भाजपच्या अश्वमेधाचे खेचर महाराष्ट्रच रोखणार… गो बॅक! उद्धव ठाकरे यांचा घणाघात

जनतेचे भवितव्य हे नेत्याच्या हाती नसते तर नेत्यांचे भवितव्य जनतेच्या हातात असते. कारण कुणाला निवडून द्यायचे हे जनताच ठरवत असते. नरेंद्र मोदींचे आणि देशाचे भवितव्यही जनतेच्या हाती आहे. आता जनताच ठरवणार आहे. आणि यावेळी भारतीय जनता पक्षाच्या अश्वमेधाचे खेचर आपला महाराष्ट्रच रोखणार… परत पाठवणार… गो बॅक! असा जबरदस्त वज्राघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगली येथील विराट जाहीर सभेत केला. सांगलीत या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीची जबरदस्त एकजूट पाहायला मिळाली.

सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सांगलीतील काँग्रेस बंडखोरांची चांगलीच खबर घेतली.

चंद्रहार काही लेचापेचा नाही

कुस्तीचा आखाडा आणि निवडणुकीचा आखाडा वेगळा असतो असे म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी यावेळी चांगल्याच कानपिचक्या दिल्या. चंद्रहार हा पैलवान आहे. त्याचा राजकारणाशी काय संबंध असे काही जण म्हणतात, पण चंद्रहार हा काही लेचापेचा नाही, महाराष्ट्र केसरी आहे. हिंद केसरी मारुती मानेही खासदार होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. इतर पक्षांमध्येही क्रिकेटपटू, सिनेतारकांना तिकीट देतात. त्यांचा राजकारणाशी संबंध असतो का, असा सवाल करतानाच जे जे उमेदवाराला मत देतात त्या प्रत्येकाचा संबंध राजकारणाशी असतो कारण कुणाला निवडून द्यायचे हे तेच ठरवतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सांगलीच्या जागेवरून गेला महिनाभर उद्भवलेल्या परिस्थितीबाबत भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आघाडीची जागा मला एकटय़ाला नको, त्याचा फायदा आपल्या सोबत्यालाही झाला पाहिजे या भावनेने शिवसेनेनेही अनेक जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या. रामटेकची सलग पाच वर्षे जिंकलेली जागा सोडली. तेथील शिवसैनिक नाराज झाले नसतील का? कोल्हापूरची जागा शाहू महाराजांच्या प्रेमाखातर सोडली. कारण काँग्रेससोबत शिवसेनेची आघाडी आहे. अमरावतीची जागाही शिवसेनेने पाच वेळा जिंकली होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

काल कोल्हापुरात सभेसाठी गेलो होतो तेव्हा शाहू महाराज यांनी शिवसैनिकांचे काwतुक केले. ते म्हणाले, शिवसैनिकांची कमाल आहे. शिवसेनाच कोल्हापूरची जागा लढतेय अशा पद्धतीने शिवसैनिक जीव तोडून मेहनत करताहेत. त्यांच्या भरवशावर मी जिंकणार म्हणजे जिंकणार.

रामटेकला गेलो तेव्हा तेथील शिवसैनिकही म्हणाले की, आपण ती जागा जिंकणारच. ती जागा काँग्रेस लढवतेय. पण शिवसैनिक म्हणतात… आपण जिंकणार. अमरावतीमध्ये गेलो तेव्हा यशोमती ठाकूर म्हणाल्या की, शिवसैनिक दिवसरात्र काम करताहेत, एकही पैसा घेत नाहीत आणि काँग्रेस कार्यकर्त्यांपेक्षाही एक पाऊल पुढे टाकून काम करतात. मला अभिमान आहे त्या शिवसैनिकांचा, असे प्रशंसोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सुप्रिया सुळे आणि सोलापुरात प्रणिती शिंदेही शिवसैनिकांच्या कामाचे काwतुक करतात. उद्या चंद्रहारही विजयी झाल्यानंतर नक्की सांगेल की, विश्वजीत आहे, कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्यांच्यामुळे आणि शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे मी जिंकलो. याला म्हणतात आघाडी. नाहीतर आघाडी करायची कशाला? भाजपने शिवसेनेचा विश्वासघात केला नसता तर शिवसेना त्यांच्यासोबत राहिली असती, मग सांगलीच्या जागेचे काय झाले असते? मग सांगलीची जागा कुणाकडे गेली असती? पण महाराष्ट्र लुटला जातोय. त्या लुटीमध्ये सहभागी व्हायला मी लुटारू नाही. ते पाप माझ्याकडून कदापि होणार नाही. म्हणून लाथ मारून आम्ही त्यांच्यापासून बाहेर पडलो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सांगलीचे स्वातंत्र्य धोक्यात आले असताना सांगलीकर फुटणार? लोकशाहीच्या बाजूने मतदान करणार की हुकूमशाहीच्या बाजूने? असा प्रश्न आता जनता विचारतेय, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगलीकरांना साद घातली. ते म्हणाले की, मूठभर सैन्य घेऊन इंग्रजांनी इथल्या गद्दारांना घेऊनच हिंदुस्थानवर दीडशे वर्षे राज्य केले. तीच परिस्थिती आज परत आली. हीच जागा हवी, तीच जागा हवी असे शिवसेनेलाही वाटले होते, पण पक्षाचा नेता म्हणून मिरवणे सोपे असते, कार्यकर्त्यांना जपणे कठीण असते, अशी वस्तुस्थितीही उद्धव ठाकरे यांनी विषद केली.

