Uddhav Thackeray Interview Part 2 : मोदी-शहांनी लोटांगणवीर निर्माण केलेत – उद्धव ठाकरे

>> संजय राऊत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीच्या उत्तरार्धात मोदी-शहा नीतीवर अक्षरशः आसूड ओढला. ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतमधील इंग्रजांच्या वखारी लुटल्या. त्याचा राग मोदी-शहा शिवसेनेवर आणि महाराष्ट्रावर काढीत आहेत काय?’’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मोदी-शहांनी महाराष्ट्रात लोटांगणवीर निर्माण केले. स्वाभिमान व शौर्य मारून टाकले असा घणाघातही केला.
उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना सवाल केला, ‘‘अख्खी शिवसेना तुमच्या सोबत होती. तिला तुम्ही नकली शिवसेना म्हणताय? आणि नकली लोकांना मांडीवर घेऊन त्यांना बाळा जो जो रे करताय?’’
मोदी यांनी म्हणे शिवसेनेविषयी गोड बोलणे सुरू केले. हा त्यांचा खोटेपणा आहे. आता त्यांच्या बरोबर कदापि जाणार नाही. मोदी यांनी महाराष्ट्राचा घात केलाय. त्यांच्याबरोबर हातमिळवणी कदापि शक्य नाही, असा विश्वास त्यांनी जनतेला दिला.

देशातील संविधान या लोकांनी धोक्यात आणले. आमची लढाई संविधान वाचविण्यासाठी आहे. गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राच्या सुपुत्राने देशाला संविधान बहाल केले. भाजपला हे संविधान संपवायचे आहे. शिवसेना ते होऊ देणार नाही. खात्री बाळगा!
मुलाखतीच्या उत्तरार्धाची सुरुवात मोदी यांच्या सुडाच्या राजकारणावरून झाली!

महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्याचे काम करत आला आहे. यात गेल्या पन्नास वर्षांच्या राजकारणात ठाकरे कुटुंब आणि शिवसेना यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. ही भूमिका सूडबुद्धीने नष्ट करण्याचा प्रथमच प्रयत्न झाला, तोसुद्धा तुमचे मित्र नरेंद्र मोदी यांच्याकडून.
– पण त्यांच्या शंभर पिढ्या अवतरल्या तरी त्यांना ते शक्य होणार नाही.

नरेंद्र मोदी या देशावर दहा वर्षे राज्य करत आहेत. या दहा वर्षांना त्यांच्या अंधभक्तांनी आणि स्वतः मोदी यांनी ‘अमृतकाळ’ असे नाव दिले. खरोखर हा ‘अमृतकाळ’ होता? कारण शिवसेनेसाठी हा विषाचा प्याला होता, असे मी मानतो…
– विषाचा प्याला केवळ शिवसेनेसाठीच नाही. देशासाठीही आहे आणि त्यांचा शिवसेनेवर हा राग का आहे? …अगदी इतिहासात मागे जाऊन पाहिलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा सुरत लुटली होती. कारण तिथले काही व्यापारी इंग्रजांना मदत करत होते. त्यांच्या वखारी महाराजांनी लुटल्या होत्या. कदाचित तिथपासूनचा हा राग या दोघांच्या मनात आहे का? संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला, त्या लढ्यात माझे आजोबा प्रबोधनकार हे त्या पहिल्या पाच महत्त्वाच्या नेत्यांमधले एक होते.

पंचक…
– होय पंचक… त्या लढ्यात माझे वडीलही होते. वडील हा शब्द वापरतो, कारण त्यावेळी शिवसेना नव्हती. ते शिवसेनाप्रमुख नंतर झाले, पण व्यंगचित्रकार होते… माझे काका श्रीकांत ठाकरेही होते. तेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा पेटला होता. त्यावेळी मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते… आता मोरारजी भाई कुठल्या राज्यातून आले होते हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांनी पोलिसांना ऑर्डर दिल्या होत्या की, मी तुम्हाला बंदुकीच्या गोळ्या माणसांना मारायला दिल्या आहेत. आणि असं म्हणतात की, त्यावेळी मोरारजींनी गोळ्या किती झाडल्या आणि किती माणसे मेली याचा हिशेब विचारला होता.

गोळ्या वाया का गेल्या… असा प्रश्न मोरारजींनी विचारला होता.
– होय… गोळ्या वाया का घालवल्या… त्या लढय़ाची सगळ्यांनाच कल्पना आहे. चिंतामणराव देशमुख हा एक नरवीर होता. त्यांनी तेव्हा नेहरूंना लोकसभेत प्रश्न विचारला होता, या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली. नेहरूंनी त्या चौकशीला नकार दिल्यानंतर चिंतामणरावांनी ठणकावलं होतं की, याचा अर्थ असा की, तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आकस आहे आणि म्हणून मी तुमच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, राहू इच्छित नाही. हा घ्या माझा राजीनामा! आता काय झालंय की, महाराष्ट्राबद्दलचा एवढा आकस समोर दिसत असतानासुद्धा आता असे ‘चिंतामणराव’ कुणीही दिसत नाहीयेत. सगळे लेचेपेचे आणि घालीन लोटांगणवाले आहेत. महाराष्ट्र लुटला तर लुटा…

म्हणजे हे सगळे लोटांगणवीर आहेत…
– होय… लोटांगणवीरच आहेत ते. तोच जो महाराष्ट्राबद्दलचा आकस आहे तो आकस मोदी-शहा आता काढताहेत. आता दाखवायला महाराष्ट्राबद्दलचं प्रेम उतू जातंय. सभा घेताहेत, रोड शो करताहेत. महाराष्ट्र जेव्हा संकटात होता, महाराष्ट्रावर जेव्हा नैसर्गिक आपत्त्या आल्या तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. निसर्ग वादळ आलं, तौक्ते वादळ आलं… त्या वेळेला कधीही मोदी किंवा शहा महाराष्ट्रात आले नाहीत. त्यांनी एका पैशाचीही महाराष्ट्राला मदत केली नाही. आणि आता हा महाराष्ट्र बदनाम करायचा. महाराष्ट्रात सगळी वाट लागली आहे असं दाखवायचं. महाराष्ट्रातली घरंदाज कुटुंबं बदनाम करायची, नेतृत्व खतम करायचं, नेतृत्वाच्या कुटुंबीयांना बदनाम करायचं, पक्ष फोडायचे, उद्योगधंदे पळवायचे. महाराष्ट्र एवढा वाईट आहे असं चित्र उभं केल्यानंतर महाराष्ट्रात उद्योगधंदे येऊच नयेत याचे मनसुबे रचायचे. सेनापती बापटांनी असं म्हटलं होतं की, ‘महाराष्ट्र आधार या भारताचा.’ तो आधारच लुळापांगळा करायचा, त्याच्या डोक्यावरती आपण बसायचं.

