दिल्ली डायरी – धडधड, धाकधूक आणि घबराट…!

>> नीलेश कुलकर्णी

पायाखालची वाळू सरकणे म्हणजे काय याचा अनुभव सध्या दिल्लीतील महाशक्ती घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व तथाकथित ‘चाणक्यगिरी’ करणारे त्यांचे शागीर्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मनोमन भेदरलेले आहेत. आज जो जात्यात तो उद्या सुपात हा राजकारणाचा नियम आहे. दहा वर्षांत मग्रुरीची भाषा करणारे सत्ताधारी आता जमिनीवर आडवे होण्याची चिन्हे आहेत. मतदानाच्या टप्प्यागणिक महाशक्तीच्या फुसक्या पोलादी मनात सुरू झालेली धडधड… धाकधूक… घबराट हेच तर सांगते आहे.

लोकसभेच्या तीन टप्प्यांचे मतदान झाले आहे. आज चौथा टप्पा होईल, मात्र तीन टप्प्यांतच भाजपचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळेच चार सौ पार व मोदी की गॅरंटी हे जुमले मोदींच्या तथाकथित विकासासारखेच लापता झालेले आहेत. मोदी की गॅरंटीवर विसंबून असणाऱया उमेदवारांनाच आता मोदी पुन्हा येतील ही गॅरंटी उरलेली नाही! राजकारण हे बेरजेने करायचे असते. मात्र दोन वेळा प्रचंड बहुमताने सत्ता मिळाल्यामुळे महाशक्तीचा अहंकार इतका वाढला की, विरोधी पक्ष तर सोडाच मित्रपक्ष व स्वपक्षातील नेत्यांनाही कस्पटासमान वागणूक दिली गेली. मोदी-शहा यांनी दहा वर्षांत विरोधी पक्षांत, मित्रपक्षांत व स्वपक्षात असंख्य ‘दुःखी आत्मे’ तयार करून ठेवले आहेत. ते सगळेच महाशक्तीच्या पतनाची वाट पाहत आहेत.

नरेंद्र मोदी देशाचे काही भले करतील या भाबडय़ा अपेक्षेपोटी जनतेने त्यांना सलग दोन वेळा बहुमताने सत्तेच्या सिंहासनावर बसवले. मात्र नेहमी स्वतःच्या गरिबीचे, ओबीसी असण्याचे, तसेच चहा विकल्याचे भांडवल करणाऱया मोदींनी यापैकी कोणाचेही भले केले नाही. ज्या मध्यमवर्गाने मोदींना डोक्यावर घेतले तो महागाईने देशोधडीला लागला आहे. तरुण नोकऱया मिळत नसल्याने हताश होऊन व्यसनाधीन होत आहेत. दुसरीकडे देशाचा कसा दणक्यात विकास झाला आहे, हे नरेटिव्ह वाजविणे सुरू आहे. या खोटारडेपणाला मध्यमवर्ग कंटाळला आहे. या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरण्यामागे या मध्यमवर्गाची अनास्था हेही एक महत्त्वाचे कारण आहे. देशातील गरीब, मध्यमवर्ग, युवक व शेतकरी यांना केंद्रीभूत मानून साधारणपणे देशाचे आर्थिक धोरण आखण्याचा पायंडा आपल्याकडे आहे. मात्र मोदींच्या सरकारात सुरुवातीला अरुण जेटली, पीयूष गोयल व निर्मला सीतारामन हे तिघेजण अर्थमंत्री झाले. या सर्वांचा मध्यमवर्गाशी संपर्क कधीच आलेला नाही. त्यातही गोयलांसारखे व्यापारी वृत्तीचे लोक अर्थमंत्री झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या जीवनात ‘अनर्थ’ होणे स्वाभाविकच. या सगळय़ाचे परिणाम आता महाशक्ती भोगत आहे. जनतेला एक वेळा मूर्ख बनविता येईल, दोन- तीन वेळा बनविता येईल, मात्र सदासर्वकाळ मूर्ख बनविता येणार नाही. हाच या धडधड, धाकधूक आणि घबराटीचा मतितार्थ!