400 जागा मिळाल्यानंतर भाजप संविधान बदलणार आहे हे भाजपचे खासदारच सांगतात. महाराष्ट्रातील भुमीपुत्राने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या संविधानाची निर्मिती केली आहे.  याबद्दल भाजपच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, उपनेते नितीन बानुगडे- पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सांगली लोकसभा निरीक्षक आदित्य शिरोडकर, कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार, काँग्रेस नेते विश्वजीत कदम, पृथ्वीराज पाटील, सुकुमार कांबळे, सिद्धार्थ जाधव, दिगंबर जाधव, बाबासाहेब मुळीक, बजरंग पाटील, मनीषा पाटील, संजय विभुते, अभिजित पाटील, शंभुराज काटकर, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

सांगलीकरांचे मन भगवेच आहे

सांगलीत त्या काळात शिवसेनाप्रमुखांच्या महाविराट सभा झाल्या होत्या. सांगलीकरांचे मन हे भगवेच आहे. पण मधल्या काळात थोडी गफलत झाली. त्याबद्दल आपण सांगलीकरांची माफी मागतो. कारण भाजपचे लचांड शिवसेनेने गळय़ात बांधून घेतले होते. आता त्यांचा बीभत्स चेहरा जगासमोर आला असून देश बदनाम करून टाकताहेत, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी केली.  इंडिया आघाडीचे खासदार 300च्या वर निवडून आल्याशिवाय राहत नाहीत. इंडिया आघाडी पोकळ नारे देत नाही.  देशातल्या जनतेनेच नारा दिलाय… अब की बार भाजप तडीपार. सांगलीकर आता हुकूमशाहीविरुद्ध एकजुटीने कुणीही असो त्याला गाडून चंद्रहारच्या रुपाने मशाल पेटवल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

स्तुती करायची तर शिवसेनेची करा

कालपरवा मोदींनी संजय राऊतांवर टीका केली. आज माझी स्तुती केल्याचे ऐकले. पण माझी स्तुती करू नका, शिवसेनेची करा. ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधानपदासाठी पहिल्यांदा पाठिंबा दिला तिचे काwतुक करा. एका बाजूला माझी शिवसेना नकली म्हणायचं, माझी तब्येत बरी नसताना रात्रीचे कारस्थाने करून माझे सरकार खाली खेचले आणि आज माझी स्तुती करताय? असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर केला.

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला -चंद्रहार पाटील

सांगलीत एका शेतकऱ्याच्या मुलासमोर दोन दरोडेखोर उभे आहेत. ज्यांनी साखर कारखान्यांवर दरोडे घालून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे सांगलीकरांनो, शेतकऱ्याचा मुलगा हवाय की दरोडेखोर, अशा भावना यावेळी चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केल्या.  मिरज येथील सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्याला उमेदवारीबद्दल दिलेला शब्द पाळला, अशी कृतज्ञता यावेळी चंद्रहार यांनी व्यक्त केली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना उद्धव ठाकरे यांनी विश्वास टाकला तो आयुष्यभर विसरणार नाही, असे चंद्रहार पाटील म्हणाले.

अपक्षांचे काही खरे नाही -जयंत पाटील

प्रत्येक मतदारसंघामध्ये आघाडीतील सर्व पक्ष हातात हात घालून काम करताहेत. सांगलीतही आपण एकसंधपणाने चंद्रहार पाटील यांच्या मशालीचेच काम करायला पाहिजे. लोकांना वाटते मी सांगितले शिवसेनेला की सांगलीची जागा तुम्ही घ्या. असे काहीच नाही. अमरावतीत आम्ही अपक्षाला पाठिंबा दिला होता. नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता, पण निवडून आल्यावर तिसऱ्या दिवशी भाजपच्या दारात जाऊन बसल्या. त्यामुळे अपक्षांचे काही खरे नाही, असे सांगत जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर निशाणा साधला.

आघाडीचा धर्म पाळू – विश्वजीत कदम

काँग्रेस नेते, आमदार विश्वजीत कदम म्हणाले, ‘भाजपच्या फसव्या राजकारणाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी स्थापन झाली. या आघाडीच्या वतीने आम्ही लोकसभेची निवडणूक एकसंघपणे लढवत असून, जनताही आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. महाराष्ट्राचा वाघ’ म्हणून महाराष्ट्रातील जनता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहते. त्याचप्रमाणे सांगली जिह्यातील वाघ म्हणून आम्ही चंद्रहार पाटील यांना विजयी करू,’ असा विश्वास विश्वजीत कदम यांनी दिला.

मोदी सरकार कोण बदलणार हा प्रश्न पडला असेल पण मोदींपेक्षा जास्त ताकदवान जनता आहे. तुमचे एक बोट सरकार बदलू शकते. ईडी आणि सीबीआयची जी मस्ती दाखवली जाते ती मस्ती एका टिचकीने तुम्ही उतरवू शकता.

भाजपने हिसकावलेली सांगली परत मिळवायला आलोय

सांगली विश्वजीतला सोडायचे चाललेय हे पहिल्या दिवशी कळले असते तर शिवसेनेने सांगली त्याच दिवशी सोडली असती, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी या वेळी पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला. पतंगराव हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला यायचे. त्या वेळी आपल्याशी बोलतानाही मुलासारखेच प्रेम करायचे, असे ते म्हणाले. उद्या शिवसेना सांगलीत आपल्या भवितव्याच्या आड येईल असे काँग्रेसवाल्यांना वाटत असेल, पण अजिबात नाही. सांगलीकरांकडून भाजपने हिसकावून घेतलेली जागा पुन्हा मिळवण्यासाठीच शिवसेनेने सांगली घेतलीय, असे स्पष्ट करतानाच सांगली आपल्याला निवडून द्यायचीच आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.