मुंबईवर त्यांचा डोळा आहेच!
– मुंबई हे देशातलं सगळ्यात जास्त कर भरणारं शहर, आर्थिक राजधानीच म्हणा. आर्थिक केंद्र म्हणा. मुंबईतली सगळी कॉर्पोरेट ऑफिसेस गुजरातला नेली. टेक्सटाईल कमिशनरेटही दिल्लीला नेली. एअर इंडियाचं ऑफिस घेऊन गेले. हिरेबाजार घेऊन गेले, वित्तीय केंद्र जे काँग्रेस सरकारने मुंबईला दिलं होतं त्या वित्तीय केंद्राच्या जागी तिथे मी मुख्यमंत्री असताना फिल्ड हॉस्पिटल उभारलं होतं. आणि हजारो, लाखो रुग्णांचा जीव तिथे वाचला होता. त्यांनी आपलं सरकार पाडलं आणि पहिला निर्णय जर कोणता घेतला असेल तर ते केंद्र पाडून टाकून ती जागा ताबडतोब बुलेट ट्रेनच्या घशात घातली. आता बुलेट ट्रेनचा उपयोग मराठी माणसाला काय होणार आहे? मराठी माणसाविषयी आकस तो हाच!

बुलेट ट्रेनचा फायदा गुजरातला होणार…
– गुजरातलाच होणार… पण पुन्हा सांगतो, गुजरातबद्दल माझ्या मनात आकस नाही. परंतु मोदी हे गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये भिंत उभी करताहेत आणि हा महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे की मुंबईला भिकेला लावायचं. मुंबईच्या ज्या 90 हजार कोटींच्या ठेवी होत्या त्यातल्या आता किती एफडी तोडल्या हे त्यांचं सरकार गेल्यावर कळेलच आपल्याला. त्याची चौकशी लावू.

हुकूमशाही हरवावीच लागेल… नाहीतर देशाचं भवितव्य पुन्हा अंधारात जाईल.. देशात पुन्हा गुलामगिरी येईल. आधी परकीयांची गुलामगिरी होती, आता स्वकीयांची येईल.. आणि जसं लोकमान्य टिळक बोलले होते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.. तसं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी टिकवणारच.. ही आजची घोषणा असली पाहिजे.

 ते एक आर्थिक कवच होतं…
– होय, या ठेवी म्हणजे मुंबईचं आर्थिक कवच होतं. कोस्टल रोड… हे स्वप्न मी अगदी अभिमानाने आणि अहंकाराने सांगेन की, मी दाखवलं… आणि माझ्या मुंबई महापालिकेने ते पूर्ण केलं. त्याचं श्रेयसुद्धा तुम्ही घेताय. आणि ‘कॉण्ट्रक्ट’साठी जवळपास एक लाख कोटींच्या कामांना त्यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. म्हणजे 90 हजार कोटी जाऊन पुन्हा 10 हजार कोटी खर्ची पडले. म्हणजे एक लाख कोटींचा खर्च. मग मुंबईच्या सफाई कामगारांना पगार कुठून मिळणार?

ही सगळी लूट करता यावी म्हणून शिवसेना फोडली असं आपल्याला म्हणायचंय?
– नक्कीच… माझा आरोप आहे तो… कारण माझ्या काळात मी ते होऊ देत नव्हतो. आणि मी तुम्हाला परत सांगतो, लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार येणार. नक्कीच येणार. पहिलं केंद्रात येणार, मग राज्यात येणार… महाराष्ट्राचं आणि मुंबईचं लुटलेलं वैभवसुद्धा मी परत आणेन. आर्थिक केंद्रसुद्धा मी नव्याने उभारून दाखवीन.

आपण मघाशी म्हटलं की, महाराष्ट्र भारताचा आधार…
– आहेच…

आणि शिवसेना महाराष्ट्राचा आधार… महाराजांनी सुरत लुटली आणि मोदी-शहांनी शिवसेना लुटली…
– मोदी-शहांनी शिवसेना फोडली आणि महाराष्ट्र लुटला.

महाराष्ट्रही लुटला जातोय… शिवसेनाही लुटली जातेय… अशाप्रकारे महाराष्ट्र विकलांग आणि दुबळा करायचा. अशातून तुम्हाला महाराष्ट्राचं भवितव्य काय दिसतंय?
– महाराष्ट्र इतका लेचापेचा नाही. नक्कीच नाही. महाराष्ट्र भोळा आहे, भाबडा आहे; पण तो लेचापेचा नाही. महाराष्ट्रात मर्दांची कमी नाहीये. आणि मी तुम्हाला सांगतो की, जर कोणी प्रेमानं आलिंगन दिलं तर महाराष्ट्र प्रेम करतो. पण पाठीवर वार केला तर महाराष्ट्र वाघनखं काढतो. मी जिथे जिथे जातो तिथे तिथे ती वाघनखं मला जनतेच्या रूपात दिसताहेत. आता महाराष्ट्राने वाघनखं काढलेली आहेत.

शिवसेना पक्ष फोडणं, सरकार पाडणं हा जो संपूर्ण प्रकार केला आहे, हा उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी केला आहे…
– मी तुम्हाला एक जुनी आठवण सांगतो. 2014 साली मोदींच्या पंतप्रधानपदाला भाजपव्यतिरिक्त पाठिंबा देण्याचं पहिलं पाप कोणी केलं असेल, तर शिवसेनेने केलं आहे.