वरुण गांधींची ‘नकारघंटा’

दिल्लीतील महाशक्तीच्या नावडतीचे म्हणून वरुण गांधींना भाजपने अडगळीतच टाकले. पीलभीतमधून लोकसभेची उमेदवारीदेखील नाकारली. पीलभीतमधून तिकीट नाकारल्यानंतर निराश झालेल्या वरुण यांना दिल्लीतील महाशक्तीच्या एका संदेशवाहकाने फोन करून ‘आप रायबरेली से चुनाव तैयारी के लिए लग जाईए’ असा निरोप दिला. मात्र वरुण यांनी या संदेशवाहकाच्या निरोपाला केराची टोपली दाखविली. परिस्थिती हाताबाहेर जातेय, हे लक्षात येताच महाशक्तीच्या धाकटय़ा पातीने वरुण यांना थेट फोन केला. ‘मौजुदा स्थिती में आप के रूप में सक्षम उमीद्दवार रायबरेली के लिए हमारे पास है. आप का पार्टी में भविष्य उज्ज्वल है.’ वगैरे मक्खनबाजी या नेत्याने सुरू करताच वरुण यांनी अत्यंत निर्भीडपणे ‘रायबरेली से एक तो मेरा भाई (राहुल) नही तो बहन (प्रियंका गांधी) चुनाव लड सकती है. चुनाव और राजनीती अपनी जगह है. इन दोनों से मेरे आत्मीय रिश्ते है. में घर के लोगों के खिलाफ चुनाव नही लड सकता. शुक्रिया.’ म्हणत वरुण यांनी महाशक्तीचा फोन कट केला.

कन्हैया, तिवारी, लवली!

उत्तर-पूर्व दिल्ली मतदारसंघातील लढत ही देशातली एक ‘हायव्होल्टेज लढत’ मानली जात आहे. जेएनयूमधील विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार व भाजपचे विद्यमान खासदार भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी यांच्यात चुरशीची लढत होत आहे. मात्र काँग्रेसच काँग्रेसचा नेहमी पराभव करते ही म्हण काँग्रेस वर्तुळात प्रसिद्ध आहे. त्याचा प्रत्यय कन्हैय्या कुमार मैदानात उतरल्यापासून सगळय़ांनाच येतो आहे. बिहारी व भोजपुरी लोकांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघातील बहुतांश मतदार हे दिल्लीबाहेरचे. पोटापाण्यासाठी ते दिल्लीत स्थायिक झालेले आहेत. कन्हैय्या कुमारसारख्या लोकप्रिय चेहऱयाला मैदानात उतरवून काँग्रेसने खरे तर अर्धी लढाई जिंकलेलीच होती. मात्र कन्हैय्या दिल्लीच्या राजकारणात स्थिरावले तर आपले काय? या विचाराने दिल्लीतील मठाधीश काँग्रेसजनांच्या झोपा उडाल्या. त्यानंतर कन्हैय्या यांना अडचणीत आणण्याचे डावपेच टाकले गेले. वास्तविक, दहा वर्षांपासून खासदार असल्यामुळे मनोज तिवारींबद्दल जनतेत नाराजी आहे. त्यामुळे कन्हैय्या यांचा लोकसभेचा मार्ग तसा निर्धोक झाला होता. मात्र काँग्रेसचे दिल्लीचे प्रमुख अरविंद लवली यांनी काँग्रेसचा हात झिडकारत पुन्हा एकदा भाजपचे कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे कन्हैय्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच या लवली महाशयांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दुर्दैवाने काँग्रेसमध्ये येताच त्यांना अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली गेली. त्यातून काँग्रेसने आपले हात पोळून घेतले. माजी केंद्रीय गृहमंत्री बुटासिंग यांचे चिरंजीव यापलीकडे या लवलींची ओळख नाही. मात्र अशा बेभरवशाच्या लवलीवर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवल्याने आता काँग्रेसजनांना ‘कन्हैय्या…कन्हैय्या’ असा धावा करण्याची वेळ आली आहे.

[email protected]