शिवसेनेचे एम. के. मढवी यांना जामीन मंजूर; निवडणुकीत विरोधकांची गळचेपी करणाऱ्या मिंधे सरकारला झटका

ऐन निवडणुकीत शिवसैनिकांवर दबाव आणून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या मिंधे सरकारला न्यायालयाने झटका दिला आहे. नवी मुंबईतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांना कथित खंडणीप्रकरणी आज ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मढवी यांनी पैसे मागितल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला. त्यानंतर मढवी यांची 50 हजारांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मढवी यांना ऐन निवडणुकीत कथित खंडणी प्रकरणात अडकवण्याची कारवाई संशयास्पद व राजकीय सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

नवी मुंबई येथील ऐरोलीमध्ये रस्त्यात केबल टाकणाऱ्या एका ठेकेदाराकडून मढवी यांनी खंडणी मागितल्याचा तथाकथित आरोप करण्यात आला होता. त्यानंतर 27 एप्रिल रोजी रात्री त्यांना अटक करण्यात आली होती. त्यातील पहिला हप्ता दीड लाख रुपये आधीच उकळला होता असा खोटा आरोप करण्यात आला होता. मात्र त्याचा पुरावा नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

दरम्यान, पहिला हप्ता घेतल्यानंतर तक्रारदाराने गुन्हा का दाखल केला नाही, असा युक्तिवाद करण्यात आल्यानंतर अनेकांची बोलती बंद झाली. दरम्यान, एम. के. मढवी यांनी ठाणे न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर न्यायाधीश श्रीमती एम.डी. ननावरे यांनी जामीन मंजूर केला.

तक्रारदार भाजपचा कार्यकर्ता

तक्रारदार हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे लपवून ठेवले होते. मुळात मढवी यांच्याविरोधात सापळा लावण्यात आलाच नव्हता. दरम्यान, पैसे मागितले आणि पहिला हप्ता दिला असेल तर तक्रारदाराने सुरुवातीला गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र गुन्हा दाखल न करता ठाणे खंडणीविरोधी पथकाने त्यांना अटक केली आणि मध्यरात्री गुन्हा दाखल केला. हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असल्याचा युक्तिवाद मढवी यांचे वकील मुनीर अहमद यांनी केला.

ठाणे लोकसभेसाठी अडीच हजार मशीन

ठाणे लोकसभा मतदारसंघातील 2 हजार 453 मतदान केंद्रांसाठी निवडणूक निर्णय आयोगाकडून जवळपास अडीच हजार मतदान मशीन उपलब्ध करण्यात आले आहेत. या मतदारसंघात मीरा-भाईंदर, ओवळा- माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, ऐरोली, बेलापूर या सहा विधानसभांचा समावेश आहे.

2 हजार 453 मतदान केंद्रांसाठी निवडणूक आयोगाकडून 4 हजार 906 बॅलेट युनिट, 2 हजार 453 कंट्रोल युनिट व 2 हजार 453 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यातील 1 हजार 200 बॅलेट युनिट 1 हजार 20 कंट्रोल युनिट व 1 हजार 191 व्हीव्हीपॅट मशीन राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या या मशीनची ऑनलाइन पद्धतीने सरमिसळ करण्यात आली. ही ऑनलाइन प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली.

संजोग वाघेरे-पाटील यांना आगरी सेनेचा पाठिंबा

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांना रायगड जिल्हा आगरी सेनेने पाठिंबा दिला आहे. तसे पत्रच शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत संजोग वाघेरे-पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. मावळमधून संजोग वाघेरे-पाटील यांना निवडून आणणारच, असा निर्धार आगरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आगरी सेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मते, जिल्हाध्यक्ष प्रीती कडव, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा रेखा भगत, युवा आगरी सेना उपजिल्हाप्रमुख उत्कर्ष मते, आगरी वाहतूक सेना रायगड उपजिल्हाप्रमुख गिरीश माली, उरण तालुकाप्रमुख राजन कडू, युवा उरण तालुकाप्रमुख देवेंद्र तांडेल, खालापूर तालुकाप्रमुख जितेन पाटील, खालापूर युवा तालुकाप्रमुख सुबोध पाटील, पनवेल युवा तालुकाप्रमुख महेंद्र दमडे आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.