 तुम्ही याला पाप म्हणताय…
– आता तसं म्हणतोय, कारण ते आम्हाला संपवायला निघाले आहेत. आधी ते स्वप्नवत होतं की मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेताहेत. मी समोर बसलोय, माझ्या शेजारी अमित शहा बसले होते. हे सत्य आहे की स्वप्न आहे, हेच आम्हाला कळत नव्हतं. साधारणतः जून महिन्यात हा शपथविधी झाला. ऑक्टोबरच्या विधानसभा निवडणुकीत चार-पाच महिन्यांत असं कोणतं पाप आम्ही केलं होतं? की भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशी युती तोडली. तेव्हा तर आम्ही काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. तेव्हा यांच्या मानेवर बसलेला जो औरंगजेब आहे, त्या औरंगजेब फॅन क्लबमध्ये मी नव्हतो. मग तुम्ही माझी युती 2014 साली का तोडलीत? एकनाथ खडसेंनीही त्यावर भाष्य केले होते, की त्यांना वरून सांगण्यात आलं की, युती तोडण्याचा निरोप तुम्ही कळवा. मी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आलो त्याच दिवशी संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला की, ‘उद्धवजी… आता आपली युती काही राहात नाही. आम्ही हा निर्णय घेतलाय, आपल्याला कळवायला सांगितले आहे की, आम्ही युती तोडतोय.’ मग तेव्हा युती तुम्ही का तोडलीत?

तेव्हा तर तुम्ही हिंदुत्ववादी होतात…
– आणि त्यांच्या सोबतही होतो… मोदीजींचा प्रचार केला होता आम्ही… मग का युती तोडलीत?

त्यानंतर अमित शहा पुन्हा ‘मातोश्री’वर आले.
– 2019 साली… 2014 ला युती तोडली, शेवटच्या क्षणाला तोडली. तो मधला काळ होता, जेव्हा शिवसेना विरोधी पक्ष म्हणून काम करत होती. जाऊ द्या, तो कोळसा मला आता उगाळायचा नाही.

आता तुमच्यातून फुटलेल्या माणसाला मुख्यमंत्री केलं…
– तेच म्हटलं ना… कारण त्यांना राजकारणात पोरंच होत नाहीत.

होय, दुसऱ्यांची पोरं त्यांना सांभाळावी लागतात, असं आपण एका सभेत सांगितलं.
– याला मी काय बोलू?

उद्धवजी… भाजपच्या दगाबाजीमुळे महाराष्ट्रात नवीन आघाडी निर्माण झाली. त्या आघाडीतून नवीन सरकार निर्माण झालं. ही नवीन आघाडी कशी चालली आहे?
– भाजपकडून फसवलो गेल्याची भावना आजसुद्धा आहेच. आणि विश्वासघात…! मी विश्वासघातक्यांना कधी मदत करू शकत नाही. आणि सत्तेसाठी जर का आम्ही तडफडत असतो तर अख्ख्या देशात जेव्हा भाजपचे दोनच खासदार होते आणि भाजप तेव्हा हिंदुत्ववादी नव्हता, गांधीवादी समाजवादाकडे होता. देशाच्या राजकारणात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अस्पृश्य होती. दोन खासदार असलेल्या पक्षाबरोबर शिवसेनेने युती केली होती. कोणाच्या ध्यानीमनी होतं… की यांना पंतप्रधानपद दिसेल?

म्हणजे ती वैचारिक युती होती.
– वैचारिक होती… जेव्हा तुम्हाला कळलं पार्ल्याची निवडणूक शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर जिंकली तेव्हा भाजप गांधीवादी समाजवादाकडून आमच्यासोबत आला.

उद्धवजी… आज तुमचा पक्ष गेला.
– नाही गेला… मी ते मानत नाही.

तुमचा पक्ष गेला म्हणजे निवडणूक आयोगाने तुमच्याकडून पक्ष काढून घेतला.
– कुठे गेला? नाही गेला… निवडणूक आयोगाला तो अधिकारच नाहीये. हे मी मानायलाच तयार नाही.

विधिमंडळाच्या अध्यक्षाने तुमचा पक्ष काढून घेतला…
– नाही… त्यांनादेखील अधिकार नाही. आणि माझं जाहीर खुलं आव्हान आहे, की आपण एक तारीख देऊ, महाराष्ट्राच्या तमाम जनतेला तेथे बोलावू… एकही पोलीस सोबत घ्यायचा नाही. मी जनतेच्या मध्ये येऊन उभा राहतो. निवडणूक आयुक्तांत जर तेवढं धाडस असेल तर त्यांनी यावं… त्या लबाडानेही यावं… तिथे त्यांच्या सगळ्यांच्या देखत सांगावं पक्ष कुणाचा? ते जो निर्णय देतील तो मी मान्य करायला तयार आहे.

शेवटी कायदेशीरदृष्टय़ा झालाय निर्णय.
– हे कायदेशीर नाही… बेकायदेशीर आहे.

निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे…
– त्यांनी हे घटनाबाह्य काम केले आहे. हे घटनात्मक काम नाही.

मूळ पक्ष हा तुमचा नाही असं त्यांनी सांगितलं. धनुष्यबाण तुमचा नाही हेही त्यांनी सांगितलं. आणि तरीही आज नरेंद्र मोदी असं म्हणताहेत, उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहेत. सगळं पाप करून नरेंद्र मोदी हे सांगण्याचे धाडस करताहेत आणि ते त्याही पुढे जाऊन असं सांगण्याचं धाडस दाखवताहेत की, उद्धव ठाकरे संकटात सापडले तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन. हे काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न लोकांना पडला आहे.
– हा संभ्रम मोदींच्या मनात का व्हावा हे मला कळत नाही. कारण ते पुढे असेही म्हणाले होते की, जेव्हा माझं ऑपरेशन झालं… खरं तर मला त्याच्याबद्दल जास्त बोलायला आवडत नाही. कारण त्या एका भयानक अनुभवातून मी गेलोय… तो अनुभव आयुष्यात कधीही कोणाला येऊ नये. म्हणजे त्या वेळी माझ्या हालचाली संपूर्णपणे थांबल्या होत्या. ठीक आहे… त्यांनी मला किती फोन केले.. किती वेळा केले.. का केले, हे मला फोन रेकॉर्ड करण्याची गरज नाही. खरं-खोटं लोकांना माहिती आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असे सांगणारे अजून दुप्पट उत्पन्न करू शकले नाहीत. म्हणजे खोटं कोण बोलतंय हे लोकांना कळलेलंच आहे. पण मी काल सभेत बोललो, की तुम्हाला माझं एवढं प्रेम होतं तर त्याच काळामध्ये तुमचे चेलेचपाटे रात्रीचे हुडी वगैरे घालून माझ्या गद्दारांबरोबर माझं सरकार खाली खेचायचा का प्रयत्न करत होते? हे तुमच्या परवानगीशिवाय करत होते का? ज्या शिवसेनेने, ज्या हिंदुहृदयसम्राटांच्या मुलाने तुम्हाला दोन वेळेला पाठिंबा दिला, तुमचा प्रचार केला, त्याला तुम्ही नकली म्हणायला लागलात? हे कोणतं प्रेम? हे चायनीज प्रेम आहे का? प्रेमाची व्याख्या तरी काय तुमची? कुसुमाग्रजांची जी कविता आहे, ‘प्रेम कोणावरही करावे,’ पण विश्वासघातक्यावरती नाही करता येणार.

