सत्तेच्या भुकेने वखवखलेल्या फडणवीस बकासुराच्या प्रवृत्तीला लोकसभा निवडणुकीत गाडा; अनंत गिते यांचे आवाहन

भूक किती असावी यालाही काही मर्यादा असतात. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत निवडूण आल्यावर मुख्यमंत्री म्हणून सत्ता उबवताना फडणवीसांची सत्तेची भूक भागली नाही, म्हणून सत्तेसाठी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असे त्यांनी सांगितले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे फक्त 105 आमदार निवडूण आले. बहुमत नसल्याने फडणवीसांना सत्ता मिळवता आली नाही. त्यांनी केंद्रातील पाशवी सत्तेच्या बळावर शिवसेना फोडून सत्ता काबीज केली. मात्र, उपमुख्यमंत्री पदावरच त्यांना समाधान मानावे लागले, असा घणाघात अनंत गिते यांनी केला आहे.

एवढे करूनही फडणवीस यांची सत्तेची भूक भागली नाही म्हणून त्यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसही फोडण्याचा प्रयत्न केला. सत्तेच्या हव्यासाच्या भुकेने वखवखलेला फडणवीस हा सत्तापीपासू वृत्तीचा बकासुर महाराष्ट्राला कलंक आहे. अशा या फडणवीस वृत्तीच्या विकृतीला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करत गद्दारांना निवडणुकीत गाडलेच पाहीजे, असे अनंत गिते यांनी मळे येथील प्रचार सभेत सांगितले.

रायगड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांनी निवडणुक प्रचारात चांगलीच मुसुंडी घेतल्याने प्रतिस्पर्धी महायुतीच्या उमेदवारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. अनंत गितेंना सर्वस्तरातून मिळणारा पाठींब्याचा उत्तम प्रतिसाद ही गिते यांची जमेची बाजू आहे. रायगड लोकसभा मतदार संघातून अनंत गिते हे इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणुक लढवत आहेत. दापोली विधानसभा मतदार संघात त्यांनी अखेरच्या दिवसामंध्ये प्रचाराची गणिमी काव्याने प्रचार यंत्रणा राबवून प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. दापोली विधानसभा मतदार संघात युनासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, भाई जगताप आदी नेते मंडळींनी मतदार संघात प्रचाराची राळ उठवली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचा विजय निश्चित मानला जात आहे.