हिंदुस्थानात विलीन करण्याची मागणी करत निदर्शने, पाकव्याप्त कश्मीरात जनतेचा उद्रेक

पाकव्याप्त कश्मीरात गेल्या दोन दिवसांपासून महागाई, भरमसाट कर आणि वीजकपातीविरोधात आंदोलनाचा भडका उडाला. रस्तोरस्ती सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली, तसेच पीओकेचा हिंदुस्थानात समावेश करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चकमक उडाली. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडल्या तसेच लाठीमारही केला. 90 हून अधिक नागरिक जखमी झाले, तर एका पोलीस अधिकाऱयाचा मृत्यू झाला. नागरिकांच्या अनेक अधिकारांवर निर्बंध लादण्यात आले असून त्याविरोधातही नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचा आरोप मुझ्झफ्फराबाद व्यापारी संघटनेने केला. पाकिस्तान सरकारविरोधात पीओके आणि मुजफ्फराबादमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

पाकव्याप्त कश्मीरमध्ये सरकारविरोधात सातत्याने उठाव होत आहे. गेल्या वर्षीही असाच उठाव झाला होता. जनतेचे आंदोलन दाबले जात असून कलम 144 लागू करण्यात आले आहे. मोबाईल सेवाही बंद आहे.