ही तुमची भूमिका चांगली आहे..
– विश्वासघातक्यावरती प्रेम मी नाहीच करू शकत.

मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रात येऊन वारंवार म्हणतात की, उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे. ज्या शिवसेनेसोबत 25 वर्षे सत्ता भोगली ती शिवसेना नकली? शहा आणि मोदी आता असंही म्हणताहेत, बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक किंवा शिवसेनेचे वारसदार उद्धव ठाकरे नाहीत. नारायण राणे, राज ठाकरे आणि कोण ते एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे वारस मोदी-शहांना वाटायला लागले. मला वाटतं एक तर त्यांची मानसिकता तपासून घ्यावी किंवा या भारतीय जनता पक्षाला मनोरुग्ण म्हणून जाहीर करावं असा माझ्या मनात प्रश्न आला.
– तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. मी त्याच्यावर बोलतो थोडंसं. पण पहिल्याप्रथम असं आहे की, बाळासाहेबांची शिवसेना बोलण्याआधी त्यांनी बाळासाहेबांना ‘हिंदुहृदयसम्राट’ हे बोललं पाहिजे. कारण त्यांचं ते दुखणं आहे की त्यांना अजून कोणीही हिंदूंचा कैवारी म्हणतच नाही. कारण त्यांच्या काळाला दहा वर्षं झाली तरी मुंबईत आणि महाराष्ट्रात हिंदूंना आक्रोश मोर्चे काढावे लागले. म्हणजे त्यांच्या राज्यात हिंदू सुरक्षित नाहीत. आणि ते हिंदुहृदयसम्राट होत नाहीत. बरं, वैचारिक जर का तुम्ही म्हणाल तर मग मी जाईन श्यामाप्रसाद मुखर्जींपर्यंत… भाजपचा राजकीय बाप म्हणजे जनसंघ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनसंघाचे. म्हणजे यांची वृत्ती कशी आहे बघा, संयुक्त महाराष्ट्र समिती जी होती, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात हे कधी उतरले नाहीत. पण निवडणुकीत निवडणूक लढायला म्हणून संयुक्त महाराष्ट्र समितीत घुसले. जर काही मिळवता आलं तर मिळवावं म्हणून जागावाटपाचं भांडण केलं. जागावाटप झालं तरी यांनी सातएक जागा जास्त लढवल्या होत्या. तेव्हा माझ्या आजोबांनीसुद्धा इशारा दिला होता. मग हे त्यातून बाहेर पडले. म्हणजे हे लढ्यात कुठेच उतरले नाहीत. श्यामाप्रसाद मुखर्जींचा उल्लेख मी एवढय़ाचसाठी केला की, साधारणतः 40-42 सालचा तो काळ होता. श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्या वेळेला बंगालच्या फाळणीला पाठिंबा दिला होता आणि ज्या मुस्लीम लीगने… आज मला हे लोक जे औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताहेत त्यांच्या राजकीय वडिलांची विचारसरणी काय होती? त्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी, तत्कालीन मुस्लीम लीगने देशाची फाळणी मागितली होती. गांधीजींनी आणि काँग्रेसने इंग्रजांना ‘चले जाव’चा आदेश दिला होता आणि श्यामाप्रसाद मुखर्जींनी तिथल्या गव्हर्नरला सांगितलं होतं की, चले जाव चळवळ ही चिरडली पाहिजे. तिच्याशी मुकाबला केला पाहिजे. तत्कालीन मुस्लीम लीगच्या फझलूल हक यांच्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी अकरा महिने अर्थमंत्री होते. याचा अर्थ तुम्ही काय सांगाल? आणि भाजपने मला हिंदुत्व शिकवावं? त्यांनी मला बाळासाहेबांचे विचार शिकवायचे? आणि त्यांच्याकडून मी शिकायचे? हा कोणता प्रकार? एकतर तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात कुठेही नव्हतात.

ते कुठेच नव्हते…
– स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस उतरली होती. ती काँग्रेस नको म्हणून देशाची फाळणी मागणाऱया तत्कालीन मुस्लीम लीगच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात. बंगालच्या फाळणीला तुम्ही तेव्हा पाठिंबा दिलात, चले जावला विरोध केलात, तुमच्याकडून मी काय शिकायचं?

उद्धवजी… या मधल्या काळामध्ये दोन-तीन राजकीय स्फोट झाले. त्यातला पहिला स्फोट असा आहे, एकनाथ शिंदे आणि त्यांची टोळी जेव्हा फुटून सुरतला जात होती, तेव्हा तुम्ही फडणवीसांना फोन करून सांगितलं…
– पळा… पळा… लवकर पळा… कोण पुढे पळे तो पाहू…

…की फडणवीस तुम्ही आता मुख्यमंत्री व्हा… असा दावा फडणवीसांनी केला, हे खरं आहे का?
– शक्यच नाही. या सगळ्या भाकड कथा आहेत. मी म्हटलं ना… पळा.. पळा.. पुढे कोण पळे तो.. हेच मी सांगितलं. कारण हे नासलेले आंबे मला माझ्या निष्ठावंतांच्या पेटीत ठेवायचे नव्हते. नाहीतर त्यांच्या शेपट्या धरून त्यांनाही मी पकडून ठेवू शकलो असतो. पण असले पळणारे उंदीर माझ्या काय कामाचे?

