रायगडात मिंध्यांना खिंडार; रेखा ठाकरे पुन्हा शिवसेनेत; गद्दार आमदार महेंद्र थोरवेंना ऐन निवडणुकीत तडाखा

मावळ लोकसभा मतदारसंघाचा प्रचार ऐन टिपेला व आला असतानाच रायगडात मिंध्यांना जोरदार खिंडार पडले आहे. माजी जिल्हा संघटक रेखा ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भगवे उपरणे देऊन रेखा ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. दरम्यान, रेखा ठाकरे यांच्या प्रवेशाने गद्दार आमदार महेंद्र थोरवे व मिंध्यांचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना तडाखा बसला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रचारासाठी गुरुवारी कर्जतमध्ये आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दणदणीत सभा झाली. यावेळी रेखा ठाकरे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे व मिंधे गटातील अन्य पदाधिकाऱ्यांच्या कारभाराला कंटाळून यापूर्वीदेखील खोपोली शहरातील सुरेखा खेडेकर व अन्य कार्यकर्त्यांनी मिंधे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. आता रेखा ठाकरे यांच्या प्रवेशाने थोरवे व बारणे यांना मतदानाच्या दोन दिवस आधी जोरदार धक्का बसला आहे.

शिवसेना उपनेते सचिन अहिर, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, मावळ लोकसभा समन्वयक केशवनाथ पाटील, संपर्कप्रमुख बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, महिला आघाडी जिल्हा संघटक सुवर्णा जोशी, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, एकनाथ पिंगळे आदी उपस्थित होते.

रेडिमिक्स प्लांटला परवानगी दिल्यास मतदानावर बहिष्कार
घोडबंदर गावातील रहिवासी रेडिमिक्स प्लांटमुळे आधीच त्रस्त झाले असताना आता पेणकर पाडा गावात भरवस्तीमध्ये रेडिमिक्स काँक्रीट प्लांट उभारण्याचा घाट घातला आहे. त्याला तीव्र विरोध करत परवानगी न देण्याची मागणी केली जात आहे. या रेडिमिक्स प्लांटला परवानगी दिल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मीरा रोड येथील पेणकर पाडा हे जुन्या गावांपैकी एक आहे. या गावाला लागूनच एका विकासकाची खासगी मोकळी जागा आहे. येथे इमारत बांधकामासाठी आवश्यक असणारे रेडिमिक्स काँक्रीट तयार करणारा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली त्याच्या सुरू आहेत. प्रकल्पामुळे हवेत पसरणाऱ्या घातक धुळीचा त्रास लगतच्या स्थानिक हजारो नागरिकांना होणार आहे.