महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे आता भाजपमध्ये जाणार असून, महिनाभरापूर्वीच त्यांनी याबाबत माहिती दिली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमांमुळे त्यांचा भाजप प्रवेश रखडला आहे. यासंदर्भात बोलताना त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचेही स्पष्ट सांगितले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक हरलेल्या रोहिणी खडसे 2020 मध्ये एकनाथ खडसे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या होत्या. एकनाथ खडसे यांनी 40 वर्षांचे भाजपबरोबरचे ऋणानुबंध तोडून शरद पवारांना साथ दिली. शरद पवारांच्या साथीने एकनाथ खडसे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले होते. परंतु, राष्ट्रवादीत भवितव्य दिसत नसल्याचे कारण देत त्यांनी पुन्हा भाजपत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काही काळात त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश निश्चित असल्याचे बोलले जात असले तरी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीत गेलेल्या त्यांच्या कन्या रोहिणी खडसे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहेत.
याबाबत एकनाथ खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, मी भाजपत जायचे ठरवले असताना रोहिणी खडसे यांनी मी शरद पवारांबरोबरच राहू इच्छिते. गेली काही वर्षे मी येथे काम करते आहे. मला पक्षाने सन्मान दिला आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार असून, पुढच्याही निवडणुका मला लढवायच्या आहेत, असे सांगितले. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मुक्ताईनगरसाठी एकनाथ खडसेंना संधी मिळण्याची शक्यता आहे, तर शरद पवारही रोहिणी खडसेंना संधी देतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे बाप-लेकीत हा सामना रंगू शकतो. याबाबत एकनाथ खडसे म्हणाले, ‘रोहिणी राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे त्या प्रामाणिकपणे राष्ट्रवादीच्या प्रचाराचे काम करत आहेत. त्यामुळे नंतरच्या कालखंडात मी भाजपत प्रवेश केला तर भाजपचेच काम करणार असून, यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही. मी सध्या विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवारांनी मला सांगितले आहे की, मी दिलेली वस्तू परत घेत नाही. शरद पवारांनीच मला अभय दिले असल्याने मला दुसरा कोणी राजीनामा मागितला तरी फरक पडत नाही. मी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही. मी राजकीय माणूस आहे. पण, आता निवडणूक लढवण्याकडे माझा कल नाही, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.