गेल्या काही दिवसातली पंतप्रधान मोदींची वक्तव्यं पाहिलीत तर ते तुमच्याविषयी भरभरून बोलताहेत, त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटतंय.
– म्हणजे लोकांना वाटतंय की, हे शिवसेनेत येताहेत की काय!

ते शिवसेनेत येताहेत की काय याऐवजी ‘नकली सेने’विषयी त्यांचं एवढं प्रेम का उफाळून येतंय. त्यामागे असं सांगितलं जातंय, काही सूत्रं जाहीरपणे म्हणताहेत की, मोदी यांनी तुमच्याविषयी गोड बोलून उद्याच्या निकालानंतर एक खिडकी तुमच्यासाठी उघडली आहे.
– कुठली खिडकी?

उद्या जर गरज पडली तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांचे सरकार बनेल काय?
– तुम्ही पिक्चरचे सेट पाहिलेत कधी? बाळासाहेबच एकदा मला युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये घेऊन गेले होते. तिथे छान सेट बनवले होते. जसे आपल्या नितीन देसाईंनी बनवले होते. त्यात अशा भिंती, खिडक्या असतात आणि त्या खिडकीतून पाठी बघितलं तर टेकू लावलेले असतात, आत काहीच नसतं. अशा खिडकीचा काय उपयोग?

खिडकी उघडली की दरवाज्याची फट उघडली आहे? गरज पडली तर आम्ही एकत्र येऊ शकतो.
– मी फटीतून जाणार नाही…

पण असा संभ्रम निर्माण केला जातोय.
– माझ्या महाराष्ट्राचं, अभिमानाचं, स्वाभिमानाचं, अस्मितेचं एक वेगळंच मंदिर बांधतोय. त्यामुळे मला असल्या फटींची आणि दरवाजांची गरज नाही. मी माझ्या महाराष्ट्राची लढाई लढतोय. देशाची लढाई लढतोय. लोकांचा आशीर्वाद मला पाहिजे आणि ही लढाई फक्त माझी नाही ती जनतेचीही आहे. कारण नाहीतर हे महाराष्ट्राला खतम करतील, जे दिसतंय. महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीत मी खतम होऊ देणार नाही.

नरेंद्र मोदींनी एक जादुई ‘वॉशिंग मशीन’ देशाच्या राजकारणामध्ये आणली आहे. या वॉशिंग मशीनचा तुम्हाला कधी मोह पडलाय का?
– भाजपला जो करंट शिवसेनेनं दिला होता तो त्यांचा करंटच काढल्यानंतर वॉशिंग मशीन काय चालणार? आता त्यांच्यावर ही पाळी का आली? अख्खी शिवसेना तुमच्या सोबत होती तिला तुम्ही नकली शिवसेना म्हणताय. आणि नकली लोकांना मांडीवर घेऊन त्यांना ‘बाळा जो जो रे’ का करताय तुम्ही.

म्हणजे देशभरातले भ्रष्टाचारी आणायचे आणि त्या वॉशिंग मशीनमध्ये टाकायचे.
– भ्रष्टाचारी तितुका मेळवावा… भाजप पक्ष वाढवावा…

याच वॉशिंग मशीनचा वापर करून किंवा दहशतीचा वापर करून ईडी, सीबीआय वापरून पक्ष फोडले, सरकारे पाडली आणि आजही त्यांची ही कृती सुरू आहे. लोकांनी निवडून दिलेले बहुमतातले मुख्यमंत्री, मग केजरीवाल असतील, हेमंत सोरेन असतील.. त्यांना ज्या पद्धतीने अटक करून तुरुंगात टाकलं.. अनेक मंत्र्यांना तुरुंगात टाकलं.. आमदारांना तुरुंगात टाकलं याविषयी आपलं मत काय?
– यालाच तर हुकूमशाही म्हणतात. आणि आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीला मी जे म्हटलं की, महाभारतात लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय ते हेच.. लोकांनी निवडून दिलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जे दिल्लीमध्ये उत्तम काम करीत होते त्यांनी भाजपसारख्या जगातल्याच नव्हे तर पूर्ण आकाशगंगेतल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला धोबीपछाड दिला. 70 पैकी त्यांचे दोन-पाच निवडून आले असतील तर असतील. हेमंत सोरेन यांच्यासारख्या आदिवासी नेत्याने भाजपला छोबीपछाड दिला, त्यांना तुम्ही जमिनीवर हरवू शकत नाही. आजसुद्धा माझ्या साध्यासाध्या शिवसैनिकांना ज्या पद्धतीने छळताहेत… नवी मुंबईतील आमचा एम. के. मढवी साधा शिवसैनिक.. त्याला त्यांनी आत टाकले होते आणि ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते त्यांनी देशद्रोही दहशतवादी इक्बाल मिर्चीबरोबर व्यवहार केला, सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला, ‘आदर्श’चा घोटाळा केला, त्यांना तुम्ही पक्षात घेऊन मानाची स्थानं देताय?

लोकसभेचे उमेदवार केलेत…
– ज्याच्या प्रचाराला मोदी कर्नाटकात गेले होते, याला मत म्हणजे मला मत असे मोदी सांगत फिरत होते तो प्रज्वल रेवण्णा… ज्याच्यावर बलात्काराच्या अनेक केसेस आहेत..

2 हजार 800 केसेस आहेत त्या रेवण्णावर बलात्काराच्या…
– तो रेवण्णा पळून जातो आणि साध्या माझ्या शिवसैनिकांना तुरुंगात टाकता? संजय राऊतांचा काय गुन्हा? त्यांना तुरुंगात टाकले.. आणि प्रज्वल रेवण्णा पळून जातो? हे जे काही चाललंय.. म्हणून मी म्हणतो, लक्षात ठेवा, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा धृतराष्ट्र नाही.

मोदी दहा वर्षं सत्तेत आहेत. त्यांच्या कार्याचा डंका सर्वत्र वाजवला जातोय…
– म्हणजे काय वाजतोय?

तुम्हाला मोदींची पाच कामे आठवतात काय? की त्यांनी देशासाठी किंवा समाजासाठी केली आहेत?
– पाच कामे म्हणजे, पक्ष फोडले, कुटुंबं फोडली, भ्रष्टाचाऱयांना स्थान दिलं, निवडणूक रोखे जमवले आणि जनतेची फसवणूक केली..

