उद्धव ठाकरे यांची आज डोंबिवलीत जाहीर सभा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या सोमवारी भागशाळा मैदानावर संध्याकाळी सात वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते गद्दारांचा व भाजप नेत्यांचा काय समाचार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना इंडिया आघाडीचे नेतेही यावेळी उपस्थित राहणार असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वैशाली दरेकर निवडणूक लढवत असून त्यांना ठिकठिकाणी मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उद्या होणाऱया जाहीर सभेची जय्यत तयारी झाली असून ही सभा विरोधकांच्या छातीत धडकी भरवणारी ठरेल, असा विश्वास कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी व्यक्त केला आहे. या सभेत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची भाषणे होणार आहेत.