दिल्ली विमानतळ आणि दोन रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी

दिल्लीत बॉम्बस्फोटाच्या धमक्यांचं सत्र सुरू झाल्याने काहीसं दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या अनेक मोठ्या शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे ईमेल आले होते. आता दिल्लीतील दोन रुग्णालयं आणि विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

रविवारी आलेल्या या धमकीत बुरारी येथील सरकारी रुग्णालय आणि मंगोलपुरी येथील संजय गांधी रुग्णालय यांना बॉम्बने उडवून देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या संदर्भातील मेल या दोन्ही रुग्णालयांना मिळाले आहेत. त्याखेरीज दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे.

या तिन्ही धमक्यांसाठी वापरलेला ईमेल आयडी एकच असल्याने एकच गहजब उडाला असून रुग्णालयांना तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस बॉम्बशोधक पथक आणि अग्निशमन दलासह रुग्णालयांत दाखल झाले. त्यांनी रुग्णालयांची कसून तपासणी केली. या तपासणीत काहीही संशयास्पद गोष्ट अगर वस्तू आढळलेली नाही. तरीही पोलिसांनी खबरदारी म्हणून बंदोबस्त राखला आहे.