वॉर तो रुकवा दी ना पापा!
– (हसत) वाट लगवा दी ना पप्पा…!

एवढं मोठं युक्रेनबरोबरचं युद्ध थांबवलं..
– मग मणिपूर जे एक वर्ष धुमसतंय ते का नाही थांबवत?

मोदींनी वॉर रुकवा दिया हे मानायला तयार नाहीत तुम्ही?
– जर वॉर रुकवलं असेल त्यांनी…तर मणिपूरमध्ये अजूनही अशांतता का आहे? काल-परवासुद्धा मतदानाच्या दिवशी हिंसाचार झाला. गेले वर्षभर हे सुरूच आहे. त्या महिलांची ज्या पद्धतीने धिंड काढली गेली.. तिथले मुख्यमंत्री तर म्हणाले, असे बरेच प्रकार घडले आहेत. स्वतः गृहमंत्री तिकडे जाऊन आले तरी त्यांना हे माहीत नव्हतं? जर ते व्हिडीओ बाहेर आले नसते तर ते जगाला कळलंही नसतं. म्हणजे एवढी ही जी काही दडपशाही चालली आहे.. बातम्याही बाहेर येऊ देत नाहीत.. अत्याचार आजसुद्धा सुरू आहेत. पण ते आपल्यापर्यंत पोहचतच नाहीत. एक वर्ष झालं.. अजूनही मणिपूर अशांतच आहे. त्याबद्दल कोणाच्याही मनात संवेदना दिसतच नाहीत आणि तुम्ही मतं मागताय? मलासुद्धा लाज वाटतेय की, अरे तिथल्या महिलांवर आणि लोकांवर काय परिस्थिती उद्भवली असेल. आतासुद्धा आपण बोलताना तिथे काहीतरी घडतच असेल. मणिपूरबद्दल यांच्या कोणाच्याही मनात संवेदनाच नाहीत?

उद्धवजी.. हा देश खूप मोठा आहे. 140 कोटींचा देश आहे..
– असेल.. पण माणूस माणूसच आहे.

या देशात आजही 85 कोटी लोकांना मोदी पाच किलो फुकट धान्य देताहेत म्हणे.. म्हणजे लोकांना जवळजवळ भिकारीच केलंय. आणि तरीही ते म्हणतात की, मी देशाची आर्थिक स्थिती सुधारली.
– बघा.. असं आहे. आता तुम्ही हे माना अथवा नका मानू. तुम्हाला माझ्यावर अवलंबून राहावं लागलं, म्हणजे तुम्ही माझे गुलाम झालात. याचाच अर्थ असा की, यांना देशाला त्यांचा गुलाम बनवायचंय. असा गुलाम, की मी खायला दिलं तरच त्याचं पोट भरेल. नाहीतर त्याला पोट भरण्यासाठी मी दुसरं साधन ठेवणारच नाही. उद्योगधंदे मी येऊ देणार नाही, उद्योगधंद्यांना मी पळवून नेईन, तुम्हाला रोज खायचं प्यायचं असेल तर माझ्या दारात तुम्हाला भिकेचा कटोरा घेऊन उभं राहवंच लागेल. मग तुमची काय हिंमत आहे… तुम्ही मला नाकारूच शकणार नाही. हीच तर भीती आहे देशासमोर आज.. म्हणजे सगळ्यांना आपलं गुलाम करून ठेवायचं. तुम्हाला अगदी खाणं-पिणं लागलं तर तुम्हाला माझ्याकडे यावंच लागलं पाहिजे, मग तुमची बिशाद काय माझ्याविरुद्ध बोलण्याची? मी तुम्हाला खायलाच देणार नाही… मराल फुकटचे. हीच यांची नीती आहे.

देशाला गुलाम करून राज्य करायचं ही त्यांची योजना आहे. देशाचं संविधान धोक्यात आहे, अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण देशात निर्माण झालं आहे. आपलं काय मत आहे?
– ज्या पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू आहे. बघा आजपर्यंतच्या कोणत्याही निवडणुकीत त्यांना ना कार्यक्रम देता आला ना दिशा देता आली. त्यांना असं वाटलं होतं की देश आपला दिवाना आहे.. आपण म्हणू ते देश ऐकेल. ज्या पद्धतीने गेल्या संसदेच्या अधिवेशनात विरोधी पक्षाचे साधारणतः 140 ते 150 खासदार निलंबित करून त्यांनी कायदे पास करून घेतले. ते पाहिल्यानंतर यांना चारशे पार का व्हायचंय तर देशाचं संविधान बदलायचंय हे उघड झालं आहे. तेव्हा समोर कुणी असताच कामा नये. आणि लोकसभेने एकदा मंजूर केल्यानंतर कोर्टात काय करणार? त्यांना त्यासाठीच चारशे पार हवे आहेत. ते जेव्हा चारशे पार म्हणाले.. तेव्हा देशाने घोषणा दिली की ‘तडीपार’.. ‘अब की बार भाजप तडीपार.’

महाराष्ट्र हा देशात परिवर्तन घडवण्यासाठी अग्रेसर राहिला. 48 जागा महाराष्ट्रात आहेत, आणि या 48 जागांवर देशाचं भविष्य आहे. शरद पवार, राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात लक्ष घातलं. आपल्या नेतृत्वावर सर्वात जास्त विश्वास आहे. शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. लोकांच्या मनात एक चीड आहे. आपण अशा कोणत्या पाच योजना या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी सांगू शकाल, की ज्यावर देशाने आणि महाराष्ट्राने विश्वास ठेवावा.
– पहिली अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची लूट थांबवणं. कारण ही महाराष्ट्राची लूट तुम्हाला शाब्दिक बघितली तर काही वाटणार नाही. पण महाराष्ट्राचं जे काही ओरबाडून नेलेलं वैभव आहे ते परत आणलं पाहिजे आणि लूट थांबवली पाहिजे. म्हणजेच काय, तर महाराष्ट्रातून बाहेर गेलेले उद्योग हे मला परत आणावेच लागतील.. आणि ते मी आणणार.. आर्थिक केंद्र नेलेलं आहे. म्हणजेच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोजी-रोटी, महाराष्ट्राचं नेलेलं वैभव, ‘आर्थिक केंद्र’ परत आणायचंय. शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतचं पीक कर्ज मी मुख्यमंत्री असताना माफ करून शेतकऱ्याला कर्जमुक्त करून टाकलं होतं. शेतकऱयांना हमीभाव, कापूस असेल सोयाबीन असेल.. महाविकास आघाडीच्या काळात म्हणजेच माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांना किती भाव मिळत होता आणि आता किती मिळतोय, तो जरा बघा. जर माझ्या काळात हे होऊ शकत होतं तर आता का नाही होऊ शकत. त्याच्यानंतर जीएसटीच्या माध्यमातून जी काही लूट चालली आहे, कर दहशतवाद… हा मी थांबवणार.

