल्हे, अमित कोल्हे, मनाली कोल्हे, सुमित कोल्हे, दत्तू नाना कोल्हे अशा संपूर्ण कोल्हे परिवाराने मतदानाचा हक्क बजावला.

दोन तासाच्या टप्प्यानंतर मतदानाची आकडेवारी
सकाळी नऊ वाजेपर्यंत 5.11 टक्के
सकाळी 11 वाजेपर्यंत 19 टक्के
दुपारी 1 वाजेपर्यंत 32.85 टक्के
दुपारी 3 वाजेपर्यंत 44.87 टक्के
दुपारी 5 वाजेपर्यंत कोपरगाव येथे 52.92 टक्के, मतदान नोंदवले गेले.
एकूण मतदान 1,47,970 यात पुरुष 80398, स्त्री 67572 यांनी मतदानाचा हक्क बजावला.

सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोपरगाव येथे सरासरी 65 टक्के, मतदान नोंदवले गेले. मतदानाची सखोल आकडेवारी येणे बाकी होते. त्यामुळे एकूण झालेले मतदान स्त्री व पुरुष यांनी बजावलेला मतदानाची आकडेवारी समजू शकलो नाही.

सोमवारी(13मे) रोजी मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी रवंदा मतदान केंद्र 9 व ब्राह्मणगाव मतदान केंद्र 43 या ठिकाणी व्हिव्हीपॅट बंद पडले होते
तर दुपारी मोर्विस केंद्र 17 व संवत्सर येथील बिरोबा चौकातील मतदान केंद्र 75 नंबर मतदान केंद्रावर व्हिव्हीपॅट अर्धा तास बंद पडले. अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी दिली.

शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान दोन लाख 79 हजार 940 इतके असून यात पुरुष एक लाख 42 हजार 148 तर स्त्रिया एक लाख 37 हजार 455 व इतर सहा असे असून नोकरदार मतदान 331 इतके आहे. 272 मतदान केंद्रावर होत असलेले या निवडणुकीसाठी 326 ए व्ही एम मशीन ठेवण्यात आले होते 272 मतदान केंद्रात तीन आदर्श मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी 1495 शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. तर सुरक्षेसाठी पोलीस अधिकाऱ्यांसह साडेतीनशे पोलीस यांची नेमणूक करण्यात आली होती. या सर्वांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी 27 बस उपलब्ध करण्यात आल्या होत्या. अशी माहिती सहा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी दिली.

कोपरगाव शहरामध्ये नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप हे आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यासह शहरातील कामकाजावर लक्ष ठेवून निवडणूक निर्णय अधिकारी यांना मदत करत होते. नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होण्यासाठी जनजागृती केली आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मतदान केंद्राच्या बाहेर काही ठिकाणी मंडप घालण्यात आले होते. पण त्या ठिकाणी बसण्यासाठी कोणीच उपलब्ध नव्हते, अशी स्थिती दिसून आली. अनेकांना मतदानाच्या स्लीप या मिळाल्या नव्हत्या, त्यामुळे आपले केंद्र कोठे आहे आणि आपले मतदार यादीत नाव आहे की नाही याबाबतही गोंधळ निर्माण झाला होता. अनेकांची मतदार यादीतून नावे गायब होती तर काहींना मृत घोषित करण्यात आले होते मतदान केंद्राच्या आवारामध्ये मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे कोणालाही आत मध्ये मोबाईल नेता आला नाही. या निर्णयाच्या कडक अंमलबजावणीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.