जी.एस.टी.चे धोरण धोकादायक वाटतेय?
– जीएसटीमध्ये अशा काही घातक गोष्टी आहेत ज्यात छोटे-मोठे व्यापारी पण आहेत, एखादी गोष्ट चुकली तर सरळ त्याला जेलमध्ये टाकतात. ती थांबणार.. शेतकऱयांना जी काही खतं, बियाणं, अवजारं.. काय होतं की त्यांची जी काही योजना आहे प्रधानमंत्री सन्मान बिन्मान योजना काहीतरी म्हणतात, त्यातून वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱयांना देतात. पण आता शेतकरीच सांगताहेत की, आम्ही जी काही विविध उपकरणे, अवजारे वगैरे घेतो त्याला जीएसटी लावून आमचे हजारो कोटी रुपये तुम्ही घेताय.. आणि त्याच्या बदल्यात परत तेच, सहा हजार रुपये भीक दिल्यासारखी देताय.. म्हणजे शेती पंपावर जीएसटी आहे, खतावर जीएसटी आहे, कीटकनाशकावर आहे, शेततळ्याच्या प्लॅस्टिकवरती आहे, वायरवरती आहे.. सगळ्यावर जीएसटी आहे. तो जीएसटी मला काढायचाय. शेतकऱ्याला गोदामं उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. शेतकऱ्याला शीतगृह उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. शेतकऱ्यांनासुद्धा एक हमीभाव आणि मुख्य म्हणजे मार्केट उपलब्ध करून द्यायला पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये आरोग्य व्यवस्था आपण त्या वेळी तात्पुरती अपग्रेड केली होती. म्हणजे आपल्या राज्यात सरकारी हॉस्पिटलमध्ये सगळे मिळून जे सात-आठ हजार बेड होते ते आपण पावणे चार लाख बेडपर्यंत नेले होते. अगदी तेवढ्यांची गरज नसते, कारण त्यावेळी इपिडेमिक होतं. पण प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत हॉस्पिटल राज्य आणि केंद्राच्या मदतीने आपण का नाही करू शकत? अनेक गोष्टी आहेत, गावागावांत शेतकऱ्यांची मुले शिकताहेत. नोकऱ्या कुठे आहेत त्यांना? शेतकरी तर सगळे कर्जबाजारीच आहेत. शेतकरी जेव्हा जन्माला येतो तेव्हा वडिलांचं कर्ज असतं. त्या कर्जामध्ये तो मोठा होतो.. पुन्हा तो मोठा झाल्यावर त्याला कर्ज काढावं लागतं. मग त्यांची लग्नं थांबतात. मध्यंतरी मंगळसूत्राबद्दल मोदीजी जे बोलले, अनेक शेतकऱ्यांच्या पत्नींची मंगळसूत्रे त्यांना गहाण ठेवावी लागली आहेत. आणि काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रेही तुटलेली आहेत. अशा खूप गोष्टी आहेत. पण महाराष्ट्राचं वैभव आणि महाराष्ट्राचा जो एक दरारा आहे तो आपल्याला परत आणायचाय.

तुम्हाला किती आत्मविश्वास आहे की सरकार बदलेल?
– नक्कीच बदलेल… बदलावंच लागेल. आणि एकटा महाराष्ट्र हे घडवू शकतो. महाराष्ट्राने जर महाविकास आघाडीचे 48 खासदार जिंकून दिले तर तिकडेच हे खाली येतील आणि बाकी देशात तर तुम्ही बघताच आहात.. वातावरण आहेच. आज गुजरातमध्ये क्षत्रिय समाज यांच्याविरोधात रस्त्यावर उतरला आहे.

देशाचं नेतृत्व अशा वेळी कोण करेल?
– पहिला महत्त्वाचा मुद्दा, जे अयोग्य आहे ते काढा. आणि आमच्या इंडिया आघाडीमध्ये जी काही चर्चा चाललेली आहे, आम्ही एकेक पावलं ही ठरवून ठेवलेली आहेत.

मोदी हरतील का? म्हणजेच त्यांचा जो पक्ष आहे…
– हुकूमशहा…

हुकूमशाही हरेल का?
– नक्कीच.. हरवावीच लागेल.. नाहीतर देशाचं भवितव्य पुन्हा अंधारात जाईल.. देशात पुन्हा गुलामगिरी येईल. आधी परकीयांची गुलामगिरी होती, आता स्वकीयांची येईल.. आणि जसं लोकमान्य टिळक बोलले होते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.. तसं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी टिकवणारच.. ही आजची घोषणा असली पाहिजे.

मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे वळताना हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या देशातील लोकशाही सर्वात बलवान आणि मोठी आहे. हेच आपलं वैभव आहे. आपल्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक राज्य घटना आणि एक संविधान निर्माण झालं. ज्याने या देशाची संसद असेल, न्यायालय असेल, जनतेचा अधिकार असेल, त्यांना ताकद दिली. लिहिण्याचं, बोलण्याचं, वागण्याचं, देश निर्माण करण्याचं सामर्थ्य दिलं… पण गेल्या काही काळापासून भारतीय जनता पक्षाची पावलं हुकूमशाहीच्या दिशेने फार पुढे गेली आहेत. आणि चारशे पेक्षा जास्त जागा तुम्ही आम्हाला जिंकून दिल्या आणि परत जर आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान बदलू आणि आम्हाला हवं त्या पद्धतीने नवीन संविधान निर्माण करू, अशा प्रकारची भाषा त्यांचे अनेक मंत्री, अनेक खासदार, अनेक नेते करू लागले आहेत. तुम्हाला देशासाठी हे चित्र किती गंभीर वाटतंय? आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून देश तुमच्याकडे ज्या अपेक्षेने पाहतोय त्या उद्धव ठाकरे यांची संविधानासंदर्भातील भूमिका काय?
– आजच्या या महाभारतामधला हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. याचं कारण असं की, भारतीय जनता पक्षाचे काही खासदार, काही माजी मंत्री हे उघडपणे बोललेत की, संविधान बदलण्यासाठी आम्हाला चारशे पार पाहिजे. त्यांचे आताचे अध्यक्ष नड्डा तेसुद्धा मध्यंतरी म्हणाले होते की, देशात एकच पक्ष राहील. पूर्वी संघाची एक घोषणा होती, एक विधान, एक निशाण, एक प्रधान. आता ते निशाण कोणतं? एक प्रधान? म्हणजे मग राष्ट्रपती आणि पंतप्रधान नाही तर तुम्ही अध्यक्षीय पद्धत आणणार का? आणि मग विधान कोणतं? आणि या संविधानाबद्दल त्यांच्या मनात जो आकस आहे त्याच्यात पुन्हा महाराष्ट्रद्वेष हा डोकावतोच आहे. कारण ज्यांना आपण महामानव म्हणतो, ज्यांना आपण दैवत मानतो ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र. एका साध्या दलित, गरीब कुटुंबात जन्माला आलेली ही व्यक्ती. परिस्थितीने ते गरीब होते, पण आज त्यांच्या या बौद्धिक ऐश्वर्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही. आणि त्यावेळेला बाबासाहेबांना ज्या गोष्टी भेडसावत होत्या त्यांना मी बुरसटलेले, गोमूत्रधारी म्हणतो त्यांच्याविरुद्ध बाबासाहेबांनी लढा दिला. प्रबोधनकारांनीसुद्धा लढा दिला. मग ते महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा प्रश्न असेल, काळाराम मंदिराचा प्रवेश असेल, आणि त्या बुरसटलेल्या गोमूत्रधारींना असं वाटतंय की, अरे दलित आणि साध्या कुटुंबात जन्मलेला हा माणूस माझ्यापेक्षा बुद्धिमान कसा? आणि त्यांनी लिहिलेलं संविधान आम्ही काय म्हणून पाळायचं? हा जो सगळा विचार आहे हा खूप प्राचीन काळापासून चालत आलेला आहे.

वर्णद्वेष…
– होय, वर्णद्वेष…! आणि तो त्यांच्यात दिसतोय. मी पुनः पुन्हा सांगतोय की, एका साध्या दलित, गरीब कुटुंबात जन्माला आलेला माणूस इतका बुद्धिमान कसा होऊ शकतो? लोक त्यांना दैवत मानताहेत, त्यांना महामानव मानताहेत. आणि त्यांनी लिहिलेलं संविधान आम्ही पाळायचं. हा आमचा अपमान आहे. आणि ते त्यांना वाटतंय म्हणून त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान बदलायचं आहे.

महाराष्ट्र याला विरोध करेल..
– संपूर्ण देश करेल.. कारण मी जे ऐकलंय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपलं शिक्षण घेऊन परदेशातून जेव्हा परत आले तेव्हा कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं की, आजचा हा तुमचा नेता उद्या देशाचा नेता होईल.

मला असं वाटतं, याच भूमिकेतून तुम्ही कोल्हापूरच्या शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे.
– होय, कारण त्या वेळचे शाहू महाराज आणि माझ्या आजोबांचे संबंध होतेच. पण हा जो आकस आहे की, दलित कुटुंबात जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान असू शकतो, आणि त्यांनी लिहिलेलं संविधान आम्ही पाळायचं, हा कमीपणा ज्यांना वाटतोय, हा अहंगंड ज्यांच्यात आहे त्यांना संविधान बदलायचंय. पण देश ते त्यांना बदलू देणार नाही.

आणि महाराष्ट्र ठामपणे याला विरोध करेल..
– महाराष्ट्र तर आहेच.. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्रच आहेत. आणि महाराष्ट्राला याचा अभिमान आहे. आपले शिवसेनाप्रमुख सांगायचे की, दोन दैवतं महाराष्ट्राने या देशाला दिली. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे आमचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ही आमची दैवतं आहेत हे बाळासाहेब सांगायचे.. हिंदुहृदयसम्राट सांगायचे.

उद्धवजी.. आपण अत्यंत परखडपणे आपल्या भूमिका इथे व्यक्त केल्यात. निवडणुकीचं महाभारत हे शिगेला पोहचलंय…
– फक्त एकच सांगतो, महाभारतामध्ये ऐन लढाईच्या वेळेला कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. त्या गीतेचा सारांश जर का मी माझ्या पद्धतीने काढला तर त्याचा अर्थ असाच होईल की, लढाईच्या वेळेला जो सोबत असतो तो आपला मित्र आणि समोर कोणीही असला तरी तो आपला शत्रू आहे. आणि त्याच्याशी लढणं आणि त्याच्यावर विजय मिळवणं हे आता महाराष्ट्राला भाग आहे.

आणि आपण त्याच पद्धतीने पुढे चाललोय..
– नक्कीच..

धनुष्यबाणाची वेदना जरी आपल्या मनात असली तरी शिवसेनेची मशाल हाती घेऊन आपण पुढे चालला आहात..
– कारण मला हुकूमशाही जाळायची आहे.. त्यामुळे अगदी योग्य चिन्ह योग्य वेळेला माझ्या हातात आलं आहे.

उद्धवजी.. या महाभारतामध्ये आपण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावताय, महाराष्ट्रात शहरापासून गावा-खेडय़ात फिरताय… लोकांचा अत्यंत उदंड प्रतिसाद आपल्याला मिळतोय. मुलाखतीत आपण महाराष्ट्राचे प्रश्न, लोकशाही, संविधान, देशापुढील प्रश्न यासह अनेक विषयांवर आपली मते परखडपणे मांडलीत. त्यातून देशाला आणि महाराष्ट्राला नक्की दिशा मिळेल. आपल्या छातीवरची जी मशाल आहे ती मशाल महाराष्ट्र आणि देश उजळून टाकेल अशा शुभेच्छा मी आपल्याला देतो… जय हिंद… जय महाराष्ट्र…!
– धन्यवाद… जय हिंद… जय महाराष्ट्र!!

(समाप्त)